भाजपाला २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमत प्राप्त झालेले नाही. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांच्या आधारावर भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. या १८ व्या लोकसभेचे वैशिष्ट्य म्हणजे विरोधकांची ताकद वाढली आहे. १० वर्षांपासून संसदेमध्ये विरोधी पक्षनेता नव्हता; मात्र आता राहुल गांधींच्या रूपाने संसदेला विरोधी पक्षनेता प्राप्त झाला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये राहुल गांधींनी सत्ताधारी पक्षावर अनेक प्रकारचे आरोप केले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी नीट परीक्षा, अग्निपथ योजना, मणिपूरमधील हिंसाचार व भाजपाच्या हुकूमशाही कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. राहुल गांधींच्या वक्तव्यातील काही भाग संसदेच्या नोंदींमधून काढूनही टाकण्यात आला आहे. नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये जवळपास अडीच तास भाषण केले. त्यांनी राज्यसभेतही बुधवारी विरोधकांना उत्तर दिले. त्यांनी लोकसभेमध्ये काँग्रेसवर ‘हिंदूविरोधी’ असल्याची टीका केली; तर राज्यसभेमध्ये टीका करताना त्यांनी काँग्रेसला ‘दलितविरोधी’ ठरविले आहे. सत्ताधाऱ्यांनी राज्यघटनेला धोका निर्माण केला आहे, या विरोधकांच्या प्रचारालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यघटनेच्या संरक्षणाचा मुद्दा फारच प्रभावी ठरल्याचे दिसून आले. या मुद्द्याचा भाजपाला मोठा फटका बसला आहे. पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केला. या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष ‘परजीवी’ होता आणि तो इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या जोरावर निवडणूक लढत होता, असाही दावा त्यांनी केला. पेपरफुटी आणि मणिपूर घटनेवरूनही विरोधकांनी बराच गोंधळ घातला होता. पंतप्रधान मोदींनी या मुद्द्यावरूनही विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा