पंजाबमधील लोकसभा निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणार्या दोन मारेकऱ्यांपैकी एक असणार्या बेअंत सिंग यांचा मुलगा सरबजीत सिंग खालसा विजयी होणार असल्याचे चित्र आहे. सरबजीत सिंग खालसा फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर वारिस पंजाब डेचे प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह खडूर साहिब मतदारसंघातून आघाडीवर आहेत. अमृतपाल सिंह सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) दिब्रुगडच्या तुरुंगात आहेत. दुपारी १.२० पर्यंतच्या आकडेवारीनुसार अमृतपाल १.२ लाख मतांनी आघाडीवर आहेत, तर सरबजीत सिंग ५८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. अमृतपाल सिंह आणि सरबजीत सिंग या दोघांनाही यंदा मतदारांनी कौल दिला आहे, याची काही प्रमुख कारणे आहेत.
हेही वाचा : Lok Sabha Election Results Live Updates : राहुल गांधी तब्बल ४ लाख मतांनी रायबरेलीतून विजयी
पंजाबमधील प्रश्न
सतलज यमुना नदीच्या कालव्याचा वाद, १९८४ च्या शीख विरोधी हत्याकांडातील पीडितांना न्याय आणि ३० वर्षांहून अधिक काळ तुरुंगात शिक्षा भोगलेल्या शीख राजकीय कैद्यांची सुटका यासह अनेक प्रश्नांचे अद्याप निराकरण झालेले नाही. या समस्यांमुळे लोकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या प्रश्नांसाठी वेळोवेळी आंदोलनेही होत आली आहेत. त्यामुळे लोकांनी आपल्या नेतृत्वातच बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे, या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
अमृतपाल सिंहच्या शोधावेळी ३०० हून अधिक तरुणांना अटक
मार्च आणि एप्रिल २०२३ मध्ये अमृतपाल सिंहचा शोध सुरूअसताना ३०० हून अधिक तरुणांना अटक करण्यात आली होती. या तरुणांवर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नव्हती, केवळ अमृतपाल सिंहशी संवाद साधला म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. अनेकांची नंतर सुटका करण्यात आली असली तरी, या अन्यायाबाबत लोकांनी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या व्यतिरिक्त, शोधमोहिमेदरम्यान आठवडाभर इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती, याचाही राग लोकांमध्ये होता.
आर्थिक संकट
सुप्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. लखविंदर सिंग यांनी पंजाबमधील आर्थिक संकटावर प्रकाश टाकला. उच्च बेरोजगारी दरामुळे लोक हताश झाले आहेत आणि नवीन नेतृत्वाच्या शोधात आहेत. डॉ. लखविंदर म्हणाले की, अमृतपाल आणि सरबजीत यांच्याकडून लोकांना आशा आहे. अमृतपाल आणि सरबजीत यांच्या पुनरुत्थानाकडे फुटीरतावादी म्हणून न पाहता विकासाचा पर्याय म्हणून पाहिले पाहिजे.
पारंपारिक पक्षांच्या विरोधात मतदान
अमृतपाल सिंह यांनी सुरुवातीला अंमली पदार्थाविरोधी लढ्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले. या निवडणुकांमध्ये मतदार त्यांच्या फुटीरतावादी वक्तृत्वापेक्षा त्यांच्या अंमली पदार्थाविरोधी भूमिकेवर भर देत आहेत. त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यासाठी प्रचार करणाऱ्या मित्रांनी खलिस्तानचा उल्लेख टाळला आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या संकटावर इतर राजकीय पक्षांनी बोलणे टाळले आहे. परिणामी मतदारांनी पारंपारिक पक्षांच्या विरोधात मतदान केले आहे.
हेही वाचा : भाजपा २०१९ची पुनरावृत्ती करणार? गेल्या निवडणुकीतील मतांची आकडेवारी काय सांगते?
बलिदानाचा मुद्दा आणि मतदारांची सहानुभूती
तीन वेळा निवडणुकीत अयशस्वी झालेल्या सरबजीत सिंग खालसा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येसाठी वडिलांना मिळालेल्या फाशीमुळे मतदारांची सहानुभूती मिळवली आहे. विशेषत: शीख पंथांचा सरबजीत यांना पाठिंबा मिळाला असल्याचे चित्र आहे. प्रचारातील ऑपरेशन ब्लूस्टारचा मुद्दाही सरबजीतसाठी फायद्याचा ठरताना दिसत आहे.