सांगली : गेल्या तीन पिढ्या दुष्काळाशी झुंज देत असलेला महादेव डोंगररांगाच्या छायेत विसावलेला आणि माणदेशी बोलीबरोबरच आहार-विहार जपणारा खानापूर-आटपाडी तालुके. घाटावरची बोली वेगळी आणि माणगंगा काठची वैराण बोडयया माळरानावरची वेगळी असली तरी संस्कृती जपणारी आणि खरसुंडीच्या सिध्दनाथाच्या सानिध्यात गुण्यागोविंदाने नांदणारी हे दोन तालुके. पाण्याअभावी शेतीत संसाराचा गाढा चालविणे अवघड म्हणून किमान चार घराआडचा एक तरी कर्ता देशांतर करून गलाई व्यवसायात देशाच्या विविध भागात स्थिरावलेला. तरीही गावच्या जत्रेसाठी आवर्जुन गावी पायधूळ झाडणारा दुकानदार म्हणून ओळख जपत आलेला. पण गेल्या आठ-दहा वर्षात या भागात टेंभू सिंचन योजनेचे पाणी आली आणि त्याबरोबर उघडी बोडकी माळरानेही हिरवी होउ लागली.
खानापूरची संस्कृती घाटावरची पण, आटपाडी तालुका माणदेशाशी नाते सांगणारा. सिंचन योजनेचे पाणी येण्यापुर्वीच येथील कष्टाळू शेतकर्यांनी लाल चुटुक डाळिंब उत्पादनात आघाडी घेतली आहे. अलिकडच्या काळात बदलत्या हवामानामुळे तेल्याच्या संकटात पिचला गेला असला तरी मुळची कष्टाळूपणाची आब राखत नव-नवीन व्यवसायात स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. विटा आणि परिसरात तर पोल्ट्री व्यवसायाने चांगलेच बाळसे धरले आहे. शेतीला जोड धंदा म्हणून विटा परिसरात पोल्ट्री आणि गलाई व्यवसाय स्थिरावला तसा आटपाडी तालुययाने खिलारी बैलांची जपणूक आणि शेळी मेंढी पालनावर भर दिला. यातून संसाराची चटणी भाकरीची सोय तर झालीच पण आजही व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडीची साक्ष देत काही गावे जगत आहेत. आटपाडीतील उत्तरेश्वर मंदिर परिसरात चवदार मटणासाठी प्रसिध्द असलेला शेळ्यामेंढ्याचा बाजार लाखोंची उलाढाल करत गरीबाघराच्या लेकीबाळींची थाटात लग्ने करण्यास मदत करणारा ठरला आहे.
हेही वाचा : भिवंडी पश्चिमेत मत विभाजन टाळण्याचे मविआपुढे आव्हान
गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, ना.सी. इनामदारपासून या साहित्यिकांची खाण असलेला आटपाडी तालुका आणि यंत्रमाग, पोल्ट्री व्यवसायाचे जाळे असलेला विटा-खानापूर या दोन तालुक्याचा मिळून तयार झालेला खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघ. लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना होण्यापुर्वी हे दोन तालुके पंढरपूर लोकसभा मतदार संघात होते, आता मात्र सांगली लोकसभा मतदार संघात आहेत. यानंतर या मतदार संघाची राजकीय पुनर्रचनाच झाली.
खानापूरच्या संपतराव नाना माने यांनी या भागाचे नेतृत्व केले. यानंतर विट्यातील हणमंतराव पाटील यांनीही नेतृत्व केले. माने व पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष बराच काळ सुरू होता. मात्र, या संघर्षात आटपाडी तालुक्याला कधी संधी मिळालेली नव्हती. तथापि, राज्यात भाजप- शिवसेना युतीची सत्ता आली त्यावेळी म्हणजे १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत संपतराव नानाचे राजकीय वारसदार म्हणून पुढे आलेल्या अनिल बाबर यांना पराभूत करून आटपाडीच्या देशमुख वाड्यातील राजेंद्रअण्णा देशमुख अपक्ष म्हणून निवडून आले. सांगली जिल्हयात प्रस्थापित राजकारणाविरूध्द निर्माण झालेल्या असंतोषातून १९९५ मध्ये पाच अपक्ष निवडून आले होते. यामध्ये शिराळ्यातून शिवाजीराव नाईक, कवठेमहांकाळमधून अजितराव घोरपडे, जतमधून मधुकर कांबळे, वांगी-भिलवडीमधून संपतराव देशमुख यांच्यासोबत आटपाडीच्या राजेंद्रअण्णा देशमुख यांनी परिवर्तन घडविले होते. युतीला पाठिंबा देण्याच्या बदल्यात टेंभू योजनेला यावेळी मान्यता व मंजुरी मिळाली होती. आणि त्याचीच फळे आज या दुष्काळी तालुक्याना मिळत आहेत.
गेल्या निवडणुकीत आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सलग दुसरा विजय मिळवला. यावेळी त्यांनी पारंपारिक विरोधक सदााशिवराव पाटील यांना पराभूत केले. या मतदार संधात तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळातील गावांचाही समावेश असल्याने या गावातील कल महत्वाचा मानला जातो. गेल्या निवडणुकीमध्ये अनिल बाबर यांना ५३.९४ टक्के म्हणजे १ लाख १६ हजार ९७४ मते मिळाली होती, तर विरोधी काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांना ९० हजार ६८३ म्हणजेच ४१.८१ टक्के मतदान मिळाले होते. आजपर्यंत या मतदार संघावर १९९५ ची निवडणुक वगळता खानापूर तालुक्याचेच वर्चस्व राहिले आहे. आटपाडीतील देशमुख वाड्यावरचा ज्यांना आशीर्वाद मिळेल त्याचा विजय निश्चित मानण्याची प्रथा आहे.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठरेना
यावेळी मात्र राजकीय परिस्थिती बदलत असल्याचे दिसत आहे. या भागाचे चार वेळा प्रतिनिधीत्व केलेले अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाल्याने पोकळी निर्माण झाली आहे. आटपाडीमध्ये स्वत:चा गट म्हणून बाबर यांनी तानाजी पाटील यांना कायम साथ केली. मात्र, तानाजी पाटील यांनी माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेउन कारखान्याची सत्ता हाती घेतली आहे. कारखाना उभारणीमध्ये स्व. बाबासाहेब देशमुख यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. तर त्यावेळी त्यांना सांगोल्यातून स्व.गणपतराव देशमुख याचीही साथ मिळाली होती. आता हा इतिहास झाला आहे.
स्व. आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत राज्यात सत्तांतर घडवून आणण्यात मोलाची साथ केली. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे या मतदार संघावर बारकाईने लक्ष आहे. बाबर यांचे वारसदार म्हणून सुहास बाबर पुढे आले आहेत. यापुर्वी त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. सामाजिक व राजकीय कामाचे धडे त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्यांना राजकीय वारसदार म्हणून शासन दरबारीही चांगली साथ मिळत आली असून कोट्यावधींचा विकास निधी शासनाकडून मिळाला असून टेभू योजनेच्या विस्तारित कामाना या कालावधीत मंजुरी मिळाल्याने पाणीदार आमदारांचे पाणीदार वारसदार म्हणून ते मतदारांना सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा : बौद्ध दलित समाजाच्या नाराजीचे भंडारा मतदारसंघात काँग्रेससमोर आव्हान!
दुसर्या बाजूला माजी आमदार पुत्र आणि विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हेही कोणत्याही स्थितीत मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष असले तरी त्यांनी महायुतीमध्ये जागा मिळणार नाही असे गृहित धरून खा.शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. जर शिवसेना ठाकरे पक्षाला जागा मिळाली तर हाती मशाल घेण्याची तयारीही ठेवली आहे. यामुळे या मतदार संघामध्ये बाबर विरूध्द पाटील ही पारंपारिक लढत अपेक्षित आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे गाव आटपाडी तालुक्यात असल्याने त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर हेही उमेदवारीसाठी आग्रही आहेत. बाबर यांना सहानभुती सध्या दिसत असली तरी आटपाडीचे वजन कोणाच्या बाजूला राहते यावर यशापयशाचे गणित अवलंबून राहणार आहे.