सांगली : विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होण्याची चिन्हे बहुसंख्य मतदार संघामध्ये दिसत असताना खानापूर-आटपाडीमध्ये मात्र महायुतीत असलेल्या बाबर-पाटील या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यामध्येच चुरशीची लढत होईल असे दिसत आहे. या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे अनिल बाबर यांच्या निधनानंतर बाबर गटाची धुरा त्यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याकडे आली असून त्यांची लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याशी सामना होताना दिसत आहे. दोन्ही गटाकडून विधानसभेची जय्यत तयारी सुरू असून यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आटपाडीची ताकद आंबड म्हणून कोणाच्या पारड्यात पडते यावर बरीच गणिते अवलंबून राहणार आहेत.
या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे अनिल बाबर यांचे जानेवारीमध्ये आकस्मिक निधन झाल्यानंतर या गटाची जबाबदारी सुहास बाबर यांच्यावर आली. बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठता दाखवली होती. शिवसेनेतून बाहेर पडत असताना शिंदे यांच्या पाठीशी राहण्याचा बाबर यांचा निर्णय सर्वप्रथम आला होता. शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी आटपाडीमध्ये झालेल्या मेळाव्यात याचे सूतोवाच बाबर यांनी सांगोल्याचे शहाजीबापू पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांच्या साक्षीने केले होते. या मेळाव्यानंतर केवळ चार महिन्यातच राज्यात राजकीय उलथापालथ झाली होती.
हेही वाचा…मुंबईतून ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सहा लाख अर्ज; प्रतितास ४० अर्जांची छाननी करण्याचे आदेश
अनिल बाबर यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांनीही हा स्नेह जोपासला असून शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून बाबरांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडेच पाहिले जात असल्याचे मतदार संघात विकास कामासाठी गेल्या सहा महिन्यात मिळालेल्या विकास निधीवरून दिसून येते. आटपाडी, खानापूर या नगरपंचायतीसह विटा शहरातील नळपाणी योजनांना मिळालेली मंजूरी आणि यासाठी मिळालेला सुमारे २०० कोटींचा निधी, विटा बसस्थानकासाठी नवीन इमारतीला मिळालेली मान्यता, मतदार संघातील १४२ रस्त्यासाठी ७७७ कोटींचा मिळालेला निधी ही गेल्या सहा महिन्यातील विकास कामांची यादी घेऊन बाबर लोकांच्यात जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक त्यांच्या राजकीय पुढील वाटचालीस पोषक ठरणारी आहे.
दुसर्या बाजूला पारंपारिक विरोधक असलेले अॅड. वैभव पाटील यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश करून आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. दोघेही महायुतीत असलेल्या घटक पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली असून पक्ष विस्ताराबरोबरच मतदार संघातही निवडणुकीची त्यांची तयारी सुरू आहे. दादांच्या नेतृत्वाचा लाभ मतदार संघासाठी व्हावा यासाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला मंजूर करण्यासाठीचे प्रयत्न तर आहेतच, पण प्रामुख्याने टेंभू योजनेच्या माध्यमातून राजेवाडी तलाव भरून देण्यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे. राजापूर तलाव भरला तर आटपाडी तालुक्याच्या पूर्व भागातील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. याचबरोबर टेंभूच्या पाण्याचे साठवण तलाव भरून घेतले जातात. मात्र, वितरिका नादुरूस्त असल्याने पाणी उपलब्ध असूनही त्याचा लाभ शेतकर्यांना होत नाही. याकडे त्यांनी अजितदादांचे लक्ष वेधले, यामुळे या कामाच्या सर्व्हेक्षणााचे आदेश शासनाने दिले आहेत.
हेही वाचा…वाझेचा देशमुखांवर वसुलीचा आरोप; पोलीस अधिकाऱ्याचा पुन्हा पत्रप्रपंच
अनिल बाबर यांचे वारसदार आणि खानापूर-आटपाडीची हक्काची जागा म्हणून याठिकाणी शिवसेनेचाच प्राधान्याने हक्क राहणार असल्याने पाटील यांच्यासाठी महायुतीतून हा मतदार संघ मिळणार का हा खरा प्रश्न आहे. मात्र कोणत्याही स्थितीत मैदानात उतरायचेच यासाठी पाटील यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. आटपाडीच्या विकास कामात लक्ष देत असतानाच तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळातही त्यांचा राबता वाढला आहे. विटा नगरपालिकेवर पाटील गटाचे तर ग्रामीण भागात बाबर गटाचे वर्चस्व आतापर्यंत राहिले असून स्वच्छता अभियानात विटा नगरपालिकेने देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावला होता. यामुळे सामाजिक कामाचा पाटील घराण्यालाही वारसा अगदी स्व.हणमंतराव पाटील यांच्यापासून आहे. त्यामुळे राजकीय घराण्यातून येणार्या बाबर-पाटील या पारंपारिक राजकीय विरोधकांतील या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार असे दिसते.
हेही वाचा…कारण राजकारण: पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये ‘काट्या’ची लढत?
या मतदार संघामध्ये आटपाडीतील देशमुख यांचा गट कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतो यावरही यामतदार संघाचे राजकीय गणित निश्चित होणार आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितपवार गट यांच्यात जागा मिळविण्यासाठी चढाओढ तर राहणारच पण याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरही या मतदार संघासाठी आग्रही असून त्यांनीही तयारी सुरू केली आहे. म्हणजे महायुतीत घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा खानापूर-आटपाडीसाठी आग्रह राहणार आहे. महाविकास आघाडीत मात्र, या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद मर्यादित दिसत आहे. यामुळे शिवसेना उबाठा गटाला ही जागा मिळण्याची चिन्हे आहेत. उबाठा शिवसेनेने तसा दावाही केला आहे. मात्र, कितीही उमेदवार मेदानात आले तरी पक्ष बाजूला ठेवून बाबर-पाटील असाच सामना रंगणार हे लोकांनीही आता गृहित धरले आहे.