काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांचा संयम सुटल्यामुळे कर्नाटकच्या निवडणुकीत राष्ट्रीय मुद्द्यावर लढवण्याची भाजपची खेळी यशस्वी झाल्याचे दिसू लागले आहे. काँग्रेसने आत्तापर्यंत भाजप सरकारचा भ्रष्टाचार वगैरे स्थानिक मुद्द्यांवर प्रचार केंद्रीत केला होता. पण, मोदींची तुलना ‘विषारी सापा’शी करून खरगेंनी भाजपच्या हाती कोलीत दिले आहे. आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रचार दौरेही सुरू होत आहेत, ही बाबही लक्षात घेण्याजोगी आहे.
खरगेंचा मोदींविरोधातील राग त्यांच्या बालेकिल्ल्यात आपल्या लोकांसमोर बोलताना उफाळून आला. खरगेंची जाहीरसभा झालेला कळबुर्गी हा परिसर त्यांच्या गुलबर्गा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खरगेंना इथे पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची सल खरगेंच्या मनातून आजही जात नाही. आपल्याविरोधात कुभांड रचून भाजपने आपल्यावर मात केल्याचा आरोप खरगेंनी अनेकदा केलेला आहे. राज्यसभेत खरगेंनी मोदींच्या उपस्थितीत भाजपवर थेट आरोप केले होते. या परिसरात मोदींचे दौरे झाले होते, इथे केंद्राच्या योजना पोहोचवण्यावर भाजपने अधिक भर दिला होता. त्याचा उल्लेख मोदींनी राज्यसभेत खरगेंना उत्तर देताना केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जखम भरली नसावी असे दिसते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या निमित्ताने पुन्हा एकदा या जखमेवरील खपली निघाली आणि खरगेंनी मोदींविरोधात थेट तोफ डागली.
हेही वाचा – पुण्यात पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच कलह
गुजरातच्या विधानसभा निवडणुकीतही खरगेंनी मोदींना ‘रावण’ म्हटले होते. पण, गुजरातमध्ये काँग्रेसला गमावण्याजोगे काहीच नव्हते. तिथे काँग्रेसने निवडणुकीकडे दुर्लक्ष केले होते. तिथे राहुल गांधींनी फक्त दोन दिवस प्रचार केला होता. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची अख्खी फळी प्रचारात उतरलेली आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आत्तापर्यंत तरी मोदींवर थेट टीका करणे टाळले आहे. बसवराज बोम्मई सरकार म्हणजे ‘४० टक्के कमिशनचे सरकार’ या भ्रष्टाचाराच्या एकाच मुद्द्याभोवती काँग्रेसने प्रचार केंद्रीत केला आहे. भाजपमधील बंडखोर नेतेही त्यांच्या मदतीला आले आहेत. कर्नाटकमध्ये परिस्थिती काँग्रेससाठी अनुकूल असून स्थानिक प्रश्नांवर प्रचाराची दिशा कायम राहिली तर अपेक्षित यश मिळण्याची शक्यता असू शकेल. पण, खरगेंनी अचानक मोदींवर टीका केली, तीही इतकी विखारी की भाजपच्या नेत्यांची फौज मोदींच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. गुजरातमधील खरगेंनी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती कर्नाटकमध्ये अखेरच्या दहा दिवसांमध्ये काँग्रेसला त्रासदायक ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा – वोक्कलिग मतदारांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ प्रचार मैदानात
दिल्लीमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या निवडीवर घमासान सुरू असताना पक्षामध्ये कर्नाटकबद्दल साशंकता होती. कर्नाटकमध्ये भाजपला सत्ता राखायची असेल तर मोदींचा चेहरा हा एकमेव पर्याय हाती उरलेला आहे. भाजपला राष्ट्रीय मुद्द्यांवर लढावे लागेल, स्थानिक मुद्दे प्रभावी ठरले तर, भाजपचा पराभव कोणालाही रोखता येणार नाही, अशी चर्चा होत होती. कर्नाटकमध्ये भाजपला मोदी विरुद्ध राहुल असा सामना घडवून आणायचा होता. पण, आत्तापर्यंत तरी भाजपला या रणनितीमध्ये यश आले नव्हते. त्यामुळे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा असो वा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी काँग्रेसच्या सरकारांमधील भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे मुद्दे उकरून काढले. पुन्हा जातीय दंगली भडकतील, मुस्लिमांचे लांगुनचालन होईल, अशी भीती दाखवण्यास सुरुवात केली. एकप्रकारे कर्नाटकमधील स्थानिक मुद्द्यांवरून निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर नेण्याचा प्रयत्न केला गेला. मोदींच्या प्रचारसभांपूर्वी नड्डा-शहांनी कर्नाटकची जमीन नांगरून ठेवली. काँग्रेसच्या नेत्यांनी नड्डा-शहांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देण्याची भाजप वाट पाहात होता. खरगेंनी थेट मोदींवरच शेरेबाजी केल्याने अवसान गळत चाललेल्या भाजपमध्ये नवा हुरूप भरणार नाही याची दक्षता काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे काँग्रेसचे लक्ष मोदींच्या भाषणांकडे असेल