लोकसभा निवडणुकीच्या या प्रचारामध्ये विविध प्रकारच्या घोषणांमुळे मोठी रंगत आली आहे. त्यातीलच एक घोषणा म्हणजे ‘खटाखट… खटाखट… खटाखट….’ची घोषणा! खरे तर राहुल गांधींनी सुरू केलेल्या या ‘खटाखट’ घोषणेची री ओढून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जनसमुदायाचा प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत हा सिलसिला चालूच राहिला आणि यमक जुळवत तयार झालेल्या अशा अनेक शब्दांनी प्रचाराची रंगतही वाढली. इंडिया आघाडी सत्तेत आली तर आम्ही प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला वर्षाकाठी एक लाख रुपये देऊ, असे आश्वासन देताना राहुल गांधी यांनी सर्वांत आधी ‘खटाखट’ या शब्दाचा वापर केला. त्यांच्या या ‘खटाखट’ घोषणेला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यावर प्रत्युत्तर देत आपल्या सभेत नरेंद्र मोदींनीही ‘टकाटक’चा प्रयोग केला. ‘खटाखट-टकाटक’ अशा माध्यमातून निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे शाब्दिक द्वंद्वयुद्ध पहायला मिळाले.
राहुल गांधींच्या ‘खटाखट’ शब्दाला वारेमाप प्रसिद्धी
११ एप्रिल रोजी राजस्थानमधील अनूपगढ येथे एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी सर्वप्रथम या शब्दाचा वापर केला. ते काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘महालक्ष्मी योजने’ची माहिती जनसमुदायाला देत होते. ते म्हणाले की, “काँग्रेसचे सरकार भारतातील प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यात वर्षाला एक लाख रुपये जमा करेल. जर तुम्ही दारिद्र्यरेषेच्या खाली असाल तर दर महिन्याला साडेआठ हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये ‘खटाखट खटाखट खटाखट’ येत राहतील. आम्ही एका झटक्यात भारतातील गरिबी हटवून टाकू.”
हेही वाचा : एकमेकांवर टीका करणाऱ्या तृणमूल-भाजपाने अचानक डाव्यांकडे का वळवला आहे मोर्चा?
जवळपास दीड महिना सुरू असलेल्या या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वेगवेगळ्या प्रकारचे शाब्दिक युद्ध रंगलेले दिसून आले. मात्र, त्यातील ‘खटाखट’ या शब्दाला आणि त्यातून निर्माण झालेल्या यमक शब्दांनाच भरपूर प्रसिद्धी मिळाली. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ‘खटाखट’ला यमक जुळवत ‘फटाफट’, ‘टकाटक’ आणि ‘सफाचट’सारखे शब्दप्रयोगही केले. त्यामुळे संपूर्ण देशभरातील प्रचारामध्ये हा चर्चेचा विषय ठरला.
पंतप्रधान मोदींची राहुल-अखिलेश यांच्यावर ‘टकाटक’ टीका
राहुल गांधींच्या प्रत्येक वक्तव्यावर भारतीय जनता पार्टी बारीक नजर ठेवून असते. त्यांनी भाषणात केलेल्या वक्तव्यांवरून त्यांच्यावर टीका करण्याची तसेच खिल्ली उडवण्याची एकही संधी भाजपा सोडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या याच ‘खटाखट’ला प्रत्युत्तर देत २९ एप्रिल रोजी पुण्यातील एका प्रचारसभेत म्हटले की, “गरिबी कशी हटवायची ते काँग्रेसच्या ‘शहजाद्या’ला (राजकुमाराला) विचारा. तो तुम्हाला उत्तर देईल ‘खटाखट-खटाखट… ‘ प्रगती कशी होईल ते त्याला विचारा, तो म्हणेल ‘टकाटक-टकाटक…’ विकसित भारतासाठी काही योजना आहेत का ते विचारा, तो म्हणेल ‘टकाटक-टकाटक… ‘ काँग्रेसच्या शहजाद्याचे शब्द फारच खतरनाक आहेत”, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. १३ मे रोजी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’वर टीका करत ‘X’वर एक ट्विट केले. त्या म्हणाल्या की, ” ‘खटाखट’ योजनेमुळे वर्षाला किती खर्च होईल, याची त्यांनी गणती केली आहे का? ‘खटाखट’ योजना अमलात आणण्यासाठी आधीपासून अस्तित्वात असलेल्या किती सरकारी योजना राहुल गांधी बंद करणार आहेत?”
त्यानंतर उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथील एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा याच ‘खटाखट’ शब्दाचा वापर करत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावक टीकास्त्र डागले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दोघांचाही उल्लेख ‘शहजादा’ असा केला. ते म्हणाले की, “‘पंजा’ (काँग्रेसचे निवडणूक चिन्ह) आणि ‘सायकल’च्या (सपाचे निवडणूक चिन्ह) स्वप्नांचा आता ‘खटाखट-खटाखट’ चक्काचूर झाला आहे. ४ जूननंतर ‘खटाखट-खटाखट’ पराभवाचे खापर कुणाच्या डोक्यावर फोडायचे याबाबत ते आतापासूनच नियोजन करत आहेत.” पुढे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या परदेशी जाण्यावरूनही पंतप्रधान मोदींनी टीका केली. ते म्हणाले की, “कुणीतरी मला असेही सांगत होते की, परदेशी जाण्यासाठी विमानाची तिकिटेदेखील खटाखट-खटाखट बूक केली जातात.”
अखिलेश यादव यांचेही ‘खटाखट’ प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या टीकेला अगदी काहीच दिवसांमध्ये अखिलेश यादव यांनी प्रत्युत्तर दिले. १८ मे रोजी रायबरेलीतील सभेत अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करण्यासाठी फरार उद्योगपती विजय माल्ल्या आणि नीरव मोदींचा उल्लेख केला. या फरार उद्योगपतींना भारतात परत आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, “आम्ही परदेशी जाऊ, असे मोदी म्हणत आहेत. मात्र, देशातील जनतेला चांगलंच ठाऊक आहे की, त्यांनीच त्यांच्या मित्रांना एकापाठोपाठ एक परदेशी पाठवले आहे. त्यांचे मित्र एकामागून एक ‘खटाखट-खटाखट’ परदेशी पळून गेले.”
त्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या या गाजलेल्या शब्दाचा वापर पुन्हा एकदा केला. त्यांनी हरियाणामधील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदींची अदाणींबरोबर पार्टनरशीप असल्याचा उल्लेख केला. अग्निवीर योजनेवरूनही केंद्र सरकारवर टीका केली. तसेच इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशीही घोषणा केली. आपल्या भाषणामध्ये राहुल गांधींनी ‘खटाखट’चा वापर अनेकदा केला. ते म्हणाले की, “ज्याप्रमाणे गाडीला चालवण्यासाठी त्यामध्ये इंधन टाकले जाते, अगदी त्याचप्रमाणे ५ जून रोजी आम्ही अर्थव्यवस्थेची गाडी सुरू करणार आहोत. भारताची अर्थव्यवस्था एका उंचीवर जाईल आणि देशातील महिलांच्या खात्यामध्ये ८,५०० रुपये खटाखट-खटाखट यायला लागतील.” हिमाचल प्रदेशामधील एका प्रचासभेत राहुल गांधी काँग्रेसच्या गॅरंटीबाबत बोलत होते. ते म्हणाले की, “५ जून रोजी कोट्यवधी महिलांना ८,५०० रुपये मिळतील. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी… टकाटक… टकाटक… टकाटक… पैसे येत राहतील.”
हेही वाचा : केंद्रात कुणीही असो, निवडणुकीत पंजाब राहतो नेहमी विरोधातच; काय आहे हा इतिहास
तेजस्वी यादव यांचीही ‘खटाखट’ प्रकरणात सर्जनशीलता
इंडिया आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही ‘खटाखट’ प्रकरणामध्ये आपली भर घातली. २३ मे रोजी त्यांनी असा दावा केला की, बिहारमध्ये इंडिया आघाडीचा विजय होणार असल्याकारणानेच भाजपाचे नेते वारंवार बिहारला भेट देत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, “वातावरण टनाटन-टनाटन, भाजपा सफाचट-सफाचट (नेस्तनाबूत)… इंडिया आघाडीला मते मिळत आहेत टकाटक-टकाटक….” बिहारमधील बख्तियारपूरमध्ये २७ मे रोजी एका प्रचारसभेत बोलताना तेजस्वी यादव यांनी आपली सर्जनशीलता दाखवत खटाखट प्रकरणामध्ये आणखी भर घातली. त्यामुळे या सभेत उपस्थित असलेल्या राहुल गांधींच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले. तेजस्वी यादव म्हणाले की, “तुमच्यातील उत्साह ठेवा टनाटन-टनाटन, नोकरी मिळेल फटाफट-फटाफट, भगिनींच्या खात्यात लाख रुपये जातील खटाखट-खटाखट, आता भाजपा होईल सफाचट-सफाचट…”