दक्षिणेतील राजकारणात चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा प्रभाव पडतो. तमिळनाडूत एम. जी. रामचंद्रन, जयललिता, करुणानिधी ते आंध्र प्रदेशात एन. टी. रामराव यांनी चित्रपटसृष्टीतील लोकप्रियतेच्या जोरावर राजकारणात ठसा उमटवला. अजूनही हाच कल काही प्रमाणात सुरू आहे. कलावंतांच्या लोकप्रियतेचा लाभ घेण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न असतो. कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभा निवडणूक होत आहे. सत्ताधारी भाजपविरोधात काँग्रेस यांच्यात चुरस आहे. यात भाजपने लोकप्रिय अभिनेता किच्चा सुदीप याला प्रचारात उतरवले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याबाबतची घोषणा केली. बोम्मई यांचे त्याने कौतुक केले. आता सुदीपच्या या भूमिकेवरून वादही सुरू झाला. सुदीप याला चौकशी यंत्रणांची भीती वाटते काय ? असा सवालही काही विरोधी गोटातील कलावंतांनी विचारला. कर्नाटकमध्ये सुदीप याचा चाहता वर्ग आहे, त्याचा फायदा करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सुदीपची ताकद काय ?
५० वर्षीय सुदीप किंवा किच्चा सुदीप या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कलावंताने कन्नडबरोबरच हिंदी तसेच तेलुगु चित्रपटांतही काम केले आहे. सर्वाधिक मानधन घेणारा तसेच फोर्बच्या पहिल्या शंभर कलावंतांच्या यादीत झळकलेला तो पहिला कन्नड अभिनेता. याखेरीज दिग्दर्शन तसेच निर्मिती क्षेत्रातही योगदान दिले आहे. सातत्याने विविध पुरस्कार मिळवले आहेत. दूरचित्रवाणीवर विविध कार्यक्रमांचे खुमासदार सूत्रसंचालन करून लोकप्रियता मिळवली. हरहुन्नरी कलाकार म्हणून कर्नाटकमध्ये तो लोकप्रिय आहे. वाल्मिकी नायक समुदायातून तो येतो. सुदीपला मानणारा मोठा वर्ग आहे. ही लोकप्रियता पाहता भाजपला याचा लाभ मिळेल काय ? याची चिंता विरोधकांना आहे. कलावंतांनी प्रचार केल्यावर मते खेचली जातात असा अनुभव आहे. सुदीपच्या जाहिराती बंद करा अशी मागणी धर्मनिरपेक्ष जनता दलाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा – कर्नाटकमध्ये बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची धडपड
विरोधकांचे टीकेचे बाण
सुदीपने निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ पक्षाचा प्रचार करू अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री किंवा भाजप नेत्यांना ऐकण्यासाठी जनता येणार नसल्याने भाजपला कलावंतांचा आधार घ्यावा लागत आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. त्याला भाजपनेही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान कर्नाटकमध्ये कलावंतांची सहभागाची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली. कलावंतांच्या प्रचारावरून टीकेचे बाण सुटत आहेत. सुदीपने कष्टाने प्रतिमा निर्माण केली आहे. त्याला घराणेशाहीचा लाभ मिळत नाही, असा टोला भाजप प्रवक्त्यांनी लगावला आहे. एकूणच सुदीपच्या भाजप प्रचाराने आरोप-प्रत्यारोपांना रंग चढला आहे.