भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून) पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. ते तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्याबरोबर एनडीएतील घटक पक्षांच्या निवडून आलेल्या अनेक उमेदवारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपाप्रणित एनडीए सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती. या नव्या सरकारमध्ये कुणाचा समावेश होणार आणि कुणाचे मंत्रिपद जाणार याविषयीच्या तर्कवितर्कांना उधाण आले होते. भारतीय जनता पार्टीला या लोकसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेले नसल्याने सत्तेवर राहण्यासाठी एनडीएतील घटकपक्षांचा आधार फार महत्त्वाचा आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) होय. या पक्षाला या निवडणुकीमध्ये १६ जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार, एनडीए सरकारमध्ये टीडीपीच्या दोन सदस्यांना मंत्रिपदे मिळाली आहेत. यातीलच एक सदस्य हा एकूणच एनडीए सरकारमधील सर्वांत तरुण मंत्री ठरला आहे.

हेही वाचा : पुण्यातील मोहोळ राजकारणाच्या आखाड्यातीलही यशस्वी ‘पैलवान’

टीडीपीचे दोन सदस्य मंत्रिमंडळात

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी होतात. या दोन्ही निवडणुकांमध्ये टीडीपी पक्षाने दमदार यश मिळवत पुनरागमन केले आहे. टीडीपीने आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १६ जागांवर पक्षाला यश मिळाले आहे. या जागांसह टीडीपी हा एनडीए आघाडीमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. आंध्र प्रदेशमध्ये भाजपाने टीडीपी आणि जनसेना पार्टीबरोबर निवडणूक लढवली होती. भाजपाला आंध्र प्रदेशमध्ये तीन तर जनसेना पार्टीला दोन जागा मिळाल्या आहेत. आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये टीडीपीला १७५ पैकी तब्बल १३५ जागांसह घवघवीत यश मिळाले आहे; तर जनसेना पार्टीला २१ आणि भाजपाला ८ जागा मिळाल्या आहेत. सत्ताधारी युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पक्षाने (वायएसआरसीपी) उर्वरित लोकसभा आणि विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत. हा पक्ष आता सत्तेवरुन पायउतार झाला असून राजकीय अस्ताला गेलेल्या टीडीपीने राज्यात तसेच देशाच्या राजकारणात जबरदस्त पुनरागमन केले आहे. टीडीपी नेते किंजरापू राम मोहन नायडू आणि डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत केंद्रातील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते आता एनडीए सरकारचे मंत्री असणार आहेत. यामधील किंजरापू राम मोहन नायडू यांचे वय फक्त ३६ असून ते नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील सर्वांत तरुण मंत्री ठरले आहेत.

राम मोहन नायडू सर्वांत तरुण मंत्री

राम मोहन नायडू हे आंध्रच्या श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी वायएसआरसीपीचे उमेदवार पेराडा टिलक यांच्या विरोधात ३,२७,९०१ च्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. ३६ वर्षीय राम मोहन नायडू यांनी एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. द हिंदूच्या वृत्तानुसार, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळातील ते सर्वात तरुण सदस्य असतील. राम मोहन नायडू हे टीडीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. यापूर्वीच्या १७ व्या लोकसभेतही ते आपल्या पक्षाचे नेते होते. माजी केंद्रीय मंत्री के येरान नायडू यांचे ते सुपुत्र आहेत. राम मोहन नायडू यांनी पर्ड्यू विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तसेच लाँग आयलँड विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. २ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांचे वडील आणि टीडीपीचे ज्येष्ठ नेते येरान नायडू यांचे रस्ते अपघातात निधन झाले; तेव्हा राम मोहन नायडू सिंगापूरमध्ये नोकरीला होते.

हेही वाचा : साडेतीन दशकांत अकोल्यात प्रथमच काँग्रेसची ताकद वाढली

२६ व्या वर्षी राजकारणात

या शोकांतिकेनंतर आपल्या वडिलांचा राजकीय वारसा स्विकारत राम मोहन यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी २०१४ मध्ये वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी प्रथमच श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते जिंकले. त्या वेळी ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण खासदार ठरले होते. टीडीपी पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचा राजकारणातील उदय सहजसोपा झाला. खासदार म्हणून राम मोहन हे विविध संसदीय स्थायी समित्यांचे सदस्य राहिले आहेत. २०२० मध्ये, संसद सदस्य म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना ‘संसद रत्न पुरस्कार’ही मिळाला आहे.

राम मोहन नायडू हे पुरोगामी विचारांचे मानले जातात. त्यांच्या स्त्रीवादी विचारांमुळेही ते चर्चेत आले होते. २०२१ मध्ये, राम मोहन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नऊ दिवसांची पितृत्व रजा मागितली तेव्हा ते अधिक चर्चेत आले होते. त्याच्या या कृतीमुळे बाळाच्या संगोपनामध्ये आईबरोबरच वडिलांच्या भूमिकेवरही चर्चा सुरु झाली. पितृत्व रजा मागण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की, “बाळाचे संगोपन ही केवळ आईची जबाबदारी असता कामा नये. आमच्या बाळाची काळजी घेण्यासाठी मी त्याच्या आईइतकेच योगदान देऊ इच्छितो.” ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, संसदेत मासिक पाळीविषयीचे आरोग्य आणि लैंगिक शिक्षणाचे समर्थन करणारे ते पहिले खासदार आहेत. त्यांनी सॅनिटरी पॅड्सवर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) काढून टाकण्याचीही मागणी केली होती. एएनआयशी बोलताना राम मोहन नायडू यांनी म्हटले होते की, “आंध्र प्रदेशातील मुस्लिमांसाठी चार टक्के राखीव जागा देण्याच्या आश्वासनावर टीडीपी पक्ष ठाम आहे. आंध्र प्रदेश असो वा तेलंगणा असो, तेलुगू लोक कुठेही असले तरीही त्यांच्या विकासासाठी काम करणे हे पक्षाचे ध्येय आहे.” केंद्रातील एनडीए सरकारमध्ये टीडीपीला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “दीर्घ काळानंतर टीडीपीला केंद्रीय मंत्रिपद मिळेल. आम्ही खूप आनंदी आहोत.”