सुहास सरदेशमुख
शिवसेनेतील बंडाळीनंतर शहराचा पक्षीय कारभार स्वतंत्र असावा म्हणून नवी रचना करण्यात आली असून औरंगाबाद महानगरप्रमुख पदी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कारभार स्वतंत्र असेल, असे मानले जात आहे. कोणाच्याही हाताखाली अशी या पदाची रचना नसल्याने महापालिका निवडणुकीपूर्वीचे हे बदल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. शिवसेनेच्या कार्यशैली व रचनेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना आता नवे बदल दिसून येत आहेत.
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी गेल्या वेळी किशनचंद तनवाणी हे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या कार्यपद्धतीचा भाजपला लाभच झाला होता. मात्र, पुढे तनवाणी यांना भाजपने कोणतेही मोठे पद दिले नाही. विधान परिषदेवर नियुक्ती न मिळाल्याने ते भाजपावर नाराज होते. महाविकास आघाडी कार्यकाळात ते पुन्हा शिवसेनेमध्ये परतले. गेली अनेक वर्षे औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्याकडेच होते. हे पद तनवाणी यांना देण्यात यावे अशी मागणही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. शिवसेना सत्तेत असल्याने त्यांना म्हाडाचे सभापती पद देण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, तनवाणी यांना बंडाळी होईपर्यंत कोणतेही पद मिळाले नव्हते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यक्रमातही ते अधून-मधूनच हजेरी लावत.बंडाळीनंतर नाराज तनवाणी यांची मानसिकता तळ्यात- मळ्यात अशी होती. तनवाणींच्या फोटोसह ‘ साहेब’, निर्णय घ्या’ असे फलकही त्यांच्या समर्थकांनी शहरभर लावले होते. त्यामुळे तनवाणी यांना पद दिले जाईल असे मानले जात होते. त्यांना आता महानगरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे पद पूर्वी औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे देण्यात आले होते. पण त्यांनी या पदाचे अधिकार फारसे वापरले नाहीत. आता ते शिंदेगटात गेले आहेत.
महापालिका निवडणुकीमध्ये स्वत: चे समर्थक असावेत असे प्रयत्न माजी आमदार तनवाणी सातत्याने करत हाेते. आता शिवसेनेकडून महानगरचीच जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. या नियुक्तीनंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना तनवाणी म्हणाले की, ‘महानगरप्रमख पदी नियुक्ती झाल्याने महापालिकेच्या तयारीची सर्वजण मिळून तयारी करू. कारभार जरी स्वतंत्र असला तरी सर्वांश समन्वयाने काम केले जाईल.’ औरंगाबाद महापलिकेत शिवसेनेच्या २८ जागा निवडून आल्या होत्या. या वेळी त्यात किमान दोन जागांची तरी भर पडेलच असा दावा अलिकडेच जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला होता. सेनेत पडझड झाली असली तरी महापालिकेत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आता नवी रणीनीती आखली जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेतील काही मोजकेच नेते चुकीच्या पद्धतीने काम करतात असा विरोधकांचा आरोप आहे. तेच महापालिका चालवितात. त्यामुळे शिवसेनेच्या कारभारावर टीका केली जात असे. मात्र, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्यामार्फत शिवसेनेला अडचणीच्या मुद्दयावर काम केले. शहरातील पाणी पुरवठ्याशिवाय इतर समस्यांवर शिवसेनेचे लक्ष आहे, असा संदेश देण्यातही ते यशस्वी ठरू लागले होते. गंठेवारीची समस्या तसेच रस्त्यांचे प्रश्नही त्यांच्या कार्यकाळात हाताळले गेले. पण सेनेतील बंडाळीमुळे चित्र पालटले असताना महापालिकेतील जागा राखण्याचे आव्हान सेनेसमोर असणार आहे. तनवाणी यांची नियुक्ती त्यामुळेच महत्त्वाची मानली जात आहे.