अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर सोहळ्यासाठी पाहुण्यांची यादी अत्यंत काळजीपूर्वक तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यातील १५० हून अधिक समुदायांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराने या कार्यक्रमाला दुसरे ‘राम मंदिर आंदोलन’ म्हटले आहे. यातून हिंदू समाजाला जातीच्या पलिकडे नेऊन एकत्र आणण्याच्या प्रयत्न होत आहे.
“प्रत्येक जिल्ह्यातील १५० हून अधिक समुदायांच्या प्रतिनिधींमध्ये दलित आणि आदिवासी समाजातील संतांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या व्यतिरिक्त सर्वात गरीब कुटुंबातील १० लोक, झोपडीत राहत असूनही राम मंदिर निधीसाठी १०० रुपये योगदान देणारे आणि मंदिर बांधणारे कामगार यांचाही या पाहुण्यांमध्ये समावेश आहे. हा कार्यक्रम संपूर्ण देशाचं प्रतिनिधीत्व करतो,” असं मत विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) अध्यक्ष आलोक कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना व्यक्त केले.
पाहुण्यांच्या यादीत ४,००० संत आणि सुमारे २,५०० प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश
कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या पाहुण्यांच्या यादीत ४,००० संत आणि सुमारे २,५०० प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. या यादीत हिंदू समाजातील सर्व घटकांना, विशेषत: उपेक्षितांना आणि पोटजातींनाही पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व मिळेल याची काळजी घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
‘जातनिहाय जनगणने’ला संघाकडून ‘सामाजिक समरसते’चं उत्तर
विश्व परिषद या कार्यक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘सामाजिक समरसता’ मोहिमेला बळ देत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी संघाकडून सामाजिक समरसता मोहिल जोरकसपणे चालवली जात आहे. दुसरीकडे भाजपाला घेरण्यासाठी विरोधक ‘मंडल’चा मुद्दा मांडण्यात कमी पडत आहेत. याचवेळी संघ आक्रमकपणे ‘कमंडल’चा उपयोग करून हिंदू समाजातील विविध जाती एक असल्याचं चित्र उभं करत आहे.
“राम मंदिर शिलापुजन दलित व्यक्तीकडून”
विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, मंदिर आंदोलनाचा मुख्य उद्देश हिंदू समाजाला एकत्र आणणे आहे. “१९८४ मध्ये राम मंदिराच्या शिलापुजनाची चर्चा होत होती, तेव्हा शंकराचार्य किंवा विहिंपचे तत्कालीन आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अशोक सिंघल हे शिलापुजन करतील असे सर्वांना वाटले. मात्र, अशोक सिंघल यांनी शिलापुजन करण्यास नकार दिला आणि शिलापुजन दलित समाजातील विहिंपचे नेते कामेश्वर चौपाल यांना करण्याची संधी दिली. याच समुदायासाठी प्रभू राम १४ वर्षे लढले.” चौपाल यांना नोव्हेंबर १९८९ मध्ये वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करण्यासाठीही निवडण्यात आले होते.
“जातीच्या आधारावर संतांची विभागणी करत नसलो, तरी…”
विहिंपचे प्रवक्ते बन्सल म्हणाले की, संतांची यादी अत्यंत काळजीपूर्वक तयार केली गेली आहे. “आम्ही जातीच्या आधारावर संतांची विभागणी करत नसलो, तरी प्रत्येक समुदाय, प्रदेश आणि भाषा यांचे प्रतिनिधित्व कार्यक्रमात होईल याची काळजी घ्यावी लागेल. साकार (स्वरूप असलेल्या देवाची) पूजा करणारे, निराकार (रूप नसलेल्या देवाची) पूजा करणारे, वाल्मिकी, रविदासी, आर्य समाजी, सनातनी अशा सर्व समाजाच्या वर्गवारी तयार करण्यात आल्या आहेत”, असं बन्सल यांनी सांगितलं.
राजकारणी, कलाकार, कवी, खेळाडू सर्वांचा पाहुण्यांच्या यादीत समावेश
“अधिकाधिक व्यवसायांच्या प्रतिनिधींचा पाहुण्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींची यादीही तयार केली आहे. यात राजकारणी, कलाकार, कवी, खेळाडू इत्यादींचा समावेश आहे. प्रभू रामांवर श्रद्धा असणाऱ्या पद्म पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही यात समावेश करण्यात आला आहे,” असंही बन्सल यांनी नमूद केलं.
“राम मंदिर आंदोलनात सर्व समुदायांचं बलिदान”
बन्सल म्हणाले की, राम मंदिर आंदोलनात सर्व समुदायांनी बलिदान दिले असल्याने सर्व समुदायांचे प्रतिनिधी यादीत असतील याची काळजी घेण्यात आली आहे. जेव्हा मंदिराच्या बांधकामासाठी निधी गोळा केला जात होता, तेव्हा महामारीच्या काळात आर्थिक अडचणी असूनही सर्व जातीतील लोकांनी आर्थिक योगदान दिले.
हेही वाचा : भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांची ‘श्रीराम रथयात्रा’; राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न ?
जगभरातील हिंदूंपर्यंत पोहोचण्यासाठी अक्षता वितरण मोहीम
अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात वातावरण निर्मिती होईल यासाठी विहिंपने विस्तृत योजना आखली आहे. विहिंपच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील हिंदूंपर्यंत पोहोचण्यासाठी अक्षता वितरण मोहीम आधीच सुरू करण्यात आली आहे. २२ जानेवारीला दुपारी १२.२० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील सोहळ्यात सहभागी होत असतानाच देशभरातील सर्व शहरे आणि खेड्यांमधील लोक आरती करण्यासाठी जवळच्या मंदिरांमध्ये एकत्र जमावीत म्हणून संघ कार्यकर्त्यांनी देशभर प्रचार मोहीम हाती घेतली आहे.