विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) नेते आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी २२ जानेवारीला केलेलं विधान चर्चेत आहे. अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आले नाहीत तर बरे होईल, असे मत चंपत राय यांनी व्यक्त केलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी विहिंपचे प्रमुख आलोक कुमार यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) ज्येष्ठ नेते रामलाल आणि कृष्ण गोपाल यांनी अडवाणींच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी औपचारिक निमंत्रण दिले.
विहिंपने एका निवेदनात म्हटले आहे की, लालकृष्ण अडवाणी (९६) आणि मुरली मनोहर जोशी (८९) या दोघांनाही राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. दोघांनीही ते उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील असे सांगितले.
“अडवाणी-जोशी सोहळ्याला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील”
“राम मंदिर चळवळीचे प्रणेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण सुपूर्द केले. यावेळी आमची राम मंदिर आंदोलनावरही चर्चा झाली. दोन्ही वरिष्ठांनी ते कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील, असं सांगितलं”, अशी माहिती अलोक कुमार यांनी जारी केलेल्या निवेदनात दिली.
“आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देऊ अडवाणींनी सोहळ्याला यावं”
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आलोक कुमार म्हणाले, “आम्ही सोमवारीच मुरली मनोहर जोशी यांना निमंत्रण दिलं. आम्ही दोन्ही नेत्यांना केवळ निमंत्रणच दिलं नाही, तर त्यांनी उपस्थित राहावे अशी विनंतीही केली. त्यामुळेच अडवाणींच्या घरी झालेल्या भेटीत त्यांना राम मंदिर कार्यक्रमासाठी कसं नेता येईल यावरच चर्चा झाली. आम्ही त्यांना सांगितले की त्यांच्या आरोग्यासाठी ज्या सुविधांची आवश्यकता आहे त्या आम्ही सर्व उपलब्ध करून देऊ. मात्र, त्यांनी या कार्यक्रमाला यावं.”
“चंपत राय यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला”
विहिंपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “चंपत राय यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या न येण्याबाबत केलेल्या वक्तव्यामागील भावना चांगली होती. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि ते वादग्रस्त झालं.”
“अडवाणी आणि जोशी यांना राम मंदिर सोहळ्यासाठी आमंत्रित न करण्याचा हेतू कधीच नव्हता. त्यांच्याशिवाय राम मंदिर आंदोलनाची कल्पनाही करता येणार नाही. चंपत राय यांनी आरोग्याच्या काळजीतून ते वक्तव्य केलं होतं. तेही आता वयोवृद्ध झाले आहेत”, असं एका विहिंप नेत्याने सांगितले.
चंपत राय यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
अडवाणी आणि जोशी राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहतील का असे विचारले असता चंपत राय म्हणाले होते, “अडवाणींनी सोहळ्याला उपस्थित असणं अनिवार्य आहे. आम्ही असंही म्हणू की, त्यांनी कृपया या सोहळ्याला येऊ नये.”
“तुम्ही अडवाणींच्या वयापर्यंत पोहोचू शकाल का?”
“तुम्ही सर्वांनी अडवाणींना पाहिले नाही का? तुम्ही अडवाणींच्या वयापर्यंत पोहोचू शकाल का? मी मुरली मनोहर जोशींशी फोनवर बोललो. मी त्यांना येऊ नका असं वारंवार सांगितलं. मात्र, ते सोहळ्याला येतील असं सांगत ठाम होते. त्याचे वय, थंडी लक्षात घेऊन मी त्यांना सोहळ्याला न येण्याची विनंती केली होती. त्यांनी काही काळापूर्वीच गुडघेही बदलले आहेत”, असंही राय यांनी नमूद केलं.
दरम्यान राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीसांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असलेल्या राम मंदिर सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे.