आसामचे मुख्ममंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी विधानसभेत महत्त्वाचे विधान केले आहे. बजरंग दल या संघटनेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) तसेच भारतीय जनता पार्टीशी (भाजपा) दुरान्वये संबंध नाही, असे सर्मा म्हणाले आहेत. ते सोमवारी (११ सप्टेंबर) आसामच्या विधानसभेत स्थगन प्रस्तावाला उत्तर देत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बजरंग दल या संघटनेविरोधात गुन्हा दाखल

जुलै महिन्यात आसाम राज्यातील मंगलदाई शहरातील एका शाळेत तरुणांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी बजरंग दल या संघटनेविरोधात गुन्हा दाखल केला होता. हाच मुद्दा उपस्थित करीत विरोधकांनी सर्मा सरकारला प्रश्न विचारले होते. याच प्रश्नाचे उत्तर देताना सर्मा यांनी वरील विधान केले.

अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा विरोधकांचा इशारा

सोमवारी आसामच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता. विधानसभेच्या नव्या इमारतीत होणारे हे आसामचे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनात स्थगन प्रस्ताव मान्य न केल्यास पहिल्याच दिवशी बहिष्कार टाकण्याचा इशारा विरोधकांनी दिला होता. त्यामुळे पहिल्याच दिवशी विधानसभेत बहिष्कार नको म्हणून मुख्यमंत्री सर्मा यांनी विधानसभाध्यक्षांना सर्व स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती केली होती. शाळेतील शस्त्र प्रशिक्षणासंदर्भातील स्थगन प्रस्तावाव्यतिरिक्त विधानसभेच्या अध्यक्षांनी वेगवेगळे स्थगन प्रस्ताव स्वीकारले.

शाळेत तरुण मुलांना शस्त्रांचे प्रशिक्षण?

जुलै महिन्यात समाजमाध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत मंगलदाई शहरातील एका शाळेत तरुण मुलांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आसाम पोलिसांनी बजरंग दल या संघटनेविरोधात गुन्हा दाखल केला होता. दोन गटांत शत्रुत्व वाढवण्याच्यि आरोपांतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. याबाबतच्या स्थगन प्रस्तावावर आसामच्या विधानसभेत सोमवारी चर्चा झाली. यावेळी AIUDF पक्षाचे आमदार अमिनूल इस्लाम यांनी राज्य सरकारवर टीका केली. प्रशासनाला प्रशिक्षणाची माहिती असल्याशिवाय असे कार्यक्रम आयोजित करणे अशक्य आहे, असे ते म्हणाले. आसामच्या धुबरी या भागातही अशाच प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, असे इस्ला म्हणाले.

“आम्हाला या मुद्द्याचे राजकारण करायचे नाही. मात्र, सध्या राज्यात जे वातावरण निर्माण केले जात आहे, ते सभागृहासमोर यावे हा आमचा उद्देश आहे. असे प्रकार भविष्यात घडणार नाहीत, याची हमी सरकारने सभागृहाला द्यावी,” असे यावेळी अमिनूल इस्लाम म्हणाले.

“बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या दोन समांतर संघटना आहेत”

इस्लाम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला हिमंता सर्मा बिस्वा यांनी उत्तर दिले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले जाईल. मात्र, भाजपा तसेच संघाचा या संघटनांशी कसलाही संबंध नाही. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद या दोन समांतर संघटना आहेत. या संघटना स्वत:च वेगवेगळी कामे करतात. आमच्या भाजपा पक्षाचा याच्याशी कसलाही संबंध नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही या संघटनांशी दूर दूरपर्यंत संबंध नाही, असे सर्मा यांनी आपल्या उत्तरात सांगितले.

“अजूनही चार बांगलादेशी नागरिक फिरत आहेत”

“आसाममधील मंगलदाई या भागात तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जात होते. अशाच प्रकारे एका धर्माचा गैरवापर करून आसामच्या वेगवेगळ्या भागात ‘अल कायदा’सारखे नेटकवर्क समोर आले असून ही चिंताजनक बाब आहे. भारतात अल कायदाचे पाच मॉड्युल पकडले गेले आहेत. अजूनही चार बांगलादेशी नागरिक मोकळे फिरत आहेत. माझ्या माहितीनुसार मंगलदाई परिसरात जी घटना घडली, तेथे कोणतीही शस्त्रे नव्हती. असे असले तरी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. मी अनेक वर्षांपासून सभागृहात आहे. या काळात हे उदाहरण समोर आले आहे. दुसऱ्या बाजूनेही अशी बरीच उदाहरणे आहेत,” असेही सर्मा म्हणाले

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know relation between bajrang dal and rss bjp said assam cm himanta biswa sarma prd
Show comments