पुढील महिन्यात अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि सोनिया गांधींनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते उपस्थित राहणार की नाही यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या सहभागावरून समस्त केरळ जमियाथुल उलामा संघटनेने टीका केली आहे. ही संघटना आययूएमएल आघाडीत मित्रपक्ष आहे.
समस्त केरळ जमियाथुल उलामाने बुधवारी त्यांचे मुखपत्र ‘सुप्रभातम’मधील संपादकीयात म्हटले, “काँग्रेसने राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहू शकतो, अशी भूमिका घेतली आहे. हा निर्णय केवळ उत्तर भारतातील हिंदुंची मते कमी होऊ नये म्हणून घेतलेला निर्णय आहे. ३६ वर्षे देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसच्या सौम्य हिंदुत्वाच्या भूमिकेमुळेच ते या परिस्थितीत पोहचले आहेत.”
“…तर काँग्रेस इतिहासाच्या पुस्तकातून हद्दपार होईल”
“जर काँग्रेसने आपल्या भूमिकेचा पुनर्विचार केला नाही, तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाची सत्ता कायम राहील आणि स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारी काँग्रेस इतिहासाच्या पुस्तकातून हद्दपार होईल,” असं समस्त केरळ जमियाथुल उलामाने म्हटलं. विशेष म्हणजे मौलवींची एक प्रभावी संघटना असलेल्या आणि आययूएमएलमधील महत्त्वाची संघटना असलेल्या समस्त केरळ जमियाथुल उलामाशी सीपीआय(एम) ने मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले आहेत. यानंतर त्यांचं हे संपादकीय आलं आहे.
“काँग्रेसमध्ये संघाशी लढण्याची वैचारिक बांधिलकी नाही”
केरळमधील सीपीआयएमच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला प्रभावित करणार्या अनेक मुद्द्यांवर समस्त सामावून घेतलं आहे. काँग्रेसमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लढण्याची वैचारिक बांधिलकी नाही, अशी अस्वस्था मुस्लीम समुदायात आहे. त्याच्या आधारे सीपीआयएम आययूएमएलला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
भाजपाच्या सापळ्यात न अडकण्याचा सावधगिरीचा इशारा
या मुद्द्यावर आतापर्यंत सावध मौन बाळगणाऱ्या आययूएमएल आघाडीने बुधवारी काँग्रेसला भाजपाच्या सापळ्यात न अडकण्याचा सावधगिरीचा इशारा दिला आहे. आययूएमएलचे राज्य सरचिटणीस पी. एम. ए. सलाम म्हणाले, “प्रत्येक निवडणुकीपूर्वी धार्मिक भावना भडकावण्याची भाजपाची सवय आहे. यापूर्वीही धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. आताही धार्मिक अजेंड्याचा गैरफायदा घेण्याची भाजपाची रणनीती आहे. त्या सापळ्यात कोणीही अडकू नये, ही आमची भूमिका आहे.”
सोहळ्याला काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत का?
गेल्या आठवड्यात श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या शिष्टमंडळाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना राम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रण दिले. हा सोहळा २२ जानेवारीला अयोध्येत होणार आहे. या सोहळ्याला काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत का, असा प्रश्न विचारला असता काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले, “काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे, कोण सहभागी होणार आहे हे २२ जानेवारीला तुम्हाला कळेल. त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत.”
सीपीआयएम नेते राम मंदिर सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नाही
सीपीआयएमने काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेत राम मंदिर सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले. सीपीआय(एम) ही भूमिका घेऊ शकते यामागे जसं कम्युनिस्ट विचारसरणीचं कारण आहे तसंच त्यांना इतर राज्यांमध्ये काँग्रेससारखी मतदारांवर परिणाम होण्याची भीती नाही हेही असल्याचं बोललं जात आहे.
“अयोध्येतील सोहळा भारताला हिंदु राष्ट्र करण्याची चाचणी”
सुप्रभातमच्या संपादकीयात सीपीआयएमच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले. त्यात म्हटले, “२२ जानेवारीचा अयोध्येतील सोहळा भारताला हिंदु राष्ट्र करण्याची चाचणी (लिटमस टेस्ट) आहे हे समजून घेण्याची बुद्धी माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासारख्या नेत्यांकडे आहे. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे उघडपणे सांगण्याचे धाडस दाखवले. देशातील धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी नागरिकांना सोनिया गांधींसारख्या काँग्रेस नेत्यांकडून धैर्य आणि चिकाटीची अपेक्षा आहे.”
सौम्य हिंदुत्ववादाचा वापर करुनही काँग्रेसचा मध्य प्रदेशात पराभव
समस्त मुखपत्राने काँग्रेसवर सौम्य हिंदुत्वाचा वापर केल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटलं, “मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते कमलनाथ यांनी बाबरी मशीद पाडलेल्या ठिकाणी निर्माण होत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामासाठी १२ चांदीच्या विटा पाठवल्या. मध्य प्रदेशमधील प्रचार मोहिमेत हनुमान मंदिराचे आश्वासन देण्यात आले. हे स्पष्टपणे हिंदुत्व होते. एवढं करूनही काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये विजय मिळवता आला नाही. भाजपाच्या कट्टर हिंदुत्वापुढे काँग्रेसचे सौम्य हिंदुत्व क्षीण आहे.”
“आता काँग्रेस भाजपला पर्याय कशी ठरेल?”
आमदार के. टी. जलील म्हणाले, “भूतकाळात आययूएमएलकडे असे नेते होते जे धर्मनिरपेक्ष दृष्टीकोनाला सोडून भूमिका घेतल्यास काँग्रेसला जाब विचारू शकायचे. आता काँग्रेस भाजपला पर्याय कशी ठरेल?”