आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा अभिमान वाढवणाऱ्या काही महिला कुस्तीपटूंनी भाजपा खासदार व भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना उभं केलं आणि निवडून आणलं. यावर देशभरातून सडकून टीका झाली. अशातच क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या नव्या कार्यकारणीचं निलंबन केलं. या कारवाईनंतर काही तासांमध्येच भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि ब्रिजभूषण सिंह यांची बैठक झाली. बैठकीतून बाहेर पडल्यावर ब्रिजभूषण सिंह यांनी यापुढे त्यांचा कुस्ती महासंघाशी काहीही संबंध नाही, असं म्हटलं.
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणार्या ६ महिला कुस्तीपटूंपैकी एक असलेल्या ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने ती कुस्ती कायमची सोडत असल्याचं जाहीर केलं. तिचा सहकारी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियानेही या विरोधात त्याचा पद्मश्री पुरस्कार परत देण्याची घोषणा केली.
भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाट समाजावर लक्ष्य केंद्रित करत असतानाच अचानक झालेल्या या घटनांनी वातावरण बदललं. भारतीय कुस्ती महासंघावर लैंगिक छळाचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्या निकटवर्तीय व्यक्तीची निवड झाल्याने भाजपावर सडकून टीका झाली. अशातच मग केंद्र सरकारच्या खेळ मंत्रालयाने नवनियुक्त कुस्ती महासंघाच्या समितीचं निलंबन केलं. हा निर्णय घेताना सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं, “भारतीय कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे वर्षअखेरीस १६ आणि २० वर्षाखालील वयोगटाच्या कुस्ती स्पर्धांची घोषणा केली. याबाबत कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. याबाबत कुस्ती महासंघाच्या सरचिटणीसांनाही कोणतीही माहिती नव्हती. हे नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे मंत्रालयाने निलंबनाचा निर्णय घेतला. तुम्ही या निर्णयाचा कोणताही अर्थ काढू शकता.”
जाट आणि हरियाणाच्या मतदारांना भाजपा त्यांच्यासोबत आहे हा संदेश देण्यासाठी सरकारने हा सुनियोजित निर्णय घेण्यात आला का अशीही विचारणा सरकारी अधिकाऱ्यांना करण्यात आली. यावर ते अधिकारी संजय सिंह यांच्याप्रमाणेच म्हणाले, “कुस्तीपटुंनीही न्याय मिळवण्यासाठी व्यवस्थेतील सर्व पर्यायांचा वापर न करता आंदोलनाच्या पवित्र्यात गेले.”
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी २२ डिसेंबर रोजी साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांची भेट घेतली होती.
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तीन दिवसांनी अचानक नवनिर्वाचित समितीला निलंबित करण्याचा निर्णय का घेतला याबद्दल क्रीडा मंत्रालय शांत आहे. असं असलं तरी या आठवड्यातील घटनांवरून भाजपाला कुस्ती महासंघाचा वाद संपवून जाट समाजात संदेश देणे का महत्त्वाचे वाटले हे स्पष्ट होते.
जाट समाजाला भाजपाच्या बाजूने करण्यासाठी जोरदार प्रयत्न
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुरादाबादमध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीदिनी त्यांच्या ५१ फूट पुतळ्याचे अनावरण केले. यानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन करण्याचा निर्णय झाला. या आठवड्याच्या सुरुवातीलाच भाजपाने स्वतःला जाट अभिमानाच्या प्रतिकाच्या रुपात दाखवण्याची मोहित सुरू केली. तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जाट समुदायातील उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकर यांची नक्कल केल्याचा आणि राहुल गांधी हा व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने विरोधकांना लक्ष्य केलं. हे खासदार संसदेतील खासदारांच्या निलंबनाला विरोध करत असताना ही घटना घडली. तो व्हिडीओ व्हायरल होताच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांची नक्कल करणे हा जाट, शेतकरी आणि घटनात्मक पदाचा अपमान असल्याचा आरोप केला.
“त्यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब घरातून आले आहेत, ओबीसी समाजाचे आहेत म्हणून मोदींचा अपमान केला. मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी त्यांचा अपमान केला. त्यांनी आदिवासी महिला असलेल्या राष्ट्रपतींचाही अपमान केला. पहिल्यांदाच जाट समाजातील शेतकऱ्याचा मुलगा उपराष्ट्रपतीच्या एवढ्या मोठ्या संवैधानिक पदावर विराजमान झाला, पण ते या घटनात्मक पदाचाही अपमान करत आहेत”, असा आरोप प्रल्हाद जोशींनी राज्यसभेत केला.
जाट समुदायाचं निवडणुकीतील महत्त्व काय?
जाट समुदाय हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आढळणारा एक प्रभावी शेतकरी समुदाय आहे. पंजाबमध्येही जाट शीख मोठ्या संख्येने आढळतात. राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये जाट समुदायाचा समावेश ओबीसींमध्ये होतो. धनकर जेथून येतात त्या राजस्थानमधील जाट काँग्रेसचे समर्थक होते. परंतु गेल्या २० वर्षांत जाट समाज भाजपा मोठ्या प्रमाणात समर्थक झाला. पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्येही गेल्या १० वर्षांपासून जाटांचा भाजपाला पाठिंबा वाढत आहे. २०१३ च्या मुझफ्फरनगर दंगलीनंतर उत्तर प्रदेशमध्ये जाटांचा भाजपाला पाठिंबा वाढला. हरियाणाच्या लोकसंख्येच्या सुमारे २८ टक्के जाट आहेत. मतदारांमध्येही एक चतुर्थांश मतदार जाट समाजातील आहेत. उत्तर हरियाणा वगळता संपूर्ण हरियाणात जाट समुदाय मोठ्या संख्येने आहे.
दरम्यान, मागील वर्षभरात मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यामुळे भाजपाला जाट समुदायाचा विरोध सहन करावा लागला होता. जाट समुदायातील शेतकऱ्यांसह देशभरातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला वेढा घालून आक्रमक आंदोलन केलं. या आंदोलनानंतर मोदी सरकारला नवे कृषी कायदे मागे घ्यावे लागले होते.
यानंतर मोदी सरकार आणि जाट समुदायातील आणखी एक संघर्षाचा प्रसंग म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला ब्रिजभूषण शरण सिंह विरोधात कुस्तीपटुंचं आंदोलन. लोकसभा निवडणुकीत उत्तर-पश्चिम भारतात जाट समुदाय महत्त्वाचा घटक आहे. २०२४ मध्ये हरियाणासह या भागात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळेच भाजपाला भारतीय कुस्ती महासंघावर कारवाई करणं आवश्यक वाटलं असू शकतं.