कोल्हापूर : प्रचारात व्यक्तिगत टीकाटिपणी केली जाणार नाही अशी सुरुवात करणारे शिंदे सेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीच श्रीमंत शाहू महाराजांवर दत्तक प्रकरणावरून तोफ डागली आहे. दत्तक प्रकरण हे कोल्हापूरच्या ऐतिहासिक राजकारणात नाजूक प्रकरण ठरले आहे. ही दुखरी नस मंडलिक यांनी लोकसभा निवडणूक भरात आली असताना जाणीवपूर्व पुन्हा एकदा दाबली असल्याने त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे. काँग्रेससह विरोधकांनी संजय मंडलिक यांच्यावर टीकेचा भडीमार करून माफी मागण्याची मागणी केली आहे. मंडलिक यांनी माफीचा मुद्दा उपस्थित होत नाही असे म्हणत आणखी काही संवेदनशील मुद्दे उपस्थित करत खुलासा करण्याची मागणी केली आहे. यामुळे खासदार संजय मंडलिक आणि शाहू महाराज यांच्यातील निवडणुकीचे रण पुढील काळात आणखी तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची यावेळची निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्यामुळे वलयांकित ठरली आहे. त्यांना शिंदेसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी आवाहन दिले आहे. तसे पाहू गेल्यास याआधीही अपक्ष लढणारे सदाशिवराव मंडलिक व युवराज संभाजीराजे यांच्यात २००९ मध्ये लोकसभेचा सामना झाला होता. तेव्हा मंडलिक यांनी विजय मिळवला होता. तर आता सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र संजय मंडलिक हे श्रीमंत शाहू महाराज यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
central government decision on classical languages in october 2024
संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
maharashtra assembly election 2024 rahul gandhi criticized pm modi at campaign rally
पंतप्रधानांना संविधानाची जाणच नाही; गोंदिया येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांची टीका
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार

हेही वाचा : Lok Sabha Elections 2024: मोदी सरकारसाठी राम मंदिर आणि हिंदुत्वाचा मुद्दा किती परिणामकारक ठरेल? मतदारांच्या मनात काय?

शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा संजय मंडलिक यांनी त्यांच्याविषयी आदर असल्याचे सांगून व्यक्तिगत टीकाटिपणी करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. पंधरवड्यातच त्यांचा पवित्रा बदलला आहे. त्यांनी शाहू महाराज यांच्या वारसदार होण्यावरच टोकदार प्रश्न उपस्थित केला आहे. आताचे शाहू महाराज दत्तक आहेत. ते खरे वारसदार नाहीत; असतील तर ते सिद्ध करावे, अशा शब्दात मंडलिक यांनी शाहू महाराज यांना आव्हान दिले आहे. त्यांच्या या विधानामुळे प्रचाराचा नूर बदलला आहे. महायुतीला निवडणूक कोणत्या दिशेने न्यायची आहे याची ती चुणूक ठरली.

मंडलिक यांनी केलेली टीका कोल्हापुरातील काँग्रेस आणि पुरोगामी कार्यकर्त्यांना चांगलीच झोंबली. संजय मंडलिक यांच्याकडून छत्रपतीच्या गादीचा अवमान झाला असल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. पाठोपाठ कोल्हापुरातील पुरोगामी संघटना, पक्ष यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करून मंडलिक यांच्यावर टीकेचा भडीमार केला. यातून हा वाद आणखी चिघळला. मात्र, याप्रकरणी श्रीमंत शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे यांनी मौन पाळणे पसंत केले आहे. वाद तापत असताना छत्रपती घराण्याकडून ब्र ही काढला गेलेला नाही.

हेही वाचा : इराणींनी अमेठीत बांधलं घर; उमेदवाराने मतदारसंघातील रहिवासी असणे आवश्यक आहे का?

इकडे मंडलिक यांनी आपली आक्रमक मांडणी सुरूच ठेवली. ‘ आताचे शाहू महाराज दत्तक वारस आहेत. राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार कोल्हापूरची जनता आहे. या विषयाचे राजकीय भांडवल करून स्टंटबाजी करणाऱ्यांनी विपर्यास करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न चालवला आहे. मंडलिक कुटुंबीय गेल्या ६० वर्षापासून शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार जगत आहोत. कोल्हापूरची जनता हीच खरी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची वारसदार आहे. कोल्हापूरचा स्वाभिमान दुखावल्याचा दिखावा करणाऱ्या सतेज पाटील यांनी शाहू महाराज दत्तक प्रकरण १९६२ सालचे शाहू महाराज दत्तक प्रकरण समजून घ्यावे. तेव्हा गादीला दत्तक घेणाऱ्या व दत्तक देणाऱ्या दोघांनीही कोल्हापुरात उग्र आंदोलन केले होते. हा इतिहास सोयीस्करपणे विसरून सतेज पाटील राजघराण्याची अप्रतिष्ठा करीत आहेत , ‘ असा गंभीर आरोप मंडलिक यांनी केला आहे. यासोबत त्यांनी २४ जून १९६२ रोजी न्यू पॅलेस वर कोल्हापूरच्या जनतेने काढलेला मोर्चा, दगडफेक, पोलीस गाड्या जाळणे, लाठीमार, अश्रूधूर, राजवाड्यावर काळी निशाण लावणे या वादग्रस्त घटनाक्रमाचा उल्लेख केला. यामुळे २० वर्षे शाही दसरा होऊ शकला नाही. यासारखे गंभीर मुद्दे मांडून मंडलिक यांनी पुन्हा एकदा श्रीमंत शाहू महाराज यांच्या दत्तक होण्याला आव्हान दिले आहे.

हेही वाचा : केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?

इतिहास अभ्यासकांनी संजय मंडलिक यांचे विधान चुकीचे ठरवले आहे. श्रीमंत शाहू महाराज यांचा संजय मंडलिक यांनी अवमान केल्याचे सांगून इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव यांनी निषेध केला आहे. राजकारणासाठी, स्वार्थासाठी चिखलफेक करण्याची संजय मंडलिक यांची कृती अश्लाघ्य आहे, अशी टिपणी या इतिहासकारांनी केली आहे. मंडलिक यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार ,शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही मंडलिक यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. यानंतर गेले दोन दिवस तरी या प्रकरणावर शांतता आहे. तथापि, काही बोलणार नाही असे म्हणत मंडलिक यांनी हळूच शाहू महाराजांवर वाढवलेली टीकेची तीव्रता पाहता ही वादळापूर्वीची शांतता ठरणार का, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. कारण सदाशिवराव मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी संभाजीराजे यांच्यावर ‘पॅलेस पॉलिटिक्स ’ हा शब्द वापरून छत्रपती घराण्याला घायाळ करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची पुनरावृत्ती करणारी पावले संजय मंडलिक टाकत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांचा बोलवता धनी दुसरा असल्याचे सांगितल्याने यामागचा कर्ताकरविता कोण याचाही शोध लोकसभा निवडणुकीच्या गदारोळात घेतला जात आहे. वार – प्रतिवार होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीच्या काळात होणारे वाद पाहता श्रीमंत शाहू महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरूच नये, अशी सूचना केली आहे. छत्रपती असतानाही नेमस्त प्रकृतीचे असणारे शाहू महाराज या राजकीय चिखलफेकीने कितपत व्यथित झाले असताही याचा शोध विचारीजन घेताना दिसत आहेत. मूळचे वादग्रस्त, नाजूक प्रकरण कसे वळण घेते हे आता आणखी उल्लेखनीय ठरले आहे.