कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवधी कमी असताना मध्येच दीपावली सणाचे महत्त्वाचे चार दिवस आल्याने या कालावधीत प्रचाराला खंड लागणार आहेत. सभा, पदयात्रा, संपर्क दौरा, जाहीर सभा, महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम आदी प्रचार कार्यक्रमांना लोक उपस्थित राहण्याची शक्यता अंधुक असल्याने प्रचाराचे तंत्र काही प्रमाणात बदलावे लागणार आहे. दीपावली शुभेच्छाच्या निमित्ताने काही प्रमुखांच्या भेटींवर उमेदवारांनी भर दिला आहे. तर या चार दिवसांची संधी साधत बंडखोरांची समजूत काढून त्यांना माघार घ्यायला लावण्यासाठी हे दिवस कामी आणण्याचे नेत्यांचे नियोजन आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याच्या आधीपासून काही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली होती. अनेकांचे नाव अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नक्की होत नव्हते. काही मतदारसंघात ऐनवेळी उमेदवार हे बदलले गेले. या सर्व गदारोळात प्रचाराकडे लक्ष द्यायला अवधीही कमी आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत ४ नोव्हेंबर रोजी आहे. त्यानंतरच लढतीचे खरी स्वरूप स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारताच ठाण्यातील बंड शमले

अर्ज माघारीनंतर पुढे पुन्हा पंधरवडावरच प्रचारासाठी मिळणार आहे. अर्ज भरल्यानंतर सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. गावोगावी भेटी देऊन मतदारांपुढे केलेल्या कामाचा पाढा वाचायला सुरुवात केली आहे. आता प्रकाशोत्सवाचे पर्व सुरू झाले आहे. वसुबारस, धनत्रयोदशीनंतर उद्या गुरुवारपासून दिवाळीची खरी रंगत येणार आहे. अभ्यंग स्नान, लक्ष्मीपूजन दीपावली पाडवा, भाऊबीज असे दिवाळीचे महत्त्वाचे सण ३ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहेत. या महत्त्वाच्या चार दिवशी तरी सणाची तयारी आणि सण साजरा करण्यामध्ये सर्वसामान्य जनता पूर्णतः व्यग्र असणार आहेत. याचा प्रचार गतीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

व्यक्तिगत भेटीवर भर

लोकांशिवाय प्रचारायला मुळीच शोभा येत नाही. लोकच येणार असतील तर प्रचार कसा करायचा असा उमेदवारांसमोर पेच आहे. लोकांची दिवाळीसारखा सर्वात मोठा सण साजरा करण्याची मानसिकता लक्षात घेऊन या कालावधीत जाहीर प्रचार होण्याची खूपच कमी आहे. त्यामुळे काही उमेदवारांनी मतदारसंघातील मान्यवरांच्या व्यक्तिगत भेटी घेऊन दीपावली शुभेच्छा देवून सहानुभूती मिळवण्याचे नियोजन केले आहे.

हेही वाचा – Prakash Ambedkar: ‘एमआयएम प्रामाणिक पक्ष नाही’, प्रकाश आंबेडकरांची जुन्या सहकारी पक्षावर टीका

बंडखोरांची समजून

महायुती आणि महाविकास आघाडी तसेच छोट्या आघाड्यांनाही बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. बंडखोर उमेदवार रिंगणात राहिल्यास विजयाची समीकरणे बिघडणार आहेत. परिणामी, जाहीर प्रचारापासून फुरसत मिळालेली जिल्ह्यातील आणि राज्यातील नेते मंडळीनी बंडखोरांची समजूत काढण्यासाठी दिवाळीच्या या चार दिवसांचा उपयोग करण्याचे ठरवले आहे.

Story img Loader