दयानंद लिपारे
कोल्हापूर : करोना नंतर परिस्थिती पूर्व पदावर येऊ लागल्याने प्रदर्शनावर भर दिला जात आहे. कृषीप्रधान कोल्हापूर जिल्हात राजकीय पक्ष, नेत्यांनी कृषी प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घातले आहे. पाच महत्त्वाच्या नेत्यांनी रांगेने कृषी प्रदर्शन आयोजित केले असून या निमित्ताने शेतकऱ्यांना शेतीतील बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती पुरवतानाच ग्रामीण भागातील मतांची मशागतही केल्याचे दिसत आहे.
देशामध्ये करोना टाळेबंदी लागू झाल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले होते.
सर्वाधिक रोजगार कृषी क्षेत्राशी निगडित असल्याने शेतकरी व शेतमजूर यांच्या अडचणीमध्ये भर पडली होती. अन्य उद्योग, व्यवसाय बंद असताना केवळ शेती करण्यासाठी नियमाधीन सवलत देण्यात गेली होती. अशा संकटकाळात कष्टाने पिकवलेल्या पिकांची काढणी झाल्यावर दराअभावी फळे , भाजीपाला, फुले अशा नाशवंत पिकांचे उत्पादन तोट्यात गेले होते. करोना संसर्ग कमी झाला तरी शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही ऐरणीवर आहेत. पण शेतीमध्ये काही नवे करू पाहणारा शेतकरी वर्ग मोठा आहे. अशा शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन हा महत्त्वाचा आधार ठरत असतो. त्यासाठी त्यांची पावले कृषी प्रदर्शनाकडे वळत असतात. ही संधी साधून राज्यात विविध ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजित करण्याची स्पर्धा रंगली आहे.
हेही वाचा: पूजा मानमोडे : समाजकारणातून राजकारणात
प्रदर्शनांची लाट
कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांनी एकमेकांपेक्षा अधिक सरस कृषी प्रदर्शन आयोजित करण्याकडे लक्ष पुरवले आहे. एप्रिल महिन्यात कागल मध्ये भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. जयसिंगपूर येथे मे महिन्यामध्ये माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अलीकडेच वारणानगर येथे आमदार विनय कोरे यांनी वारणा कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. सध्या माजी गृह राज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाची चर्चा आहे. या आधीच्या दोन्ही प्रदर्शनामध्ये राजकीय भाष्य नव्हते. सतेज कृषी प्रदर्शनाला गुजरातचे काँग्रेसचे युवा नेते आमदार जिग्नेश मेवाणी यांची उपस्थिती आकर्षण होते. मेवाणी यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी धोरणावर हल्ला चढवलेला हल्ला ही एकमेव राजकीय चर्चा ठरली. गुजरात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद द्यावे,असे सुचित करून राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मेवाणी यांना कोल्हापुरातून राजकीय पाठबळ दिले. पाठोपाठ महिना अखेरीस भरणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा कृषी प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू आहे.
प्रदर्शनातून साध्य काय?
ग्रामीण भागातील हल्ली समाज माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान पोहोचले आहे. शेतीतील नवनवे बदल त्यांना या माध्यमातून समजत असतात. हे बदल ,त्यातील नावीन्य याची डोळा पाहून त्याची सत्यता पडताळून घेण्याची संधी कृषी प्रदर्शनात मिळत असते. शेतीतील बदलणारे तंत्रज्ञान, आधुनिक अवजारे, बियाणांच्या विविध जाती, शासनाच्या नानाविध योजना, सेवांची माहिती, तज्ञांचे मार्गदर्शन – चर्चा करण्याची संधी, शेतकरी उत्पादक कंपन्यांची उत्पादने, पाण्याचे -खताचे महत्त्व अशा विविध घटकांची सविस्तर माहिती कृषी प्रदर्शनात मिळत असते. प्रदर्शनामध्ये राज्य शासनाच्या कृषी विभागालाही सामावून घेतले जात असल्याने त्यांच्याकडील तज्ञ, अधिकारी , मनुष्यबळ, शासकीय प्रसिद्धी याचेही आपसूक फायदे मिळवता येतात. या निमित्ताने शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याने स्वतःच्या खिशाला फारशी ददात न लावता आयोजित केलेल्या प्रदर्शनातील प्रायोजकांचा आर्थिक प्रश्नही सुटण्यास मदत होत असते.
हेही वाचा: गिरीश फोंडे – सामान्यांसाठी संघर्ष
राजकीय पेरणी
कोल्हापूर जिल्ह्याची रचना ही प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडित आहे. कोल्हापूर उत्तर, इचलकरंजी या मतदारसंघाचा चेहरा नागरी असला तरी तेथेही काही वर्गवारी शेतीशी निगडित आहे. उर्वरित आठ मतदारसंघ पूर्णतः ग्रामीण भागात आहेत. कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले की अशा शेतकऱ्यांशी संपर्क साधने सोपे जाते. त्यांचे प्रश्न समजावून घेण्याची संधी मिळते. ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून त्यांचे तारणहार असल्याचे सिद्धही करता येते.
बहुतेक कृषी प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने बचत गटाचे स्टॉल,खाद्यपदार्थ, प्लास्टिकच्या वस्तू अशांवर अधिक भर असतो. शेतीतील अनेक उत्पादने देशविदेशात विक्री योग्य दर्जाची असताना त्याचे मार्गदर्शन अभावाने मिळते. राजकीय सोय म्हणून नव्हे तर शेतकऱ्याच्या गरजा लक्षात घेऊन कृषी प्रदर्शनावर भर दिला तर शेतकऱ्यांना फायदा होईल, असे मत शेती अभ्यासक रावसाहेब पुजारी यांनी व्यक्त केले.