कोल्हापूर : धडाडीने प्रचार करण्याची अहमहमिका लागली असताना कोल्हापुरात प्रचाराचा स्तर पुरता खालावत चालला आहे. टीका करण्याच्या नेतेमंडळी वैयक्तिक पातळीवर घसरली आहेत. प्रचाराच्या नादात अगदी शयनकक्षात डोकावण्याचा वाह्यातपणा केला जात आहे. सभांमधून अशी टाळ्याखाऊ विधाने करणारे असले तरी जनमाणसातून त्याबाबत कडवट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शाहू महाराज आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यातील लढत अगदीच अत्यंत चुरशीची होत आहे. साहजिकच आपली बाजू मांडण्यासाठी तोडीस तोड प्रचार सुरु झाला आहे. प्रचाराला धार आणण्यासाठी दररोज सभांचा फड भरत आहे. आपल्या पक्ष, उमेदवारांची बाजू मांडताना प्रतिपक्षावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात असल्याने प्रचाराचा दर्जा घसरत चालला आहे. दोन्ही पक्षाकडून पुरोगामीत्वाचा वारसा सांगितला जात असला तरी प्रत्यक्षात वापरात आणली जाणारी भाषा अत्यंत शिवराळ, ग्राम्य, आक्रमक बनली आहे. अशा दर्जाहीन प्रचारामुळे जनतेत नाराजी वाढत चाललेली असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : ‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
वादाची ‘काठी’
एखादे विधान घेऊन त्याचा किस पाडला जात आहे. प्रचाराचा जोर सुरू असताना काही चुकीच्या कृती घडण्याची शक्यता गृहीत धरून कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील एका सभेत बोलून दाखवलेली भूमिका वादाला निमंत्रण देणारी ठरली. कोल्हापूरमध्ये निवडणुकीत गैरप्रकार चालणार नाहीत असे त्यांनी विरोधकांना या सभेत ठणकावून सांगितले. ‘ लोकशाहीत उमेदवारांचा प्रचार करण्याची सर्वांनाच मुभा आहे. कोल्हापूरच्या मातीत २५ वर्षे कसलेला मी पैलवान आहे. कोणाला कसे चितपट करायचे हे चांगलेच माहिती आहे. कोणी जाणीवपूर्वक आडवे येत असेल तर याची माहिती मला द्या. रात्री बारा वाजता काठी घेऊन तेथे यायला बंटी पाटील तयार आहे ,’ अशा शब्दात आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. त्यांनी वापरात आणलेल्या काठी शब्दावरून वादाची लाठीकाठी सुरु झाली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘ प्रचार करत असताना कोणी आडवे येत आहे असे सतेज पाटील यांना वाटत असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार द्यावी. मी बारा वाजेपर्यंत काठी घेऊन बसतो समर्थन अयोग्य आहे. ते बसणार असतील तर आम्हीही बसू ,’ असा प्रतिइशारा दिला. सतेज पाटील यांनी असे विधान केल्यावर त्यांचे राजकीय विरोधक खासदार धनंजय महाडिक हे शांत बसण्याची शक्यताच नव्हती. त्यांनी या वादात उडी घेत काठीची भाषा वापरणाऱ्यांना कोल्हापुरात दंगलीत घडवायचे आहे काय असा प्रश्न उपस्थित केला. ‘ हे दबावाचे राजकारण सुरु आहे. प्रचारात कोण कुणाच्या आडवे गेलेले नाही. काहीतरी स्टंट करायचा आणि लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे हा त्यांचा नेहमीचाच फॉर्मुला आहे. परंतु ते आता गृहमंत्री नाहीत याचा विसर पडला आहे ,’अशी असा टोला महाडिक यांनी लगावला.
हेही वाचा : गोमांस विकणाऱ्यांच्या पैशांतून भाजपाचे झेंडे… – काँग्रेसचा आरोप
अश्लाघ्य शेरेबाजी
तर हा वाद सुरू असताना तिकडे चंदगड येथील एका सभेमध्ये मंडलिक यांचे समर्थक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी असभ्य भाषेत सतेज पाटील यांचा समाचार घेतला. जाहीर सभेत शयनकक्षात डोकवण्याच्या त्यांच्या शेरेबाजीने सभेत टाळ्या मिळाल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्यांच्या या विधानावर समाज माध्यमातून टीका होत आहे. टिकेच्या ओघांमध्ये मर्यादा संभाळण्याचे भान त्यांच्याकडून सुटले गेले. सतेज पाटील यांच्या काठी या विधानावर आक्षेपाची काठी महायुतीच्या नेत्यांनी उगारली होती. प्रचाराच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत असे महायुतीचे नेते सतत म्हणत असतात. पण ते जमादार यांच्या खाजगीतील आयुष्यात डोकवण्याच्या प्रयत्नावर मौन राखून आहेत. सभांमध्ये असले अश्लाघ्य प्रकार होत असल्याने प्रतिमा उंचावण्या ऐवजी धक्का लागण्याची शक्यता अधिक असल्याचे याआधीच्या निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. विरोधकांना जिरविण्याची, घायाळ करण्याची अनेक नैतिक मार्गाची आयुधे प्रचारानितीमध्ये असताना ग्रामसिंहाला साजेशी भाषा वापरली जाऊ लागल्याने त्यातून कोल्हापूरच्या पुरोगामी प्रतिमेला छेद लागतो याचे तारतम्य पुरते हरवले जात आहे.