कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेचे वातावरण तप्त उन्हाप्रमाणे तापत चालले असताना आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चक्क हवाई भराऱ्या घेऊ लागल्या आहेत. प्रसंगी मतदारांना हेलिकॉप्टरमधून आणा या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विधानाने गगनभेदी वादाने उसळी घेतली. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी हेलिकॉप्टरमधून मतदारांना आणा म्हणणाऱ्यांनी किती माया गोळा केली आहे, असे म्हणत मुश्रीफ यांच्यासह विरोधकांच्या आर्थिक गब्बरतेवर हल्ला चढवला आहे. दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्या आणखी एका विधानावरून ठाकरे सेनेने टीका केली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज हे निवडणूक लढवत आहेत. शिंदे सेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे पुन्हा संसदेत जाण्याच्या तयारीने रिंगणात उतरले आहेत. महायुतीकडे बड्या नेत्यांचा ताफा धडाक्यात प्रचारात उतरला आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सहा काँग्रेसचे आमदार काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या रुपाने महाराजांचे लोकसभेत पाऊल पडावे यासाठी धडाडीने प्रचार सुरू केला आहे. यामुळे कोल्हापूरचे रण चांगलेच तापले आहे. छत्रपती आणि मंडलिक घराण्यात पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा सामना होऊ घातला आहे.
हेही वाचा – ममतादीदींच्या भाच्यासमोर कोणाचं आव्हान? डायमंड हार्बर कोण जिंकणार?
गंमत अंगलट
निवडणूक म्हटले की आरोप प्रत्यारोप आणि धडाकेबाज विधाने यांना ऊत आलेला असतो. कोल्हापूरची ही निवडणूक याला अपवाद कशी ठरेल बरे. कागल विधानसभा मतदारसंघातील आमदार हसन मुश्रीफ, त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे माजी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजित सिंह घाटगे आणि उमेदवार संजय मंडलिक हे तिघेही याच तालुक्यातले असल्याने येथेच इतके मताधिक्य घ्यायचे की ते निर्णायक ठरले पाहिजे अशी रणनीती आखली जात आहे. हाच संदर्भ घेऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तालुक्यातील सभेत यांनी काही विधाने केली. तसेही मुश्रीफ यांची प्रकृती ही अघळ पघळ नि त्याला साजेशी बेधडक बोलणारी. त्याला अनुसरूनच ते बोलते झाले. आपण सर्वांनी जुने मतभेद विसरून एकत्र प्रचार केला तर संजय मंडलिक यांना तालुक्यात लाख – सव्वा लाखाचे मताधिक्य सहज घेता येईल. असे झाले तर संजय मंडलिक यांचा पराभव करणे प्रत्यक्ष भगवान आला तरी शक्य होणार नाही, असे ते म्हणाले. त्याही पुढे जात त्यांनी अतिशयोक्ती सदरात मोडणारे एक विधान केल्याने वादाला निमंत्रण मिळाले. कार्यकर्त्यांनी अधिकाधिक मतदान करवून घेण्यासाठी सतर्क कसे राहिले पाहिजे याबाबत सूचना करत असताना मुश्रीफ वदले, प्रसंगी मुंबई, पुणे इतकेच काय अमेरिकेतूनही लागले तर हेलिकॉप्टरमधून मतदारांना आणा आणि मतदान करून घ्या ! खरे तर हे गमतीशीर विधान. पण तीच मुश्रीफ यांच्या अंगलट येऊन त्यावरून टीकेचे काहूर उठले. जयंत पाटील, सुप्रिया सुळे या शरद पवार गटातील नेत्यांनी मुश्रीफ यांना लक्ष्य केले.
मैत्री विसरून प्रहार
वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांचे चांगले गुळपीठ होते. मुश्रीफ यांच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची सांगता ही जयंत पाटील यांच्या सभेने व्हायची. पाटील हेही मुश्रीफ यांच्या धडाडीच्या कार्याचे भरभरून वर्णन करायचे. त्यांना विजयी करा, असे आवाहन करायला विसरत नसत. आता समीकरणे बदलली आहेत. दोघेही विभक्त राष्ट्रवादीच्या दोन टोकावर नेतृत्व करीत आहेत. मुश्रीफ यांच्या विधानाचा समाचार घेताना जयंत पाटील यांनी पिसे काढली. ‘हेलिकॉप्टरमधून मतदारांना आणून सगळी व्यवस्था करायची ठरलेले दिसते. याचा अर्थ आमचे विरोधक पैशाने गब्बर झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेला हे उदाहरण लक्षात आणून देण्यास पुरेसे आहे. किती प्रचंड माया यांनी गोळा केली आहे हे समजते. हेलिकॉप्टरमधून मतदारांना आणा असे म्हणणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी करत त्यांनी आपल्या पूर्वीच्या सहकाऱ्यांवर आणि आताच्या प्रतिस्पर्ध्यावर टीकेचे आसूड ओढले. या मुद्द्यावर बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी बडे लोक बडी बाते असे म्हणत मुश्रीफ यांच्यावर टीका केली. प्रत्युत्तर न देतील तर ते मुश्रीफ कसले ? त्यांनी लगोलग परतफेड केली. ‘माझ्या त्या विधानावर टीका करणारे जयंत पाटील हे स्वतः मात्र हेलिकॉप्टरने आले होते. कार्यकर्त्यांना ऊर्जा, बळ देण्यासाठी मी तो शब्दप्रयोग केला होता. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे नमूद करून मुश्रीफ यांनी आपल्या बाजूने तरी वादाची उड्डाणे घेणाऱ्या या वादावर पडदा टाकलेला दिसतो.
हेही वाचा – काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचे ‘तीनतेरा’; NC, PDP ने एकमेकांविरोधात दिले उमेदवार
वादात देव
भगवान आला तरी मंडलिक यांचा पराभव शक्य नाही या मुश्रीफ यांच्या विधानावरून आणखी एक वाद उद्भवला. शिवसेनेचे ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय पवार यांनी, मुश्रीफ साहेब तुम्हाला इतका अंहकार कोठून आला की थेट हिंदू देवतांना निवडणुकीत ओढत आहात. हिंदू देवतांचा अपमान करून समाजात तेढ निर्माण होईल असे विधान करू नका. निवडणूक विभागाने या विधानाची दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पवार यांनी केली आहे. एकूणच निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरायच्या आधीच कोल्हापूरच्या कुरुक्षेत्रावर वार – प्रतिवार सुरू झाले आहे.