कोल्हापूर : स्थानिक जनता आणि स्थानिकच वक्ते अशा मर्यादित वर्तुळात कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार फिरत आहे. पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी नेत्यांच्या सभा होणार असल्याने वातावरण ढवळून जाण्यास मदत होणार आहे. यामुळे निवडणुकीचे कथन कोणत्या पातळीवर जाणार, त्याचा कोणाला, कितपत लाभ होणार हेही निर्णायक ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार तसा रंगात आला आहे. प्रत्येक उमेदवारांनी जवळपास प्रत्येक तालुका, विधानसभा मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. आता दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. पहिल्या पातळीवर गाठीभेटी. संवाद यावर भर होता. पुढे कार्यकर्त्यांच्या बैठका, माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य अशांच्या बैठका पार पडल्या. त्यातून अंदाज घेऊन आता सभा, मेळावे यावर भर दिला जात आहे. मतदार, गर्दीचा प्रतिसाद कितपत मिळतो याची चाचपणी केली जात आहे. तळातल्या मतदाराचा अंदाज येत नसल्याने स्थानिक नेते संभ्रमात आहेत.

हेही वाचा : एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”

स्थानिक नेतृत्वावर धुरा

शिवाय प्रचाराची भिस्तअजूनही जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वावर आहे. कोल्हापुरात श्रीमंत शाहू महाराज व खासदार संजय मंडलिक या महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांमध्ये लढत होत आहे. शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी नियोजन चालवले आहे. शिवाय पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील,जयश्री जाधव या आमदारांनी वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. महायुती मध्ये स्थानिक बड्या नेत्यांचा प्रभाव अधिक जाणवतो. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, समरजित घाटगे, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर यांच्या सभांमुळे वातावरण निर्मिती होत आहे. तथापि अजूनही मुख्य मांडणी ही जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वाकडूनच होत आहे. प्रभावशाली बड्या नेत्यांच्या सभापासून प्रचार अजून दूर आहे. शेजारच्या जिल्ह्यातील उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार गजानन कीर्तिकर अशा काही सभा पार पडल्या आहेत. काँग्रेसला मोठ्या सभा नेत्यांची प्रतीक्षा आहे.

तारांकित प्रचारक अभावाने

असेच काहीसे चित्र हातकणंगले मतदारसंघात ही दिसत आहे. येथे खासदार महायुतीचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, वंचितचे डी. सी. पाटील, शेतकरी नेते रघुनाथ पाटील असा पंचरंगी सामना आहे. येथे अजूनही स्थानिक पातळीवरच्या सभा होत आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच तारांकित प्रचारक आहेत. एकूणच महायुती – इंडिया आघाडी यांच्या प्रचारात तारांकित प्रचारक अजून तरी अभावानेच दिसत आहेत.

हेही वाचा : “…भारताची परिस्थिती रशियासारखी होईल”, भगवंत मान यांचा आरोप; मोदींविषयी काय म्हणाले?

मोदी, पवार, ठाकरे

प्रचाराला शेवटच्या टप्यात महायुती व महाविकास आघाडी कडून राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांचे आयोजन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातील तपोवन मैदानात रविवारी (२८ एप्रिल) सभा होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची इचलकरंजी सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. या सभांमध्ये हिंदुत्वाच्या पूरक अशी मांडणी अपेक्षित असल्याचे कार्यकर्ते सांगतात. त्यातून निवडणुकीतील वातावरण निर्मितीला मोठी मदत होईल असा दावा केला जात आहे. त्यामुळे या सभा झाल्यानंतर आधीचे वातावरण पुसून नवा विचार मांडण्याच्या हालचाली महाविकास आघाडी कडून सुरू आहेत. १ मे रोजी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची कोल्हापूर व इचलकरंजी येथे सभा होणार आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्याही सभा होणार आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना निमंत्रित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur lok sabha last phase with rally of pm modi yogi adityanath sharad pawar uddhav thackeray print politics news css
Show comments