कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरचे संजय मंडलिक व हातकणंगलेचे धैर्यशील माने या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या दोन्ही खासदारांना अजूनही उमेदवारीची प्रतीक्षा करावी लागत आहे. माने – मंडलिक यांच्या घराण्यात खासदारकीचा वारसा आहे. दोन्ही मातबर घराण्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष जणू पाचवीला पुजला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक घराण्यांचा राजकारणात दबदबा राहिला आहे. माने – मंडलिक ही दोन घराणी त्यातील प्रमुख म्हणता येतील. घराण्यात अनेकदा खासदारकी आली असतानाही लोकसभा निवडणुकीवेळी या घराण्यांना उमेदवारीसाठी संघर्ष समानार्थी शब्द करावा लागल्याचा इतिहास आहे.

हेही वाचा – वंचितच्या भूमिकेने औरंगाबादमध्ये ठाकरे गटात चलबिचल

दिवंगत खासदार बाळासाहेब माने हे काँग्रेसकडून पाच वेळा निवडून आले, त्यांना उमेदवारीसाठी फारशी झुंज द्यावी लागली नसली तरी निवडून येताना काँग्रेस अंतर्गतच झगडावे लागले होते. त्यांच्या पश्चात स्नुषा निवेदिता माने यांनी १९९६ साली काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. शरद पवार यांचे पाठबळ असल्याने माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे उमेदवारी मिळवून विजयी झाले. पुढील वेळी माने यांनी पुन्हा प्रयत्न केले. पण विद्यमान खासदार या निकषाच्या आधारे आवाडे यांच्याकडेच उमेदवारी राहिली. त्यावर माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली पण त्यातही अपयश आले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर माने यांनी धनुष्यबाणाचा त्याग करून हाती घड्याळ बांधले. त्यांनी आवाडे यांचा पराभव केला. २००४ साली आवाडे यांनी निवडणुकीची तयारी केल्याने माने यांना पुन्हा उमेदवारीसाठी मुकाबला करावा लागला. यावेळी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याने ज्येष्ठांनी केलेल्या प्रयत्नाने आवाडे यांना राज्यसभेचा शब्द देऊन थांबवले. माने यांना उमेदवारी मिळून विजयी झाल्या. पुढील निवडणुकीत माने या राजू शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्या. मागील लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून माने कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला. नवख्या धर्यशील माने यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली आणि ते शेट्टी यांचा पराभव करून विजयी झाले. आता उमेदवारी मिळवण्यासाठी धैर्यशील माने यांना महायुतीतील मित्रपक्ष भाजपशी कलहाला तोंड द्यावे लागत असताना दुसरीकडे आवाडे हेही महायुतीकडून इच्छुक असल्याने जुना वाद वर येतो आहे.

पिता – पुत्रांची संघर्षगाथा

असाच काहीस इतिहास मंडलिक कुटुंबियांचा आहे. तीन वेळा आमदार, राज्यात मंत्री झालेले सदाशिवराव मंडलिक यांना राष्ट्रीय राजकारण खुणावू लागले. १९९८ साली ते पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात काँग्रेस पक्षाकडून उतरले. त्यांनी शिवसेनेचे विक्रमसिंहराजे घाटगे यांचा पराभव केला. त्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर मंडलिक यांनी ११९९ ची निवडणूक या पक्षाकडून लढवली. तेव्हा त्यांचा सामना काँगेसकडून पाच वेळा खासदार झालेले उदयसिंहराव गायकवाड यांच्याशी झाला. त्याही निवडणुकीत मंडलिक विजयी झाले. २००४ साली त्यांनी राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यावर मात केली. पुढे मंडलिक यांचे शरद पवार यांच्याशी तीव्र मतभेद झाले. त्यामुळे २००९ च्या निवडणुकीत मंडलिक यांनी एकाकी वाटचाल करताना राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव केला.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

हेही वाचा – विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यांना राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांनी पराभूत केले. मागील निवडणुकीत संजय मंडलिक यांनी सेनेकडून लढताना धनंजय महाडिक यांचा पराभव करून उट्टे काढले होते. कोल्हापुरातील शिवसेनेचा पहिला खासदार अशी संजय मंडलिक यांची ओळख असताना आता उमेदवारीसाठी त्यांच्यावर भाजपशी सामना करण्याची वेळ आली असताना याचवेळी महाडिक कुटुंबीयांनीही उमेदवारीचा दावा केल्याने आधीचा झगडा पुन्हा चव्हाट्यावर येतो आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur lok sabha mp from shinde group dhairyasheel mane and sanjay mandalik struggle continues print politics news ssb