कोल्हापूर : विरोधकांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू असलेला गादीचा विषय कालबाह्य असल्याचे अधोरेखित करत कोल्हापूरकरांनी लोकसभा निवडणुकीत गादीला मान आणि भरभरून मते दिली. मतदारांचा हा कल कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज यांना संसदेत पोचवणारा ठरला. तब्बल दीड लाखाच्या मताधिक्याने काँग्रेसचे शाहू महाराज यांनी विजयी होताना खासदार संजय मंडलिक यांचा पराभव केला. सदाशिवराव मंडलिक यांनी युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा पंधरा वर्षांपूर्वी केलेल्या पराभवाची परतफेड पित्याने केल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले.
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती घराण्याला उमेदवारी मिळणे हीच मोठी नवलाई होती. मुळात या मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता होती. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील, दिवंगत आमदार पी. एन. पाटील ही सक्षम नावे पुढे आली. त्यांनी एकमेकाकडे बोट दाखवून अंग काढून घेण्याचे चापल्य चतुराईने दाखवले. उमेदवारीचा शोध सुरू असताना सतेज पाटील यांनी आश्चर्यकारक चेहरा समोर येईल असे विधान केले. आणि तो श्रीमंत शाहू महाराज यांच्यापर्यंत येऊन ठेपला त्यांची उमेदवारी जाहीर करण्यातच काँग्रेसचे निम्मे यश दडले होते.
तथापि पंच्याहत्तरी ओलांडलेले राजेशाही वलयातील शाहू महाराज लोकसभा प्रचाराच्या धबडग्यात अखेरपर्यंत टिकून राहणार का यापासून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. संजय मंडलिक यांनी थेट उमेदवाराच्या छत्रपती असण्यावरच तिखट शब्दात हल्ला चढवायला सुरुवात केली. श्रीमंत शाहू महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत. वारस निश्चिती होताना मोठा वादंग माजला होता. आंदोलनांनी जोर पकडला होता, असा संदर्भ देत संजय मंडलिक यांनी मी माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांच्याप्रमाणे राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा खरा वारसदार आहे, असा युक्तिवाद केला होता.
छत्रपती विरुद्ध मंडलिक
अर्थात या वादाची बीजे २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दडलेली होती. तेव्हा तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या विरोधातील निवडणुकीला राजाविरुद्ध प्रजा असे भावनिक स्वरूप देऊन मैदान मारले होते. त्यामुळे हाच कित्ता त्यांचे पुत्र संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांच्या विरोधात गिरवायला सुरुवात केली. इतकेच काय मंडलिक वकील पुत्राने सुद्धा यावर बोचरे भाष्य केले होते. एकूणच मंडलिक घराण्यातील तीन पिढ्यांनी करवीर गादीच्या छत्रपती घराण्यातील दोन पिढ्यांवर गादीवरून वाद उत्पन्न केल्याचे दिसून आले.
अर्थात, हा वाद केवळ मंडलिक यांच्या पुरता सीमित नव्हता. तर त्यामागे महायुतीच्या राजकारणाचे व्यापक डावपेच होते. यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी धुळ्यातील भाजपचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना खास विमानाने पाचारण करण्यात आले होते. कदमबांडे यांनी करवीर गादीच्या वारसाचा तपशील सादर करीत ‘ ते ‘ संपत्तीचे वारसदार असले तरी आपण खरे रक्ताचे वारसदार आहोत. कोल्हापुराच्या वाड्यातील काही मालमत्ता आपल्या मालकीचा असल्याचाही दावा त्यांनी केला. तोवर शांत असलेले शाहू महाराज यांनी ‘ राजर्षी शाहू महाराज यांचा पुरोगामी विचार तुम्ही स्वीकारला आहात का ,’ असा प्रतिप्रश्न करीत त्यांना नामोहरण केले. गादी विरुद्ध मोदी हि रणनीती तग धरू शकली नाही.
एकूणच एका बाजूला महायुतीचे नेते शाहू महाराज यांच्या विषयी आदर असल्याचे सांगत होते. पण आडून त्यांनी शाहू महाराज यांच्यावर टीकेचे वाग्बाण डागायला सुरुवात केली होती. खेरीज समाज माध्यमातून याविषयीचे जहरी टीका करणारे संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याची योजना होती. तथापि मतदारांनी अशा पद्धतीच्या प्रवृत्तीला थारा दिला नसल्याचे दिसून आले. अर्थात, याला शाहू महाराज यांच्या मवाळ स्वभावाची प्रतिमा कारणीभूत ठरली. खेरीज, राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूरवर केलेल्या अनंत उपकाराच उतराई म्हणून श्रीमंत शाहू महाराज यांना मतदान केल्याचेही एकंदरीत कल पाहता दिसत आहे. दीड लाखाहून अधिक मताधिक्य मिळाल्याने महायुतीची रणनीती फसल्याचे स्पष्ट झाले. बहुजन समाजाच्या बरोबरीनेच दलित, मागासवर्गीय यांनीही महाराजांना हात दिला.
हेही वाचा…विश्वजित कदमांची जयंत पाटील यांच्यावर मात ?
बड्या नेत्यांचे डावपेच
विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्यापासून काँग्रेसच्या पाचही आमदारांसह संभाजीराजे, मालोजीराजे या युवराजांचे व्यक्तिगत प्रयत्न गुलाल उधळण्यास कारणीभूत ठरले. महायुतीकडून संजय मंडलिक यांचा गट प्रभावी होता. खेरीज, पालकमंत्री हसन मुश्रीफ,खासदार धनंजय महाडिक या बड्या नेत्यांना अपेक्षित प्रभाव दाखवता आला नाही. कागल विधानसभा मतदारसंघात दीड लाखाचे मताधिक्य मिळेल असा दावा मुश्रीफ करत होते. खुद्द या भरवशाच्या जागी काही हजारात मिळालेले मताधिक्य पाहता नेते एका बाजूला आणि जनता महाराजांच्या बाजूने असल्याचे दिसून आले.