दयानंद लिपारे

कोल्हापूर : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय काँग्रेसचा थोरला भाऊ असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोल्हापुरात केला असतांना याच जिल्ह्यात राष्ट्रवादीची अवस्था मात्र थोरल्या भावाकडून धाकट्या भावाकडे सुरू झाली आहे. जिल्ह्यात आमदारांचे संख्याबळ वाढवावे अशी अपेक्षा पवार यांनी स्थानिक नेतृत्वाकडून केली असली तरी राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले मतदारसंघ पाहता पंख विस्तारण्याला नैसर्गिक मर्यादा आहेत. शिवाय, आता या दोन्ही काँग्रेसला जागावाटपात ठाकरे शिवसेनेला सामावून घ्यावे लागणार असल्याने उभय काँग्रेसच्या मतदारसंघाचा आणखी संकोच होणार असल्याने राष्ट्रवादीची झेप कुठवर हा प्रश्न उरतोच.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
kapil patil
कल्याण पश्चिमेत शिवसेना-भाजपचे कपील पाटील यांचे मनोमिलन?
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर

 विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात राजकीय स्थितीवर भाष्य करताना राज्यात विधानसभेतील आमदार संख्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस हा थोरला आहे. त्याहून कमी जागा असलेला कॉंग्रेस धाकटा भाऊ आहे, असे सांगत वादात भर घालून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक महत्त्व द्यावे असे अप्रत्यक्षपणे सूचित केले. त्याचवेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांचे संख्याबळ अधिक वाढवणे गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र या आकांक्षेला अनेक मर्यादा असल्याचेही दिसत आहे.

थोरला भाऊ ते धाकटा भाऊ

 कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरुवातीच्या काळात निर्विवाद वर्चस्व होते. पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत १९९९ साली ५ आमदार निवडून आले. जिल्ह्यातील दोन्ही खासदारही याच पक्षाचे झाले. राष्ट्रीय काँग्रेसला मागे सारे सारत राष्ट्रवादी काँग्रेस थोरला भाऊ झाला. पण हे थोरलेपणाचे ओझे राष्ट्रवादीला फार काळ पेलवता आले नाही. उत्तरोत्तर राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या घटत गेली. गेल्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ ( कागल) व राजेश पाटील (चंदगड) हे दोघेच आमदार निवडून आले. हाच संदर्भ देऊन पवार यांनी यापुढे ज्या जिल्ह्यात किमान चार आमदार असतील त्याच जिल्ह्याकडे मंत्रीपद सोपवले जाईल, असा सूचक इशारा दिला. तो कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत अडसर ठरू शकतो.

 विस्तार करायचा तरी कोठे ?

 राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या वाढवायचे म्हटले तरी कोल्हापूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मर्यादा आहे. जिल्ह्यात हा पक्ष कागल, गडहिंग्लज, आजरा, चंदगड या ४ तालुक्या आणि २ विधानसभा मतदारसंघा पुरता सीमित आहे. कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका क्षेत्रात पक्षाची अपेक्षित वाढ झालेली नाही. अन्य तालुक्यांमध्ये पक्षाची अवस्था क्षीण आहे. या साऱ्या ठिकाणी अंतर्गत मतभेदांनी पक्ष उतरणीला लागला आहे. राष्ट्रवादीकडील राधानगरी भुदरगड या मतदारसंघात माजी आमदार के. पी. पाटील हे दोनदा पराभूत झाले आहेत. यावेळी हा गड पुन्हा जिंकण्यासाठी पाटील यांनी जोर लावला आहे. पण चंदगड मध्ये राजेश पाटील यांचे लोकमत घटत आहे. खेरीज माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनीही अलीकडेच राजेश पाटील यांच्या विषयी प्रश्न उपस्थित केले असल्याने आमदारांचा यावेळचा मार्ग सुकर असल्याचे दिसत नाही. खुद्द मुश्रीफ यांनाही कागल मध्ये दरवेळे प्रमाणे झुंजावे लागणार आहे. हे तीन मतदारसंघ वगळले तर राष्ट्रवादीच्या वाट्याला अन्य मतदार संघ उरत नाही. शिरोळमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष निवडून आले. मातोश्रीवर शिवबंधन बांधून मंत्रीपद मिळवले पाटील आता शिंदे गटात असल्याने याही तालुक्यात राष्ट्रवादी आकुंचित पावली आहे. अन्य मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला गेले असल्याने राष्ट्रवादीच्या वाढीला नैसर्गिक मर्यादा आहे.

 अडचणीत भर

 भरीत भर म्हणून आता दोन्ही काँग्रेसपुरते असलेल्या राजकीय समीकरणात ठाकरे शिवसेनेचा समावेश झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला ठाकरे सेनेसाठी प्रत्येकी किमान एखादी जागा सोडावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हक्काचा एखादा मतदारसंघ सोडावा लागला तर आमदारांची संख्यावाढ होण्याऐवजी ओहोटी लागण्याची शक्यता अधिक. या सर्व राजकीय मर्यादा लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला कोल्हापूर जिल्ह्यात वाटचाल करणे हे अधिकच आव्हानास्पद बनत चालले आहे.