दयानंद लिपारे , लोकसत्ता
कोल्हापूर : पुरोगामी विचारधारा शिरोधार्य ठेवत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. या पक्षातून फुटून बाहेर पडलेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गट याच विचारांचा पाईक. पुरोगामी म्हणवून घ्यायचे तर दोघांकडूनही फुले, शाहू, आंबेडकर यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून वाटचाल करतो असे म्हणजे ओघाने आलेच. कोल्हापूरातील शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्याही सभेत पुरोगामी विचारांचं गजर केला गेला खरा. कोल्हापुरी पायतानाने सडकून काढण्याची उग्र भाषा पुनःपुन्हा करीत राहिली, त्यावर हाच तो पुरोगामी विचार का, असा प्रश्न कोल्हापुरातील विचारवंतांना पडला आहे. कोल्हापुरी पायतानाचा (चप्पल) असा मारहाणी करिता उद्धार होत राहिल्याने चप्पल कारागीर चिंताक्रांत बनले आहेत.
राष्ट्रवादी मध्ये फूट पडली म्हणून काय झाले पुरोगामी विचारधारा कोण सोडणार ?. त्यात पुरोगामी चेहऱ्याचे कोल्हापूर म्हटल्यावर त्याची चर्चा अंमळ अधिकच होणार. तशी मांडणी साहेब आणि दादांच्या सभेत ठळकपणे झालीच. पण मुद्दा आहे तो फुले, शाहू, आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा जपताना त्याच्या मूल्यांचा ! सभा कोल्हापूर सारख्या रांगड्या शहरात होणार म्हटल्यावर इथल्या तांबडा पांढरा, मिसळ, अलंकार, गूळ ,कुस्ती, चप्पल या परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख करणे ओघांनेच आले. इथंपर्यंत मामला ठीक होता. पण आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागल्या तसा तोल आणि संयम सुटत गेला. तुफान हल्लाबोल करण्याच्या नादात वारंवार पादत्राणाचा उल्लेख दोन्हीकडून होत राहिला.विशेष म्हणजे चेले पर्यटनाचा प्रसाद देण्याची ठोकशाहीची भाषा करीत असताना ना त्यांना साहेबानी रोखले ना दादांनी. उलट शरद पवार यांना आव्हाड यांच्या पायताणांची भाषा केल्याबद्दल पत्रकारांनी विचारानं केली तेव्हा त्यांनी कानावर हात ठेवले. ते असे काही बोलले हे मी ऐकले नाही, असे म्हणत पवारांनी विषय झटकला.
आणखी वाचा-सनातन धर्म वाद : मणिपूर, अदानी ते नोकरी, एम. के. स्टॅलिन यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल!
कोल्हापुरी पायताण ते कोथळा
सुरुवात केली जितेंद्र आव्हाड यांनी.पक्षातील फुटीरांना उद्देशून बिळातून साप बाहेर आले आहेत. ठेचण्यासाठी कोल्हापुरी चप्पल काढली पाहिजे, असा टोला लगावला. झाले त्यावरून राष्ट्रवादीतील चप्पल युद्ध रंगले. हा मुद्दा झोंबला तो स्थनिक नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना. त्यांनी उत्तर देताना कोल्हापुरातील कापशी चप्पल प्रसिद्ध आहे; ती बसली की कळेल, असा प्रतिटोला लगावला. वाद येथेच थांबणे अपेक्षित होते. पण संयम राखतील तर ते राजकारणी म्हणायचे ? खरे तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट फुले, शाहू, आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा जपतो, असे कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत आवर्जून सांगत होते. तीन आठवड्या नंतर कोल्हापुरात झालेल्या सभेत पुन्हा एकदा जुगलबंदीत फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांनी जुन्या जखमेची खपली उकरून काढली. कोल्हापूरकरांना पायताण कसं बनवायचं, ते पायात कसं घालायचं आणि पायातलं काढून योग्य वेळेला चुकल्यावर कुठे वाजवायचं हे माहित आहे, असं विधान केले. त्याही पुढे जात त्यांनी ज्याने कुणी कोल्हापुरात येऊन पायताणाची भाषा केली; त्याला प्रेमाने जरी मुश्रीफ साहेबांनी मिठी मारली तरी, त्याच्या बरगड्या राहतील का? असे सणसणीत प्रतित्तूर दिले. आव्हाड गप्प बसतील तर ते नेते कसले ? त्यांनीही ट्विट द्वारे मुंडे यांना जबरी उत्तर दिले. कदाचित मुंडेंना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही की, बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो, अशा शब्दात सव्याज परतफेड त्यांनी केली. पुरोगामी विचारधारेचा जप करताना कोल्हापुरी चपलेचा विषय किती ताणवायचा याचे भान दोन्ही गटाकडून सुटले.
आणखी वाचा-अमरावतीत दहीहंडीचा खेळ की राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा ?
पण मुळात पुरोगामी विचारधारा हल्ली खरोखरीच उरली आहे का,असा मुद्दा उपस्थित होतो आहे. कोल्हापूरचे दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे यांनी महाराष्ट्र पुरोगामी होता आता राहिला नाही, असा बोचरे भाष्य नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनानंतर झालेल्या सभेत परखडपणे केले होते. आताही राष्ट्रवादीचे दोन्ही गट आम्ही पुरोगामीच असल्याचा दावा करत असले तरी अभ्यासकांना त्यात तथ्य वाटत नाही. याबाबत राजकीय अभ्यासक प्रसाद कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले कि, मुळात राजकीय पक्षांची प्रचार, टीकेची पातळी घसरली आहे. चढाओढ करण्याच्या नादात स्तर गमावला गेला आहे. स्वतःला पुरोगामी म्हणवले जात असले तरी अशांचा विचार आणि व्यवहार याच्यामध्ये महद अंतर पडले आहे. स्वयंघोषित पुरोगामी असल्याचे जाहीर करणे आणि त्या विचारधारेची मुळापासून जोपासना करणे हे आव्हानात्मक आहे. शरद पवार अजित पवार या दोघांनी पुरोगामी विचारांचे आहोत असे म्हंटले असले तरी त्यांचे समर्थक मात्र चप्पलेने थोबाडण्याची चवचाल भाषा करीत आहेत हा विचारसरणीतील विरोधाभास आहे. उभय पवारांचेच मार्गदर्शक आणि निकटचे नातेवाईक ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांचे विचार आणि जीवन कार्य त्यांनी जवळून पाहिले तरी पुरोगामी असणे म्हणजे काय असते हे कळू शकेल.
कलेचा अवमान
कोल्हापुरी चपलेचा नेत्त्यांकडून मारहाणीसाठी होत असलेल्या वापराबद्दल कोल्हापुरातील कारागिरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापुरी चपलेचा जगभर लौकिक झाला आहे. तिचा दर्जा, आरोग्यासाठी उपयुक्तता, कलाकुसर याचा प्रचार- प्रसार राजकीय नेत्यांनी करणे अपेक्षित असताना तिचा मारझोड करण्यासाठी वापर करावा असे जाहीरपणे सांगणे या मनाला वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत. खरे तर या नेत्यांनी सत्तेत असताना वा नसताना कोल्हापुरी चप्पल व्यवसायाची प्रगती, विस्तार, अडचणी निवारण्यासाठी काय केले याचे चिंतन केले पाहिजे,असे मत कोल्हापूर चप्पल क्लस्टरचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी व्यक्त केले.