Kolkata Doctor Case March to Nabanna by Chhatra Samaj : कोलकाता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावं, निवासी डॉक्टरांना सुरक्षा मिळावी यासह इतर काही मागण्या घेऊन देशभरातील डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. कोलकात्यासह देशभरात आंदोलनं चालू आहेत. अशातच एका नवीन विद्यार्थी संघटनेने या आंदोलनात उडी घेतली आहे. ‘पश्चिमबंग छात्र समाज’ या संघटनेने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पश्चिमबंग छात्र समाज संघटनेने आज (२७ ऑगस्ट) कोलकाता कॉलेज स्क्वेअर येथून राज्य सचिवालय नबान्नाच्या दिशेने मोर्चा काढला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीदेखील त्यांनी हा मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना मोर्चाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच रोखलं. मात्र यावेळी पोलसांवर दगडफेक झाली. परिणामी या मोर्चाला बेकायदा मोर्चा म्हणत पोलिसांनी आदोलकांवर पाण्याचा फवारा केला. तसेच त्यांच्यावर अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या.
आंदलकांकडून पोलिसांवर दगडफेक
आंदोलनकांनी बॅरिकेड्स तोडून, बाजूला करून पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दुसऱ्या बाजूला या विद्यार्थी संघटनेला व त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या भाजपाने दावा केला आहे की पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना कोणत्याही मार्गाने सचिवालयाकडे जाण्यापासून रोखलं. याकरता जवळपास ६ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
हे ही वाचा >> MP Kangana Ranaut: भाजपाने खासदार कंगना रणौत यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्यापासून फारकत का घेतली?
हिंसाचारामागे भाजपाचा हात?
छात्र समाजने या मोर्चाला ‘नबन्ना अभिजन’ असं नाव दिलं होतं. मात्र हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. कोलकात्याच्या रस्त्यांवर अराजक माजवण्यासाठी हा मोर्चा काढला जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला होता. तसेच त्यांनी पश्चिम मेदिनीपूरमधील घाटल येथील एका भाजपा नेत्याचे दोन व्हिडीओ जारी केले होते. ज्यात भाजपाने छात्र समाजच्या मोर्चाआड हिंसाचार करण्याची योजना आखल्याचा दावा करण्यात आला आहे. लोकसत्ता डॉट कॉमने या व्हिडीओंची सत्यता तपासलेली नाही.
पोलीस काय म्हणाले?
कोलकात्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) मनोज वर्मा यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “नबन्ना हे प्रतिबंधित क्षेत्र आहे. सचिवालयाजवळ बीएनएसएसचे कलम १६३ लागू आहे. त्यामुळे तिथे जमावास परवानगी नाही. तसेच आम्हाला आमच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली आहे की या मोर्चाच्या आडून काही लोक हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत”.
हे ही वाचा >> Female Doctor Attacked : केस ओढले, बेडवर डोकं आपटलं, महिला डॉक्टरवर रुग्णाचा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद
काय आहे पश्चिमबंग छात्र समाज?
पश्चिबंग छात्र समाज म्हणजे पश्चिम बंगालमधील विद्यार्थ्यांचा समाज किंवा संघटना. ही नोंदणी नसलेली विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेतील सदस्यांनी दावा केला आहे की त्यांची संघटना अराजकीय आहे. छात्र समाज संघटनेच्या नेत्यांपैकी एक तरूण सायन लाहिरी याने कोलकाता प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी तो म्हणाला, “आमचा मोर्चा अराजकीय आहे. आमचे कोणत्याही पक्षाशी राजकीय संबंध आहेत का ते शोधण्याचा प्रयत्न करू नका. ही एक सामाजिक चळवळ आहे. आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना आमच्या मोर्चापासून दूर राहण्याची विनंती करत आहोत. या मोर्चातून कोणत्याही राजकीय पक्षाला फायदा होऊ नये, किंबहुना कोणीही याचा राजकीय फायदा करून घेऊ नये, अशी आमची इच्छा आहे”.
कॉलेज स्क्वेअर ते नबन्ना रस्त्यावर हिंसाचार
आज सकाळी आंदोलकांचा एक गट कॉलेज चौकात जमला आणि त्यांनी नबान्नाकडे कूच केली. बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी घोषणाबाजी करत नबन्नाच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. या आंदोलनात अनेक विद्यार्थी संघटना, नागरिक मंच व सामान्य नागरिक सहभागी झाले होते. आंदोलक त्यांच्या मार्गातील बॅरिकेड्स हटवत पुढे कूच करत होते. दुपारी १ च्या सुमारास हावडा आणि कोलकाता येथील विविध भागांतून काही लोकांनी भारताचा राष्ट्रध्वज फडकावत सरकारविरोधी घोषणाबाजी करत आंदोलनात उडी घेतली आणि राज्य सचिवालय म्हणजेच ‘नबान्ना’च्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. आंदोलकांनी संत्रागाछी बॅरिकेड्स तोडले, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच पाण्याच्या तोफांचाही वापर केला. दरम्यान, आंदोलक संत्रागाछी रेल्वे स्थानकावर गेले आणि त्यांनी प्रत्युत्तरादाखल पोलिसांवर दगडफेक केली.