Kolkata Rape : कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयात या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेमुळे सगळा देश हादरला होता. या प्रकरणात आता पीडितेच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट मागितली आहे.

पीडितेच्या आईने काय म्हटलं आहे?

मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचं आहे. माझी मुलगी तर आता नाही. पण आम्हाला या प्रकरणात न्याय हवा आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचं आहे. किमान आता तरी आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे असंही पीडितेच्या आईने म्हटलं आहे.

आमच्या मुलीची स्वप्नं अधुरीच राहिली-पीडितेची आई

पीडितेच्या आईने म्हटलंय की, “आमच्या मुलीने कायमच मोठी स्वप्नं पाहिली होती. तिची हत्या होईल आणि तिला असं मरण येईल हे तर कधी वाटलंही नव्हत. आज सात महिने झाले आहेत ती या जगात नाही. पण आम्हाला न्याय मिळालेला नाही. एवढंच काय आम्हाला आमच्या मुलीच्या मृत्यूचं प्रमाणपत्रही मिळालेलं नाही.”

कोलकाता येथील घटना काय?

कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला. या घटनेवरुन देशभरातले रुग्णालयातले डॉक्टर आणि विद्यार्थी डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाले होते. या घटनेचा निषेध नोंदवत त्यांनी तीन महिने काम बंद ठेवलं होतं. तसंच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला होता. या घटनेत आरोपी संजय रॉयला लगेचच अटक करण्यात आली. संजय रॉय हा विकृत प्रवृत्तीचा माणूस असल्याचं त्याच्या सासूने मीडियाला सांगितलं होतं. तसंच महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करण्याआधी कोलकाता येथील सोनागाछी या ठिकाणी असलेल्या रेड लाइट भागात गेला होता अशीही माहिती समोर आली आहे होती. दरम्यान जानेवारी २०२५ मध्ये कोर्टाने निकाल देत संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता पीडितेच्या आईने या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घालावं अशी मागणी केली आहे.

जानेवारी २०२५ मध्ये काय म्हणाले होते पीडितेचे पालक?

आरजी कर महाविद्यालय आणि रुग्णालयात बलात्कार आणि हत्या प्रकरणात जानेवारी २०२५ मध्ये आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर मृत डॉक्टरांच्या पालकांनी पीटीआयला सांगितलं होतं, “आम्हाला धक्का बसला आहे. हे ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ प्रकरण कसे नाही? ड्युटीवर असलेल्या डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. आम्ही हताश झालो आहोत. या गुन्ह्यामागे मोठे षडयंत्र होते.” असं म्हटलं होतं. आता पीडितेच्या आईने पुन्हा एकदा या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा असं म्हटलं आहे.

Story img Loader