मुंबई: भाजप नेते नारायण राणे यांच्यापासून सुरु झालेली शिवसेना ठाकरे पक्षातील गळती माजी आमदार राजन साळवी यांच्यापर्यंत येऊन सध्या थांबली आहे. ही गळती रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न ठाकरे गटाने सुरु केले आहेत. त्यासाठी कोकणातील प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक शिवसेना भवनात आयोजित करण्यात आली. तीस वर्षापूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कोकणात आता ठाकरे पक्षाचे विनायक राऊत, वैभव नाईक व भास्कर जाधव हे असे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच नेते शिल्लक राहिले आहेत. नाईक, जाधव यांच्या विधानाने त्यांच्या बद्दल उलट सुलट चर्चा आहे. नाईक यांच्या महायुतीतील प्रवेशाला राणे यांचा खोडा आहे तर लहरी जाधवांचे काही सांगता येत नाही, असे शिवसेनेतच बोलले जाते.
३५ वर्षापूर्वी नारायण राणे यांनी शिवसेनेचे खाते कणकवली उघडले. त्यानंतर १९९५ मध्ये ठाण्यासह कोकणात शिवसेनेचे २४ आमदार निवडून आले. त्याच बळावर शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री (मनोहर जोशी) झाला. सध्या ठाकरे गटाकडे साधी ग्रामपंचायत ताब्यात नाही. सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळ नगरपंचायत काही दिवसापूर्वी हातातून गेली. लक्ष्मीदर्शनाच्या जोरावर शिंदे पक्षाने ठाकरे पक्षाचे सदस्य आपल्याकडे वळविले. सध्या पक्षाचे एकही खासदार नाही. आमदार म्हणून गुहागरचे भास्कर जाधव तेवढे नावाला शिल्लक आहेत. सत्ता, संपत्ती, सुरक्षितता, विकास निधी, आणि शिंदे यांची सहज उपलब्धता यामुळे कोकणातील नेत्यांबरोबर कार्यकर्ते शिंदे पक्षाकडे आर्कषित होऊ लागले आहेत. याऊलट ठाकरे पक्षाची किमान पाच वर्षे सत्ता येण्याचे दृष्टीक्षेपात नाही. उध्दव ठाकरे यांची सहज न मिळणारी वेळ. ठाकरे नावाच्या करिष्य्मातून न पडलेली प्रतिमा यामुळे ठाकरे पक्षातील कार्यकर्ते तुटण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी पेटून उठलेला तरुण शिवसेनेकडे नव्वदच्या दशकात ओढला गेला. काँग्रेस आणि समाजवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेचा प्रभाव दिसू लागला. कणकवली मधून नारायण राणे यांनी शिवसेनेला यश मिळवून दिले. १९९१-९२ मधील मुंबई दंगलीचा कोकणावर खोलवर परिणाम झाला. शिवसेना वाढली पाहिजे हा विचार पत्र लिहून कळवला जाऊ लागला. तीस वर्षानंतर तळकोकणातील नारायण राणे, रत्नागिरीतील रामदास कदम, उदय सामंत, दीपक केसरकर, सुभाष बने, मूळ शिवसेनेची साथ सोडून शिंदे सेनेची सोबत करत आहेत. ‘कोकणात शिवसेना वाढवा’ या बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाची पुर्नरावृत्ती शिवसेनेचे मुख्य नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केली आहे. भाजपकडे जाणाऱ्या राजन साळवी यांना शिंदे सेनेत खेचून आणण्याचे कसब शिंदे यांनी दाखविले. कोकणात शिल्लक राहिलेले आजी माजी दोन आमदार गळाला लावणयाचे काम शिंदे सेनेतील दुसऱ्या फळीवर सोपविण्यात आले आहे. शिंदे पूत्र डाॅ. श्रीकांत शिंदे या फळीचे नेतृत्व करीत आहेत. आगामी काळात ग्रामपंचायत पासून ते महापालिकांपर्यंतच्या निवडूका होणार आहेत. या निवडणूकीत शिंदे पक्षाला आपली ताकद दाखवायची आहे. मुंबईसह कोकण काबीज केल्यास आगामी काळात पक्षाला पुन्हा मुख्यमंत्री पद पुन्हा मिळू शकते असा मतप्रवाह पक्षात तयार आहे.