पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ‘ टेन्शन ‘ वाढले आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बंडखोरी करत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे) पक्षाने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना तर मनसेने माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी होत आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर इच्छुक होते. मागील तीन ते चार महिन्यांपासून कोथरूडमधून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी बालवडकर यांनी केली होती. त्यासाठी विविध कार्यक्रम देखील त्यांनी मतदार संघात घेतले होते. या मतदारसंघातून पक्ष आपल्यालाच तिकीट देणार असल्याचा दावा करत बालवडकर यांनी पहिल्या दिवसापासूनच विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांना आव्हान उभे केले होते.

हेही वाचा >>>Nalasopara Vidhan Sabha Constituency : कॉंग्रेसची उमेदवारी हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या पथ्थ्यावर

भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिला यादीतच कोथरूडमधून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे कोथरूडमधून इच्छुक असलेले अमोल बालवडकर काेणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीमध्ये कोथरूड शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे असल्याने बालवडकर शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. मात्र तेथून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना संधी देण्यात आली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी किशोर शिंदे यांच्यावर विश्वास टाकत त्यांना पुन्हा एकदा कोथरूडमधून पुन्हा उमेदवारी दिली आहे.

कोथरूडमधील मतदारांना सक्षम असा पर्याय उपलब्ध नव्हता त्यामुळे नागरिकांच्या आणि मतदारांच्या आग्रहास्तव या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे अमोल बालवडकर यांनी जाहीर केले आहे. कोथरूडचा वापर केवळ राजकारणासाठी होत आहे. या भागाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. या मतदारसंघात कायम उपलब्ध असणारा, रस्त्यावर उतरून काम करणारा आणि नागरिकांशी संपर्क असलेला आमदार मिळावा, यासाठी हा लढा असून यामध्ये कोथरूडकर जनता मला विजयी करेल, असा विश्वास बालवडकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>>Palghar Vidhan Sabha Constituency : पालघरमध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार भाजपमधून आयात

कोथरूडमध्ये होणार ‘ चौरंगी ‘ लढत

कोथरूडमध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी नगरसेवक बालवडकर यांच्या घरी जाऊन बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न केला होता. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, आता अमोल बालवडकर यांनी कोथरुडमधून लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बालवडकर यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. कोथरुडमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.