सध्या राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड. मिझोरम या राज्यांत विधानसभेची निवडणूक होत आहे. वरील पाच राज्यांत निवडणुकीचे वातावरण असले तरी चर्चा मात्र कर्नाटकमधील राजकारणाची होत आहे. कारण जेडीएस पक्षाचे अध्यक्ष एच डी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर सिद्धरामय्या यांनीदेखील कुमास्वामी यांनी केलेल्या आरोपांत तथ्य आढळल्यास मी राजकारण सोडून देईल, असे जाहीर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धरामय्या काय म्हणाले?

गेल्या अनेक दिवसांपासून कुमारस्वामी हे सिद्धरामय्या यांच्यावर ‘कॅश फॉर ट्रान्सफर’ म्हणजेच शासकीय अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करत आहेत. तर हे आरोप सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन. कुमारस्वामी यांच्याच काळात अशा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे, असा दावा सिद्धरामय्या यांनी केला आहे. “कुमारस्वामी हे त्यांनीच बदल्यांसाठी घेतलेल्या पैशांबद्दल बोलत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात हे पैसे घेतलेले आहेत. मी याआधीच सांगितलेले आहे की एकाही बदली प्रकरणात पैसे घेतल्याचे सिद्ध झाल्यास मी राजकारणातून निवृत्त होईल, कुमारस्वामी यांनी माझ्यावर आरोप करणारे ट्विट्स शंभर वेळा करू द्यात. मी त्याला उत्तर देणार नाही,” असे सिद्धरामय्या म्हणाले.

आरोप करताना व्हायरल ऑडिओ क्लीपचा आधार

कुमारस्वामी यांनी सिद्धरामय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना एका ऑडिओ क्लीपचा आधार घेतला. या ट्विट्समध्ये त्यांनी सिद्धरामय्या आणि सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र यांच्यावर टीका केली आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये संवाद साधत असलेल्या दोन व्यक्ती या सिद्धरामय्या आणि यतिंद्र असल्याचा दावा त्यांनी केला. या दोन व्यक्तींच्या संभाषणात एका शासकीय अधिकाऱ्याचा उल्लेख केला जात आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांच्या यादीत या अधिकाऱ्याचेही नाव असल्याचा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. तसेच यतिंद्र हे सुपर सीएम प्रमाणे काम करत असून सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही कुमारस्वामी यांनी केली.

सिद्धरामय्या यांनी सर्व आरोप फेटाळले

सिद्धरामय्या यांनी मात्र कुमारस्वामी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. कुमारस्वामी यांनी काय आरोप करायचे आहेत, ते करावेत. मी त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumaraswamy allegations of cash for transfer siddaramaiah said will retire from politics of allegations proved prd