नाशिक – हिंदू धर्मियांच्या प्रमुख उत्सवापैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी कुंभनगरीत सुरू झाली असून या नियोजनावर आपला प्रभाव राखण्यासाठी नाशिकच्या पालकमंत्रिपदाला कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे. मागील सिंहस्थात सुमारे अडीच हजार कोटींची कामे झाली होती. यंदा कुंभमेळ्याचा आराखडा १० हजार कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. मंत्रिमंडळ विस्तारात त्यामुळेच पालकमंत्रीपदावरून शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना वगळणे आणि स्थानिक भाजपमधून पाचपैकी एकासही मंत्रिपद न मिळणे याचा संबंध पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेशी जोडला जातो. राष्ट्रवादीने (अजित पवार) ॲड. माणिक कोकाटे आणि नरहरी झिरवळ या नव्या चेहऱ्यांना तर, शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले. भुसे हे गतवेळी नाशिकचे पालकमंत्री होते. यावेळी भाजपकडून स्थानिक पातळीवर कुणीही मंत्री नाही. मागील कुंभमेळ्यात हीच स्थिती होती. तेव्हा नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली होती. कुंभमेळामंत्री म्हणून त्यांनी एकहाती शिवधनुष्य पेलले होते. आगामी कुंभमेळ्याची जबाबदारी महाजन यांच्याकडे सोपविण्यावर याआधीच एकमत झाले आहे. महायुतीच्या मागील सरकारने कुंभमेळा नियोजनासाठी स्थापलेल्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्षपद तत्कालीन ग्रामविकास व पर्यटनमंत्री महाजन यांच्याकडे सोपविले होते. तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे समितीत सहअध्यक्ष होते.
हेही वाचा – स्थानिक राजकारणाची दिशा बदलणार, राज्यातील बदलत्या समीकरणाचे प्रतिबिंब
नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप बाकी असले तरी २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थाची जबाबदारी महाजन यांच्याकडे असणार आहे. स्थानिक पातळीवर पालकमंत्रीपदासाठी कोणीही स्पर्धक असू नये, यादृष्टीने डावपेच रचले गेले. या पदासाठी आग्रही राहिलेल्या छगन भुजबळ यांचा विषय निकाली निघाला. स्थानिक भाजपमधील कुणाचाही मंत्रिपदी विचार न होण्यामागे तेच कारण असल्याचे पक्षाची मंडळी सांगतात. जिल्ह्यात १५ पैकी दोन जागा मिळवणाऱ्या शिंदे गटाचा आवाज यावेळी क्षीण आहे. अजित पवार गटाचे झिरवळ आणि ॲड. कोकाटे हे तुलनेत नवखे आहेत. अशा स्थितीत भाजपने पालकमंत्रिपद आपल्याकडे घेऊन गोदाकाठावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन, अंमलबजावणी, भाविक व साधू-महंतांचे आदरातिथ्य अशा सर्वांवर आपला प्रभाव ठेवण्याची तयारी केली आहे. कुंभमेळा व पालकमंत्री ही दोन्ही पदे एकाकडे ठेवून मित्रपक्षांचा हस्तक्षेप टाळण्याचे नियोजन झाल्याचे भाजपच्या वर्तुळातून सांगितले जाते.