मागील एक आठवड्यापासून स्टॅण्डअप कॉमोडियन कुणाल कामरा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विनोदामुळे खूपच चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केल्यामुळे शिवसैनिकांनी कामराचा शो झालेल्या स्टुडिओची तोडफोडही केली होती. या प्रकरणावरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत, तसेच सार्वजनिक ठिकाणी सहनशीलता राखणं आणि पीडितांनी त्यांच्या तक्रारी कशा सोडवाव्यात याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गेल्या काही दशकांमध्ये पंतप्रधानांसह अनेक बड्या राजकारण्यांना टीकेला सामोरं जावं लागलं आहे. राजकारणी असो वा सामान्य माणूस टीका कुणालाही आवडत नाही. मात्र, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये ‘टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे’, असे म्हटले होते.
आतापर्यंतच्या सर्व भारतीय पंतप्रधानांपैकी जवाहरलाल नेहरू हे त्यांच्यावरील टीकेला खूपच सहनशीलतेने सामोरे गेले होते. अरुण असफ अली यांनी याबाबत सांगितलं होतं की, एका खासदारानं पंडित नेहरूंवर हुकूमशहा असल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना नेहरूंनी म्हटलं होतं, “मी हुकूमशहा आहे, असं वाटत नाही. पण जर मी असतो, तर खूप वाईट हुकूमशहा असतो.” एखादा खासदार जर उघडपणे तुमच्यावर असा आरोप करीत असेल, तर आपण हुकूमशहा नाहीच किंवा मग खूप वाईट आहे, असं सिद्ध करायला हवं, असा नेहरूंचा यामागचा उद्देश होता.
१९६२ मध्ये भारत-चीन युद्धादरम्यान व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी नेहरूंचं एक व्यंगचित्र प्रकाशित केलं होतं. त्यावर नेहरूंनी लक्ष्मण यांना फोन करून, “तुम्ही काढलेले व्यंगचित्र मला खूप आवडलं, ते फ्रेम करण्यासाठी मला स्वाक्षरी केलेली त्याची मोठी प्रत मिळू शकेल का?” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. इंदिरा गांधी यांचं नेतृत्वदेखील पंतप्रधान म्हणून शक्तिशाली होतं. त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारनं अमेरिकेच्या सीआयएची भूमिका मांडली होती. त्या काळी सरकारला कायम धारेवर धरणारे स्वतंत्र पक्षाचे खासदार पिलू मोदी यांनी गळ्यात एक फलक घालून संसदेत प्रवेश केला होता. “मी एक सीआयए एजंट आहे”, असं त्यावर लिहिलेलं होतं. त्यावर पंतप्रधानांनी काहीच वक्तव्य न करता, त्या फक्त हसल्या होत्या.
एकदा राजीव गांधी यांनी कम्युनिस्ट लोकांवर टीका केली होती. “कार्ल मार्क्सचे शिष्य असल्याचा दावा केला जात असला तरी ते गेल्या शतकातल्या अमेरिकन विनोदी कलाकार ग्रुशो मार्क्सच्या अनुयायांसारखेच वागले होते.” कम्युनिस्ट लोकांना ते अजिबात आवडले नव्हते; पण गांधींची ही टीका त्यांनी त्यांच्या पद्धतीने स्वीकारली होती.
अटलबिहारी वाजपेयीसुद्धा अनेकदा हसत हसत टीकेला सामोरे गेले. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात जेव्हा ते परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहत होते, तेव्हा जनसंघाच्या एका खासदाराने त्यांच्यावर दुटप्पी वर्तनाचा आरोप केला होता. “कैसे तिरंदाज हो की चिलमन से लागे बैठे हो, छुपते भी नहीं, सामने आते भी नहीं” (तुम्ही कसे धनुर्धारी आहात की पडद्यापाशीच बसले आहात; पण तुम्ही लपतही नाही किंवा समोरही येत नाही), अशी टीका त्या खासदारांनी केली होती. त्या काळातील पत्रकारांनी हा किस्सा सांगितला होता. ही टीका वाजपेयींना खुपली होती तरीही त्यांनी त्यावर शांतपणे प्रतिक्रिया देण्याचे ठरवले होते.
राजकारणी काही वेळा स्वत:ला खूप गांभीर्यानं घेतात, असा समज आहे. पी. व्ही. नरसिंह राव आणि विश्वनाथ प्रताप सिंह या दोघांनीही स्वत:वरही टीका करता येते हे दाखवून दिले होते. सरकारी नोकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाबाबत मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून उपराष्ट्रपतींनी मोठं ध्येय गाठलं आहे, अशी टीका करण्यात आली होती. तेव्हा नरसिंह राव यांनी, “गोल कर दिया, पर टांग टूट गई” (मी ध्येय गाठलं; पण माझा पाय तुटला) अशी प्रतिक्रिया दिली होती. या निर्णयानंतर राव यांचं सरकार पडलं होतं.
डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर काही दिवसांनी राव यांनी त्यांच्या भाषणातील पूर्णविराम आणि स्वल्पविरामांबाबत काळजी करू नका, असं काही टीकाकारांनी म्हटलं होतं. त्यावर तत्कालीन पंतप्रधान, “क्या करूं, सारी उमर क्लर्क ही तो रहा हूं” (काय करू, आयुष्यभर क्लार्कच होतो), अशी प्रतिक्रिया दिली होती.
सात वर्षांहून अधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री असलेले आणि अनेकदा टीका सहन केलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव हेदेखील त्यांच्या विनोदबुद्धीसाठी ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी ते एका कार्यक्रमात सर्वांत पुढच्या रांगेत बसून हसत होते. तेव्हा मंचावर असलेल्या एका विनोदी कलाकाराने त्यांची हुबेहूब नक्कल केली होती. लोकसभा अध्यक्षांनी आयोजित केलेल्या वार्षिक कार्यक्रमात वाजपेयींची नक्कल करणं, त्यांचे बोलतानाचे हावभाव, त्यांची विधानं अशी नक्कल करणं राजकीय कार्यक्रमांमध्ये होत असे. राजकीय विरोधकांमध्येही एकमेकांवर टीका होत असली तरी त्यांच्यात मैत्रीदेखील असायची, असं त्या काळातील लोक सांगतात.
राजकारणात विनोद महत्त्वाचा आहे का?
राजकीय मतभेदांमुळे निर्माण झालेला रोष कमी करण्याचा विनोद हा एक मार्ग आहे. राजकारणातील विनोदाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वॉशिंग्टन, डीसी इथे दरवर्षी व्हाईट हाऊस प्रतिनिधींच्या रात्रीच्या जेवणावेळी एका स्टॅण्डअप कॉमोडियनचा शो होत असे. त्यावेळी तो कॉमेडियन पंतप्रधानांवर खूप हास्यविनोद करीत आणि मग पंतप्रधान उपस्थित पत्रकारांवरही टीका करत. पण, हे सर्व हास्यविनोदापुरतंच मर्यादित राहत असे. भारतात नेहरूंपासून वाजपेयींपर्यंत विनोद कसा स्वीकारायचा हे त्यांनी दाखवून दिलं होतं. प्रतिसाद कसाही असो एफआयआर, मानहानीचे खटले व तोडफोड हे साधारणपणे होत नसत. पण या नेत्यांना माहीत होतं की, टीकेची कडू गोळी गिळणं हा सार्वजनिक आयुष्याचा अविभाज्य घटक आहे.
आजच्या काळात सोशल मीडियाचं स्वरूप आणि पोहोच बघता, राजकीय नेत्यांना आणखी कठोर परिस्थितींना सामोरं जावं लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधींइतका अपमान किंवा टीका त्या काळातील कोणत्याही पंतप्रधान किंवा नेत्याला सहन करावी लागली नव्हती. दुसरीकडे हेही तितकंच खरं आहे की राजकारणी किंवा वेगवेगळ्या पक्षांचे नेतेही टीकेबाबत अधिक असह्य किंवा असहिष्णु झाले आहेत.
विनोद हे नक्कीच संवादाचे एक विनाशकारी माध्यम असू शकते. कोणतीही टीका ही कुणालाही दुखावतेच हेही खरं आहे. एकनाथ शिंदेदेखील कामरा याला प्रतिसाद देण्यासाठी एफआयआरऐवजी दुसरा एखादा विनोदी कलाकार निवडून कामराला प्रतिउत्तर देऊ शकले असते. दुसऱ्या बाजूनं त्याला पक्षपाती असल्याचं बोललं जात असलं तरी जिथपर्यंत खरं बोलण्याचा प्रश्न आहे, तो कामराचा हक्क आहेच. मात्र, भारतासारख्या कठोर आणि आत्मविश्वासू लोकशाहीत विनोदी टीका आणि नक्कल करण्याला स्थान असलं पाहिजे अशी आशा बाळगली जाते.