प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कवितेतून टीका केल्याने शिंदे गटातील शिवसैनिक आक्रमक झाले. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी कुणालचा शो पार पडलेल्या हॉटेलमध्ये तोडफोड केली. सध्या सुरू असलेल्या या प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण आणि सामाजिक स्तरावरील हास्यविनोद यांच्यातले गुंतागुंतीचे आणि तणावपूर्ण संबंध पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले आहेत.
दरम्यान, अशा प्रकारचा वाद ओढवून घेणारा कुणाल हा काही पहिला कॉमेडियन नाही. राजकारण आणि समाजातील विनोदबुद्धी यांच्यातील संबंध हा पूर्वीपासूनच राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रातल्या कॉमेडियननी अनेकदा राजकीय वातावरणावर टीका करण्यात आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी केलेल्या विनोदांमुळे अनेकदा त्यांना टीकेला सामोरं जावं लागतं.
आचार्य अत्रेंची विधानं आणि व्यंगचित्र
राजकीय नाराजी ओढवणाऱ्या विनोदी व्यक्तींपैकी एक म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे होते, जे स्वत: एक पत्रकार व राजकारणी होते. अत्रेंनी केलेली जहाल स्वरूपाची विधानं आणि व्यंगचित्रांमुळे त्यांना अनेकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रोष पत्करावा लागला होता.
अत्रे यांनी अनेकदा त्यांच्या मराठा या वृत्तपत्रातील लेखन आणि त्यांच्या भाषणांमधून विविध राजकीय नेत्यांवर टीका करण्यासाठी विनोदाचा वापर केला. अत्रेंच्या सर्वात प्रसिद्ध व्यंगचित्रांपैकी एक हे तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्यासदर्भात होते. गिरी यांना १४ मुलं होती. गिरी यांचा त्यांच्या कुटुंबासोबतचा फोटो ‘मराठा’ वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. ‘गिरी यांची कामगिरी’ अशा शीर्षकानं हा लेख प्रकाशित झाला होता. हा विनोद काम या शब्दाभोवती होता. म्हणजे काम या शब्दाचा दुहेरी अर्थ असा की, काम आणि लैंगिक इच्छा. तर ‘गिरी’ हे राष्ट्रपतींचं आडनाव आणि त्यांच्या कामगिरीचा संदर्भ.
अत्रेंचे सर्वांत महत्त्वाचं शाब्दिक द्वंद्व हे ठाकरे यांच्याशीच होतं. अत्रेंनी कायम शिवसेनेची प्रादेशिक विचारसरणी आणि स्थानिकवादी भूमिकेवर टीका करण्यासाठी व्यंगचित्राचा वापर केला. ते पक्षाच्या स्थलांतरविरोधी वक्तव्यांवर आणि त्यांच्या आक्रमक राजकीय डावपेचांवर टीका करत. अत्रेंनी त्यांच्या लेखनातून शिवसेनेच्या मराठी अभिमानाच्या दृष्टिकोनाला कायम आव्हान दिले होते आणि त्यातूनच त्यांनी राजकारणातल्या ध्रुवीकरणावर प्रकाश टाकला.
स्वत: व्यंगचित्रकार असलेल्या ठाकरेंशी वाद झाल्यामुळे अत्रेंवर पलटवार होणं साहजिकच होतं. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘मार्मिक’मध्ये अत्रेंना डुक्कर असल्याचं दाखवण्यात आलं होतं. ठाकरेंनी त्यांना ‘वरळीचा डुक्कर’, असं संबोधलं होतं. अत्रेंच्या तीव्र टीकेमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून अनेकदा त्यांच्यावर हिंसक हल्ले झाले होते. मात्र, ठाकरे आणि अत्रे यांच्यात मोठे मतभेद असतानाही शिवसेनेने वरळी येथे अत्रेंचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्यांचा सन्मान केला.
१९५० च्या उत्तरार्धातही अत्रेंचं बुद्धिचातुर्य दिसून आलं ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान. “मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” यामधील ‘च’कशाला हवा यावरून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आक्षेप नोंदवला होतं. त्यावर “तुम्ही तुमच्या आडनावातून ‘च’ हे अक्षर काढून काय उरतं ते पाहा… फक्त ‘वहाण’ म्हणजे ‘पादत्राणे’, अशी प्रतिक्रिया अत्रेंनी दिली होती. हे व्यंगचित्र खूप प्रसिद्ध झालं होतं.
शिवसेनेवर टीका करणारे आणखी एक विनोदी लेखक
महाराष्ट्रातील राजकारण्यांचा रोष ओढवून घेणारे आणखी एक मराठी विनोदी लेखक म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. मराठी साहित्य आणि विनोद क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या पुलंनी राजकीय हिंसाचारावर स्पष्टपणे टीका केली होती. तेव्हा त्यांचे शिवसेनेशी खूप मतभेद झाले होते. १९९५ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना पुलंनी राज्यातल्या राजकारणात वाढत्या गुंडगिरीबाबत टीका केली होती. सत्ता काबीज करण्यासाठी गुंडगिरीचा धाक दाखवणाऱ्या पक्षांचा त्यांनी निक्षून विरोध केला होता. पुलंच्या या विधानावरून “पुलंना पुरस्कार देणं हा आपला मूर्खपणा होता” असं ठाकरेंनी म्हटलं होतं. ठाकरे यांनी तेव्हा पुलंबाबत म्हटले, “जुने पूल कोसळत आहेत; पण नवीन पूल उभे राहिले पाहिजेत”. पुलंच्या नावावरून त्यांनी ही टीका केली होती. दरम्यान, त्यानंतर या दोघांनीही आपापसांतले मतभेद मिटवले होते.
२००३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचीही खिल्ली उडवण्यात आली होती. ‘घडलंय बिघडलंय’ या कार्यक्रमात ‘आर्म स्ट्राँग’ या पात्राच्या नावावरून भुजबळांबाबत विडंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर भुजबळसमर्थकांनी त्या चॅनेलच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. अखेर या वादाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता.
महाराष्ट्रात विनोद आणि राजकीय संघर्ष यांचं नवीन उदाहरण म्हणजे कुणाल कामरा. दरम्यान, विनोदवीर आणि राजकारण्यांमधले जुने वाद जरी संपुष्टात आले असले तरी कामरा वाद सध्या महाराष्ट्रात उफाळला आहे.