Ladki Bahin Yojana Update Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षी राज्यातील महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला. महायुतीने राज्यात प्रचंड बहुमताने विजय मिळवला. सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेसाठी काही मोजक्या दस्तावेजांसह ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. त्यातील बहुसंख्य महिलांना योजनेचा लाभ दिला जात होता. मात्र, आता केवळ गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
सध्या महाराष्ट्रातील २ कोटी ८० लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे, अलीकडेच सरकारने या योजनेतील पाच लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. तत्पूर्ही हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. ज्या महिलांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती उत्तम आहे आणि त्या जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावेत, असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं होतं. त्यानंतर हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तसेच ज्या महिलांनी निकषांची पूर्तता केली नसेल त्यांचे अर्ज बाद ठरवले जात आहेत.
योजनेचा लाभ केवळ गरजू महिलांनाच!
दरम्यान, आता केवळ गरजू महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ समाजातील गरीब घटकांतील महिलांसाठी आहे. या योजनेचा काही अपात्र महिलांनीही लाभ घेतला. त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र, गरजू महिलांनाच लाभ देण्यासाठी योजनेत सुधारणा करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी सोमवारी दिली.
योजनेच्या अटी कठोर करणार?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र, ही योजना गरीब महिलांसाठीच असल्याने त्यात दुरुस्ती करणार असल्याचे सांगत अजित पवार यांनी या योजनेच्या अटी कठोर करण्याचे संकेत दिले.
अजित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या कोणत्याही योजना बंद झालेल्या नाहीत. कोणत्याही सरकारच्या काळात सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असते. ज्या योजना कालबाह्य ठरतात, त्या बंद कराव्या लागतात. करोना काळात आपण काही योजना, सवलती सुरू केल्या होत्या. मात्र, करोना संपल्यावर, लॉकडाऊन उठवल्यानंतर आपल्याला त्या योजना बंद कराव्या लागल्या. योजनेची द्विरुक्ती नको आणि राज्याचा खर्च वाचावा म्हणून अशा योजना बंद करण्यात काहीही गैर नाही.”
नव्या अटी लागू करणार?
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याऱ्या सरसकट सर्वच महिलांच्या अर्जांची छाननी होणार नसल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं. मात्र, आता अजित पवारांच्या घोषणेनंतर स्पष्ट झालं आहे की केवळ गरजू महिलांना लाभ द्यायचा असेल तर सर्व अर्जांची पडताळणी होईल. सर्व निकष पूर्ण केले आहेत की नाही याची तपासणी केली जाईल. तसेच, काही नवे नियम, अटी, शर्थी लागू करणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अर्जांची पडताळणी होण्याची शक्यता
निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करत असताना काही माफक अटींसह २१ वर्षे ते ६५ वर्षांपर्यंत वय असलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जात होता. निवडणूक जिंकल्यानंतर महायुती सरकारने ज्या महिलांविरोधात तक्रार प्राप्त होईल त्या महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू केली. मात्र आता सरसकट सर्वच अर्जांची पडताळणी होऊ शकते.
२,१०० रुपयांसाठी प्रतीक्षा करावी लागणार
निवडणुकीआधी महायुती सरकारने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं की राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम १,५०० रुपयांवरून वाढवून २,१०० रुपये करू. मात्र, याबाबत अद्याप सरकारमधील कोणत्याही नेत्याने अवाक्षर काढलेलं नाही. उलट मूळ लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यावर भर दिला जात आहे. विधानसभेत अजित पवार यांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेच्या अनुदानात लगेचच २,१०० रुपयांपर्यंत वाढ केली जाणार नाही.
© IE Online Media Services (P) Ltd