बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय दनता दलचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला गेले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ते राजधानी दिल्लीत परतले आहेत. राजदचे अध्यक्ष बरेच दिवस आजारी होते. सिंगापूरमध्ये उपचार घेतल्यानंतर ते शनिवारी दिल्लीत पोहोचले. त्यांची ज्येष्ठ कन्या खासदार मीसा भारती त्यांना घरी नेण्यासाठी विमानतळावर गेल्या होत्या. त्या राज्यसभा खासदार आहेत. राजदमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते काही दिवस त्यांच्या मुलीच्या घरीच राहतील.
लालू प्रसाद यादव यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य यांनी काल ट्विट करून सांगितलं की, उपचारांनंतर लालू प्रसाद यादव भारतात परतणार आहेत. रोहिणी यांनी ट्विट केलं होतं की, ही तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपले नेते आदरणीय लालूजींच्या प्रकृतीबाबत माहिती द्यायची आहे. बाबा ११ फेब्रुवारीला सिंगापूरहून भारतात येणार आहेत. मुलगी म्हणून मी माझे कर्तव्य बजावत आहे. माझ्या वडिलांना बरं करून त्यांना मी तुमच्या सर्वांमध्ये पाठवत आहे. आता तुम्ही सर्वजण बाबांची काळजी घ्या.
हे ही वाचा >> Viral : टक्कल असल्याने नोकरीवरून काढलं, पण ७० लाख जिंकले भावानं, त्या कर्मचाऱ्याची व्हायरल स्टोरी एकदा वाचाच
अवयव दान हेच महादान : रोहिणी आचार्य
गेल्या वर्षी, ५ डिसेंबर २०२२ रोजी सिंगापूरमध्ये लालू प्रसाद यादव यांची किडनी प्रत्यारोपण करण्यात आली. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनीच आपल्या वडिलांना किडनी दान दिली. लालू यांना एकूण ७ मुली आणि २ मुलं आहेत. लालू यादव यांना किडनी दिल्यानंतर एनडीटीव्हीशी बोलताना रोहिणी म्हणाल्या की, मी ठरवलं आहे की, “माझ्या मृत्यूनंतर माझे अवयव दान दिले जावे. अवयव दान हे महादान आहे. तुम्ही तुमच्या मृत्यूनंतरही लोकांना जीनवदान देऊ शकता.”