बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांच्या एका व्हायरल व्हिडीओवरून विरोधकांच्या कचाट्यात सापडले आहेत. पटनामधील एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना नितीश कुमार हसताना, बोलताना दिसत आहेत. नितीश कुमार यांचा हा व्हिडीओ हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
नेमकं काय घडलं?
पटना येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुलात सेपक टकरा विश्व चषकाच्या उद्घाटनाप्रसंगी नितीश कुमार इतर मान्यवरांसोबत व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रगीताला सुरुवात झाल्यावर त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या आयएएस अधिकारी आणि प्रधान सचिव दीपक कुमार यांच्याशी नितीश कुमार हसताना आणि बोलताना कॅमेऱ्यात कैद झाले.
या व्हिडीओमध्ये नितीश कुमार अधिकार्यांच्या खांद्यावर थाप मारत त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एका क्षणी सर्वच जण हसत होते आणि त्यानंतर नितीश यांनी समोर असलेल्या एका व्यक्तीला नमस्कारही केला. महत्त्वाचं म्हणजे दीपक कुमार यांनी मुख्यमंत्र्यांचा हात ओढत त्यांना शांत राहण्यास सांगताना दिसत आहेत. याआधीही राष्ट्रगीताची घोषणा केली असतानाही नितीश कुमार व्यासपीठावरून खाली उतरले आणि इतरांशी हस्तांदोलन करू लागले.
नितीश कुमारांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच विरोधकांनी वेळ न दवडता नितीश यांच्यावर टीकेची झोड सुरू केली.
“कमीतकमी राष्ट्रगीताचा तरी अपमान करू नका. माननीय मुख्यमंत्री, तुम्ही दररोज तरुण, विद्यार्थी, महिला आणि वृद्धांचा अपमान करता. कधी तुम्ही महात्मा गांधींच्या हौतात्म्याची थट्टा करता तर कधी राष्ट्रगीतावर टाळ्या वाजवता”, अशी टीका तेजस्वी यादव यांनी एक्सवरील पोस्टमार्फत केली आहे.
“मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो की, तुम्ही एका मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही राष्ट्रगीतासाठी अवघे काही सेकंदही स्थिर उभे राहू शकत नाही का? आणि राष्ट्रगीतावेळी असं वागणारा माणूस मुख्यमंत्रिपदी असणं ही चिंतेती बाब आहे. बिहारचा असा वारंवार अपमान करू नका”, असेही यादव यांनी पुढे म्हटले.
तेजस्वी यादव यांचे वडील लालू प्रसाद यादव यांनीही नितीश कुमार यांच्यावर आगपाखड केली. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “भारत राष्ट्रगीताचा अपमान अजिबात सहन करणार नाही. बिहारवासियांनो, आता आणखी काही उरलं आहे का?”
या प्रकरणावर नितीश कुमार आणि त्यांच्या पक्षाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावरून विधानसभेत संभाव्य वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री आज बिनशर्त माफी मागू शकतात, असा अंदाज नितीश यांच्या जनता दल युनायटेडमधल्या काही सूत्रांनी वर्तविला आहे.
नितीश कुमार यांच्या वागण्यावर पांघरूण घालत “बिहारसह देशाचा अपमान करणारे लोक बिहारच्या माननीय मुख्यमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत”, असे केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. याबाबत आणखी बोलताना ते म्हणाले, “लालूजी आणि कंपनीने बिहारला अपमानित केलं आहे, पण नितीश यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बिहारला आदर प्राप्त करून दिला. एकीकडे लालूजींच्या कारकिर्दीतल्या आठवणींनी बिहारचे लोक घाबरतात, दुसरीकडे नितीश कुमार कालही बिहारचे आवडते होते, आजही आहेत आणि भविष्यातही असतील. नितीश कुमार हे बिहारचे सन्मान आहेत.”
अशा गंभीर प्रसंगी असं वागण्याची मुख्यमंत्र्यांची ही काही पहिली वेळ नाही. ३० जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिल्यानंतर नितीश कुमार टाळ्या वाजवताना दिसले होते.