बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी तसेच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. हाच मुद्दा घेऊन भाजपाने यादव परिवारावर सडकून टीका केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ‘रिव्हर्स रॉबिनहूड’ची पद्धत अवलंबली आहे, अशी टीका भाजपाचे नेते शाहबाझ पुनावाला यांनी केली आहे.
“ही रिव्हर्स रॉबिनहूडची रणनीती”
नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप तेजस्वी कुटुंबीयांवर करण्यात आलेला आहे. हा आरोप खूप वर्षांपासून केला जातो. या प्रकरणाची तपास संस्थांकडून चौकशीही केली जात आहे. साधारण ६०० कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा दावा केला जातो. याच आरोपांचा आधार घेत शेहबाझ यांनी “ही रिव्हर्स रॉबिनहूडची रणनीती आहे. रॉबिनहूड श्रीमंतांना लुटून ती संपत्ती गरिबांना वाटायचा. मात्र मात्र यादव कुटुंबीय हे गरिबांना लुटत आहेत. त्यांनी गरिबांना लुटले. त्यांच्याकडून जमिनी घेतल्या. ६०० कोटी रुपयांचा घोटाळा केला,” असा आरोप केला.
गुन्हेगारी कट, फसवणूक, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ या कथित घोटाळ्यात सीबीआयने विशेष न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांचे नाव घेण्यात आले आहे. तेजस्वी यादव, लालूप्रसाद यादव, राबडी देवी यांच्याव्यतिरिक्त यामध्ये एकूण १४ जणांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आरोपींवर भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हेगारी कट, फसवणूक तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपपत्रात तेजस्वी यादव यांचे नाव
मागील काही दिवसांपासून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नांत तेजस्वी यादव मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. विरोधकांच्या ऐक्यासाठीचा पहिला प्रयत्न म्हणून २३ जून रोजी पटणा येथे एक बैठकही पार पडली आहे. असे असतानाच तेजस्वी यादव यांचे आरोपपत्रात नाव आलेले आहे.
सीबीआयने आरोपपत्रात तेजस्वी यादव यांचे नाव नमूद केल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. तेजस्वी यादव यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे.
‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ घोटाळा काय आहे?
२००४ ते २००९ या काळात लालूप्रसाद यावद केंद्रीय रेल्वेमंत्री होते. या काळात दक्षिण मध्य रेल्वे विभागातील जबलपूर येथे ग्रुप डी वर्गातील पदभरतीदरम्यान घोटाळा झाल्याचा दावा केला जातो. नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्यात आल्याचे म्हटले जाते. या प्रकरणी १८ मे २०२२ रोजी सीबीआयने लालूप्रसाद यादव यांच्यासह अन्य १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी, दोन मुली तसेच अन्य काही लोकांचा समावेश होता.
रेल्वेच्या अन्य विभागांमध्येही अशाच प्रकारच्या कथित भरती प्रक्रिया घोटाळ्याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात सीबीआयने मागील वर्षांच्या ऑक्टोबर महिन्यात लालूप्रसाद यादव, राबडी देवी, तसेच इतरांविरोधात पहिल्यांदा आरोपपत्र दाखल केले होते.