लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर रावसाहेब दानवे आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वाद वाढत आहेत. सिल्लोड तालुक्यातील निल्लोड गावातील एका स्वातंत्र्य सैनिकाची जमीन मंत्री सत्तार यांनी बळकावली आहे. मुख्यमंत्र्यांचा चेहरा वापरुन सरकारी योजनांची सिल्लोड मतदारसंघात लूट सुरू आहे. त्याची राज्य सरकारने चौकशी करायला हवी अशी मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केली आहे. त्यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमात दाखविण्यात आलेले काळे झेंडे हा एक निषेधाचा कार्यक्रम होता. या पुढे त्याची तीव्रता वाढेल, असे दानवे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत सिल्लोड मतदारसंघातील सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांच्याऐवजी काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना मदत केली. जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनीही ही बाब मान्य केली. जिल्हा वार्षिक आराखड्याच्या बैठकीनंतर सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत केली होती. पण त्यांना अशी मदत करायला कोणी सांगितले हे आपणास माहीत नाही, असे ते म्हणाले.
जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ‘मराठा’ नेतृत्त्वच संपवायचे असल्याचे सत्तार नेहमी सांगत असतात, असेही रावसाहेब दानवे म्हणाले. या वक्तव्यास संभाजीनगरचे पालकमंत्री सत्तार यांनी उत्तर दिले असून, “मी नेहमी मराठा नेत्यांच्या मागण्यांबरोबर उभा ठाकतो. विरोधक जीवंत असावेत, असे मानणारा मी कार्यकर्ता आहे.” असे उत्तर दिले. अल्पसंख्याक मंत्री सत्तार यांनी बेकायदा जमिनी बळकावल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शुक्रवारी लाडकी बहिण कार्यक्रमात आंदोलन केले होते. ‘निल्लोड’ येथील स्वातंत्र्य सैनिकांची जमीन बळकावल्याची सर्व कागदपत्रे आपल्या जवळ असल्याचे दानवे म्हणाले. नव्या आरोपामुळे सत्तार विरुद्ध दानवे असा वाद राजकीय पटलावर दिसून येत आहे.