गणेश यादव
पिंपरी : साधनसुचिता, पक्ष संघटनेचा नारा देणाऱ्या पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये मोठी गटबाजी उफाळली आहे. आमदार आणि पक्ष संघटना एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे दिसते. हा सुप्त संघर्ष असून, निवडणुका जवळ येताच संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेवर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सत्ता आणली. भाजप तीनवरून ७७ नगरसेवकांवर गेला. जगताप यांची तगडी यंत्रणा तर लांडगे यांचा करिष्मा आहे. दोघेही स्वतःच्या ताकदीवर निवडून येतात. कमळ चिन्हाचा थोडा फायदा होतो. लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी राजकारणात आल्या. त्यांचा उमेदवारी मिळविताना दीर शंकर यांच्याशीच संघर्ष झाला होता. जगताप दीर भावजयमध्ये सुप्त राजकीय संघर्ष असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. शंकर जगताप यांच्या शहराध्यक्षपदाच्या नियुक्तीला झालेला विरोध, आमदार लांडगे यांच्या समर्थकांना डावलणे, कार्यकारिणीत आपल्या जवळच्या लोकांना मानाचे पान दिल्यानंतर पक्षातील गटबाजी वाढण्यास सुरुवात झाली. शहराध्यक्षपद गेल्यापासून आमदार लांडगे, त्यांचे समर्थक संघटना आणि वादापासून फटकून आहेत. त्यांनी शिरूरवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते.
आणखी वाचा-नागपूर काँग्रेसमधील गटबाजी कधी संपणार? बैठकीतील गोंधळामुळे कार्यकर्ते संतप्त
सुप्त संघर्ष आणि गटबाजी तीन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीरपणे चव्हाट्यावर आली. आमदार अश्विनी जगताप यांना बसण्यासाठीची खूर्ची एका बाजूला ठेवण्यात आली होती. पक्षाच्या कार्यक्रमाला सातत्याने डावलले जात असल्याची नाराजी बोलून दाखवितानाच त्यांनी सरचिटणीसाला खडेबोल सुनावले. ‘मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे. माझ्या नादी लागू नका, मला हलक्यात घेऊ नका, पाठीमागून वार करणे सोडा, पुढे येऊन वार करा’ असे खुले आव्हानच आमदार जगताप यांनी दिले. त्यांनी नथीतून तीर मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून ‘लेकी बोले, सुना लागे’ हे मात्र निश्चित आहे. या गटबाजीची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली. गटबाजीचे राजकारण संपवून टाकण्याचे आदेश दिले.
अश्विनी जगताप आमदार आहेत. त्यांना कोणी डावलू शकत नाही. डावलण्याचा प्रयत्नही कोणी करणार नसल्याचे खडसावून सांगितले. पण, हे सांगत असताना त्यांच्या बाजूला उभे असलेल्या शहराध्यक्षांच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यासारखे होते.यानंतरही वाद मिटण्याची शक्यता कमीच दिसते. ज्या अजित पवारांविरोधात संघर्ष करून शहर ताब्यात घेतले, त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन बसावे लागणार आहे. पालकमंत्रिपदामुळे प्रशासकीय पातळीवर त्यांचेच ऐकावे लागणार असल्याने शहर भाजपमध्ये नाराजी आहे. पवारांची राष्ट्रवादी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घ्यावे लागणार आहे. त्यामुळे निवडणुका जवळ येताच वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात गटबाजी रोखण्यात भाजपच्या प्रदेश नेतृत्वाला यश येते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा-बेरोजगारी, ओबीसी ते आदिवासी! मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या केंद्रस्थानी ‘हे’ प्रमुख मुद्दे
मावळ, शिरूरमध्ये बैठका घेऊन मुख्यमंत्र्यांवर दबाव?
मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. मावळात श्रीरंग बारणे खासदार असून शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव १५ वर्षे खासदार होते. त्यामुळे दोन्ही मतदारसंघ शिंदे गटाला सोडावे लागतील. भाजपने येथे एकदाही निवडणूक लढविली नाही. मित्रपक्षावर दबाव टाकण्यासाठीच बैठका घेऊन आमचीही तयारी असल्याचा संदेश भाजपकडून दिला जात असल्याची चर्चा आहे.