लातूर : बांधकाम मजूर ते बांधकाम व्यावसायिक आणि जिल्हा परिषद सदस्य ते खासदार अशी कामगिरी असणारे खासदार सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी मिळणार की नाही, यावरुन नाहक निर्माण करण्यात आलेल्या चर्चेला उमेदवाराची यादी जाहीर झाल्यानंतर पूर्णविराम मिळाला. श्रृंगारे यांच्याही मनातील चलबिचल दूर झाली. आरक्षित मतदारसंघातील लातूरची जागा यश मिळवून देणारी असल्याचा दावा केला जात आहे. अंतर्गत मतभेद असले तरी काँग्रेसच्या ताकदीवर मात करता येते, असे चित्र असणाऱ्या लातूरमधून श्रृंगारे यांची राजकीय उपद्रव क्षमता कमी असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.
राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या घरात श्रृंगारे त्यांचा जन्म झाला. अतिशय गरीबीत व संघर्षशील जीवन त्यांच्या वाट्याला आले. स्वतःच्या हिमतीवर ,बांधकाम मजुरापासून यशस्वी ठेकेदार म्हणून त्यांनी लौकिक मिळवला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत चाकूर तालुक्यातील वडवळ गटातून त्यांनी निवडणूक लढविली. ते जिल्हा परिषद सदस्य झाले. तेव्हा पासून आपल्या सौम्य स्वभावामुळे त्यांनी अनेकांशी मैत्रभाव जपला. कोणाला दुखावण्याच्या भानगडीत पडायचे नाही, हे त्यांच्या राजकारणाचे सूत्र. त्यांचा वावर पाहता व त्यांचे योगदान पाहता २०१४मध्ये तत्कालीन खासदार सुनील गायकवाड यांचे तिकीट डावलून सुधाकर शृंगारे यांना संधी देण्यात आली. गायकवाड यांच्या पेक्षा देखील अधिक मताधिक्याने विजयी झाले. विजयी झाल्यानंतर त्यांनी एकदाही अंगात जॅकेट घातले नाही. कोणत्याही सामान्य माणसाला आपण उपलब्ध असले पाहिजे ही त्यांची भूमिका राहिली. खासदार निधी हा पक्ष संघटनेने सांगेल त्या विधानसभा मतदारसंघात व सांगेल त्या कामासाठी द्यायचा असा त्यांनी निर्णय केला होता, तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला. त्यामुळे याबाबतीत त्यांच्यावर कोणाची फारशी नाराजी नव्हती.
हेही वाचा : ॲड. प्रकाश आंबेडकरांपुढे खासदार धोत्रे यांच्या पुत्राचे आव्हान
दिव्यांगाच्या बाबतीत त्यांनी मोठे काम केले. १२८८८ दिव्यांगांची नोंदणी करत त्यांना लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले. उपजिल्हा रुग्णालयात प्राणवायू निर्मितीचे केंद्र, व्हेंटिलेटर त्यांनी उपलब्ध करुन दिले. स्वतःच्या खर्चातून गरजू लोकांना अन्नधान्याचे किट वितरित केले. जिल्ह्यात रेल्वे कोच फॅक्टरी चे उद्घाटन नुकतेच झाले आहे. रेल्वेच्या बाबतीत लातूर रेल्वे स्थानकात पीट लाईन, पुण्यासाठी इंटरसिटी एक्सप्रेस लातूर रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण अशा अनेक कामात त्यांनी लक्ष घातले. राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यात दोनशे किलोमीटर आहे त्यासाठी २८०० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला. असे काम असले तरी मोदी लाटेत आपणही खासदार होऊ शकतो, असे मानून अनेकांनी आपले नाव पुढे रेटले होते. कोणतेही छक्के पंजे न करता सरळ भिडणे हा त्यांचा गुणही आणि दोषही. त्यामुळे भाजपमधील अनेकजण चला कुरघोडी करुन बघू, या मानसिकतेत असतात. पण सरळपणामुळे श्रृंगारे यांचे पारडे जड असते. हेच त्यांच्या उमेदवारीचे बलस्थानही ठरले.