लातूर : राज्याच्या राजकारणात काका-पुतण्यांची जोडी अनेक अर्थाने चर्चेत राहिली आहे. ताजे उदाहरण शरद पवार- अजित पवार यांचे असतानाच लातूरमध्ये दिलीपराव देशमुख व धीरज देशमुख ही काका-पुतण्याची जोडी अशीच स्थानिक पातळीवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सावलीखाली दुसरे झाड मोठे होत नाही, असा सर्वसाधारण शब्दप्रयोग केला जातो. शेतीत हे खरेही आहे. मात्र राजकारणात हे खरे नाही. राजकारणात घराणेशाहीची परंपरा मोठी आहे. आजोबा , काका, मुलगा असे अनेकजण राजकारणात राहणारे काही घराणे आहेत.
लातूरचे विलासराव देशमुख गावच्या सरपंचापासून मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यापर्यंत पोहोचले, त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख तीन वेळा विधान परिषदेचे आमदार राहिले, विलासरावांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित देशमुख हे तिसऱ्यांदा लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तर त्यांचे कनिष्ठ चिरंजीव आमदार धीरज देशमुख हे लातूर ग्रामीणचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करत आहेत. अशी या घराण्याची राजकारणाची परंपरा मोठी आहे.
हेही वाचा : राज ठाकरे यांचे प्रस्थ वाढविण्यास सरकारकडून पद्धतशीपणे हातभार
विलासराव देशमुख यांचा वारस म्हणून अमित देशमुख राजकारणात उतरणार हे नक्की होते व त्याला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदा लातूर शहर विधानसभा मतदारसंघात २००९ साली अमित देशमुख तर लातूर ग्रामीण मतदारसंघात वैजनाथ शिंदे हे आमदार झाले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत वैजनाथ शिंदेऐवजी त्रिंबक भिसे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तेव्हाच धीरज देशमुख यांच्या मनात लातूर ग्रामीणमधून निवडणुकीला उभे राहायचे होते. मात्र, पक्षाने संधी दिली नाही.
धीरज देशमुख यांनी युवक काँग्रेसमध्ये आपले चांगले बस्तान बसवले होते. जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र पातळीवरही त्यांनी चांगले काम केले होते. त्यामुळेच आपणही राजकारणात यावे अशी त्यांची इच्छा होती. पुतण्या की कार्यकर्ता असा पेच निर्माण झाल्यानंतर दिलीपराव देशमुख यांनी पुतण्याऐवजी कार्यकर्त्याला पसंती दिली. लातूरच्या राजकारणात ही परंपरा महत्त्वाची आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटाला गेले होते तेव्हा लातूर तालुक्यात एकच जागा शिल्लक होती. त्यावेळी मित्र की पुत्र असा पेच विलासराव देशमुखांच्या समोर पडला होता. मात्र त्यांनी पुत्र अमितऐवजी मित्र बब्रुवान काळे यांना संधी दिली व ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.
हेही वाचा : तुळजापुरात मंदिराच्या विकासावरून भाजप आमदाराच्या विरोधात वातावरण तापले
धीरज देशमुख यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्यापासून केली. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवण्याचे मनोमन ठरवले होते. पहिल्यांदा आपली इच्छा व आपण काम करू शकतो हे त्याने काकाला पटवून दिले व त्यानंतर प्रदेश पातळीवर आपल्या पुतण्यासाठी दिलीपराव देशमुखांनी वजन खर्च केले. धीरज देशमुख यांचे नशीब इतके चांगले की पहिल्यांदाच निवडणुकीत उतरल्यानंतर त्यांच्यासमोर शिवसेनेने इतका कच्चा उमेदवार दिला की त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. राजकारणात कसे काम करायचे हे धीरज देशमुख यांना नवीन नव्हते. वडील, काका व भाऊ या तिघांकडे पाहत त्यांना ती पद्धत माहिती होती. विरोधक नसल्यामुळे त्यांना मोकळे मैदान मिळाले. लातूर ग्रामीण मतदारसंघावर पकड बसवण्यासाठी त्यांनी बैठका सुरू केल्या. ते निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले व त्यांचे ज्येष्ठ बंधू हे लातूरचे पालकमंत्री झाले. त्यामुळे मतदारसंघाला निधी मिळवणे यासाठी कुठली अडचण आली नाही व त्यासाठी फारसा पाठपुरावा करायची गरज पडली नाही. मात्र अडीच वर्षांनंतर सत्ता बदल झाला. पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी जो निधी दिला होता तो निधी मतदारसंघासाठी मिळणे अवघड झाले. त्यातून विकासकामे अडकली.
आमदारकीबरोबरच धीरज देशमुखाकडे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पद चालून आले. काका दिलीपराव देशमुख यांनी या बँकेचा कायापालट केला व तिथे अध्यक्षपद मिळाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून संपर्क करण्याची संधी धीरज देशमुख यांना मिळाली. महिन्यातून किमान दहा-बारा दिवस लातूरमध्ये थांबलेच पाहिजे अशी स्थिती बँकेमुळे निर्माण झाली. बँकेचे कर्ज वाटप, मांजरा परिवाराने उभे केलेले साखर कारखान्याचे जाळे यामुळे आपसूकच मतदारसंघात त्यांचा संपर्क राहिला. दिलीपराव देशमुख यांचा मतदारसंघाबरोबरच संपूर्ण जिल्हाभर पक्षविरहित संपर्क आहे, तो वारसा पुढे धीरज देशमुख यांनी चालवावा यासाठी काका त्यांना धडे देत आहेत.
हेही वाचा : प्रधानमंत्री आवास योजनेत भ्रष्टाचार; पक्क्या घरांसाठी लाभार्थ्यांकडून उकळली जाते ‘लाच’
गेल्या काही वर्षांत राजकारणाची स्थिती बदलली आहे. पूर्वी जसे लोकप्रतिनिधी लोकांशी संपर्क ठेवायचे तसे संपर्क ठेवणारे लोक आता दुर्मिळ झाले आहेत. कामापुरता संपर्क असतो. जिव्हाळा, प्रेम, आपुलकीही कमी झाली आहे. विलासराव देशमुखाप्रमाणे धीरज देशमुख यांचा जिव्हाळा असला पाहिजे असे मतदारांना वाटते. मात्र ती अपेक्षा पूर्ण करण्यात त्यांना सध्या तरी यश आले नाही. ते संपर्क करत असले तरी लोक विलासराव देशमुख यांच्याशी तुलना करून त्यांच्याकडे पाहतात. त्यामुळे अडचणी निर्माण होतात. ग्रामीण भागातल्या समस्यांचा डोंगर मोठा आहे. तो दूर व्हावा यासाठी २४ तास वेळ दिला तरीही तो अपुरा पडतो. त्यामुळे धीरज देशमुख आपल्याला भेटत नाहीत, आमच्याशी संपर्क ठेवत नाहीत, अशी गावोगावच्या सामान्य मतदारांची प्रतिक्रिया आहे. लोकांना आपले काम झाले नाही तरी चालेल. मात्र, आपला आमदार भेटला पाहिजे असे वाटते.
काकांच्या सावलीचा परिणाम होऊन त्यांच्या मार्गदर्शनातून धीरज देशमुखांमध्ये बदल झाला तर त्यांना चांगली संधी आहे. मात्र, विधानसभेत आतापर्यंत त्यांनी आपली वेगळी छाप पाडली नाही किंवा पक्षीय पातळीवरही त्यांना फारशी संधी मिळाली नाही. बंधू अमित देशमुख हे तिसऱ्यांदा आमदार आहेत. त्यामुळे पक्षीय पातळीवरून त्यांच्याकडेच सर्वांची नजर असेल कदाचित. त्यामुळेही धीरज देशमुख सावकाश आणि जपून पावले टाकत असावेत. कारण या मतदारसंघात क्रमांक दोनची मते ‘नोटा’ ला होती. त्यामुळे विरोधक नसणाऱ्या या मतदारसंघात आता भाजपला संधी असल्याचे मानले जाते. उद्धव ठाकरे यांच्याकडून लातूर ग्रामीण मतदारसंघ काँग्रेसला विजयासाठी सोडून दिल्यासारखी स्थिती होती. मुंबईतील शिवसैनिकास लातूर ग्रामीणची उमेदवारी दिली होती. आता या मतदारसंघात काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीला सावध पाऊले टाकावी लागणार आहेत.