श्री. फ. टाके
अहो, ‘प्राध्यापक’ लक्ष्मणराव ढोबळे, तुम्ही मूळचे पुरोगामी. तेव्हा खरे काय ते बोला ना! उगीच भाजप सोडण्याची ‘पावती’ अजित दादांच्या नावाने का फाडता? तुमचा मुलगा व मुलगी दोघेही मोहोळमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना संधी मिळावी म्हणून भाजप सोडतो असे स्पष्ट सांगा की! पूर्वी राष्ट्रवादीत असताना दादा त्रास द्यायचे म्हणून भाजपात गेलो. आता ते भाजपसोबत आले व पुन्हा त्रास सुरू झाला म्हणून पक्ष सोडतो इतकी शब्दांची फिरवाफिरव कशाला करता? दादा सत्तेत आले तरी त्यांच्यामागचा गुंता एवढा वाढलाय की तुम्हाला त्रास द्यायला त्यांच्याकडे सवडच नाही. तुम्ही भाजपात गेले ते जाहीरपणे नितीन गडकरींचे पाय धरून. शिक्षण संस्थांचा पसारा सुरक्षित राहावा म्हणून. राज्यातले सारे पुरोगामी तेव्हा धाय मोकलून रडले, पण तुमच्या डोळ्यांत पाण्याचा टिपूस नव्हता आलेला. तीच तुम्ही पक्के राजकारणी झाल्याची खूण होती.
हेही वाचा >>> ‘मविआ’च्या जागा वाटपावर राजकीय समीकरण ठरणार, अकोल्यातील पाचपैकी कुणाच्या वाट्याला किती जागा?
राजकारणात राहूनही खरे बोलता येते हे जरा दादांकडून शिका. उगीच खोटे कारण देऊन सहानुभूती कशाला मिळवता? तसेही तुमच्यावर ‘नाही नाही ते’ आरोप झाल्यापासून तुम्ही सहानुभूती गमावलीच होती. मग आता फुकाचा आव का आणता? अन्यायग्रस्त असा टाहो का फोडता? सरळ म्हणा की आता युतीची सद्दी संपल्यात जमा आहे. आघाडीचे दिवस येत आहेत म्हणून तिकडे चाललो. सोबतीला मुलांच्या भवितव्याचा मुद्दा आहेच. भाजपमध्ये असताना संपूर्ण गणवेशात संघाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणारे तुम्ही. तेव्हा तुमच्या मनाला जराही वेदना झाली नाही व आता दादांकडून होणारा ‘कथित’ अन्याय तुम्हाला यातना द्यायला लागला. हे कसे? तुमच्या अमोघ वाणीतून जरा स्पष्ट करून सांगाल का कधीतरी? असे ढोंगी वागून पुरोगामी या शब्दाचा अपमान तरी कशाला करता? तोही वारंवार!