Leader Of Opposition In Maharashtra And Andhra Pradesh: गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकांबरोबर आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकाही झाल्या होत्या. यामध्ये मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षानं माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला मोठ्या फरकारनं पराभूत केलं होतं. मागच्या निवडणुकीत दमदार विजय मिळणाऱ्या जगन मोहन यांना या निवडणुकीत फक्त ११ जागा जिंकता आल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशात आता वायएस जगन मोहन रेड्डी यांनी विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली आहे. जगन मोहन यांच्या या मागणीला आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सी. अय्यन्नापत्रुडू यांनी पक्षनेतेपदाची मागणी ही ‘अवास्तव इच्छा’ असल्याचे म्हटले आहे. सभापती अय्यन्नापत्रुडू म्हणाले की, जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी आवश्यक असलेले १८ आमदार किंवा सभागृहातील एकूण सदस्यसंख्येच्या एक दशांश आमदार नाहीत.

सभागृहाचा विरोधी पक्षनेता

विरोधी पक्षनेतेपद संसदेतील विरोधी पक्षनेत्यांचे वेतन आणि भत्ते कायदा, १९७७ मध्ये स्थापित केले आहे. या कायद्यात म्हटले आहे की, “विरोधी पक्षनेता म्हणजे संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या किंवा राज्याच्या विधानसभेचा किंवा विधान परिषदेचा सदस्य, जो सध्या त्या सभागृहात सर्वात जास्त संख्यात्मक ताकद असलेल्या सरकारच्या विरोधात असलेल्या पक्षाचा त्या सभागृहाचा नेता असतो. ज्याला लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधान परिषदेचे अध्यक्ष/सभापती परिस्थितीनुसार मान्यता देतात.”

प्रथेनुसार, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेत, एखाद्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी सभागृहाच्या एक दशांश संख्याबळ असणे आवश्यक असते.

आंध्र प्रदेश विधानसभेतील संख्याबळ

आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुकाही झाल्या होत्या. यामध्ये विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्ष १३५ जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने २१ जागा जिंकल्या होत्या. टीडीपीच्या नेतृत्त्वाखालील युतीमध्ये जनसेना पक्षाबरोबर भाजपाचाही समावेश होता. यात भाजपाला ८ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपीने ११ जागा जिंकल्या होत्या.

महाराष्ट्र विधानसभेतील परिस्थिती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवल्यनंतरही, महाविकास आघाडी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याची आशा बाळगून आहे. महाराष्ट्र विधानसभेत २८८ आमदार आहेत, विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी एकूण सदस्यसंख्येच्या १०% म्हणजे २९ आमदारांची आवश्यकता आहे. पण, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला २९ जागांवर विजय मिळवता आला नाही. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकर) यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीने एकत्रितपणे ४६ जागा जिंकल्या, ज्यामध्ये सर्वधिक २० जागा शिवसेनेला (उद्धव ठाकरे), काँग्रेसला १६ आणि राष्ट्रवादीला (शरद पवार) १० जागा मिळाल्या.

दरम्यान सोमवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काही दिवस आधी, शिवसेनेने (उद्धव ठाकरे) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एक पत्र सादर केले होते. ज्यामध्ये त्यांनी आमदार भास्कर जाधव यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्त करावे अशी मागणी केली आहे. परंतु विधानसभेत, विरोधी पक्षनेता नियुक्त करायचा की नाही हे सर्व अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अवलंबून आहे. कारण ते १०% नियमाच्या आधारे शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) विरोधी पक्षनेतेपदाचा दावा नाकारू शकतात.