मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, या अजित पवार यांच्या विधानानंतर उपमुख्यमंत्रीपद भूषविलेले नेते राज्यात आतापर्यंत कधीच मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले नसल्याने ही परंपरा अजितदादा खंडीत करतील का याचीच उत्सुकता असेल.
कोणत्याही नेत्याची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा असते. मुख्यमंत्रीपदाची आस बांधून बसलेल्या नेत्यांची ही इच्छा फलद्रूप झालेली नाही याचीही राज्यात अनेक उदाहरणे आहेत. राज्याच्या इतिहासात पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविलेले देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. पण उपमुख्यमंत्रीपद भूषविलेले कोणीचा आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होऊ शकलेले नाहीत. ही पार्श्वभूमीवर लक्षात घेता तीनदा उपमुख्यमंत्रीपद भूषविलेले अजित पवार हे परंपरा खंडीत करून सर्वोच्च पदावर विराजमान होतात का, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राज्यात नासिकराव तिरपूडे यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले. त्यांची इच्छा राज्याचे नेतृत्व करण्याची होती. पण त्यांना हे पद कधीच मिळाले नाही. पुलोद सरकारमध्ये सुंदरराव सोळंखे हे उपमुख्यमंत्री होते, पण त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत कधीच आले नाही. रामराव आदिक यांनी हे पद भूषविले. काँग्रेस सरकारमध्ये आदिक यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असायचे. पण त्यांना या पदाने हुलकावणी दिली.
भाजपचे गोपीनाथ मुंडे यांनी तर मुख्यमंत्रीपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखविली होती. १९९९ मध्ये युतीला सत्ता गमवावी लागली. तेव्हा मुंडे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी बरेच प्रयत्न केले होते. राज्यात भाजपला २०१४ मध्ये सत्ता मिळाली तेव्हा मुंडे हयात नव्हते. पण तेव्हाही मुंडे यांना संधी मिळाली असती याबाबत साशंकताच व्यक्त केली जात होती. मुंडे यांच्याप्रमाणेच छगन भुजबळ यांची मुख्यमंत्रीपदाची प्रबळ इच्छा होती. पण त्यांनाही कधीच संधी मिळाली नाही. राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असायचे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर संधी मिळाली नाही. कदाचित विजयदादांनी तेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला नसता तर काँग्रेसने त्यांच्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार केला असता, असे बोलले जाते.
हेही वाचा – सांगलीत काँग्रेसची अवस्था ‘रणांगणावर बाजी आणि तहात माजी’
आर. आर. पाटील यांनीही भविष्यात मुख्यमंत्रीपद भूषवायला आवडेल, असे विधान केले होते. पण आर. आर. आबांची इच्छा पूर्ण झाली नाही. दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस (अडीच दिवस) आणि उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आले तेव्हा अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी होती. पण शरद पवार यांनी तेव्हा काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा दावा मान्य केला. ही सल अजित पवार यांच्या मनात कायम आहे. तसे त्यांनी अनेकदा बोलूनही दाखविले आहे. २००४ मध्ये मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडून राष्ट्रवादीने चूक केली होती, असे जाहीर विधान त्यांनी केले होते. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाखुशीने हे पद स्वीकारावे लागले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर फडणवीस यांनी सरकार बाहेर राहण्याचे जाहीर केले होते. पण दोनच तासांत सूत्रे फिरली आणि त्यांनी नाईलाजाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले.
उपमुख्यमंत्रीपदाची यादी :
नासिकराव तिरपूडे
सुंदरराव सोळंखे
रामराव आदिक
गोपीनाथ मुंडे
छगन भुजबळ
विजयसिंह मोहिते-पाटील
आर. आर. पाटील
अजित पवार
देवेंद्र फडणवीस