कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आजी-माजी खासदारांमध्ये लढत रंगण्याची चिन्हे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात विद्यमान खासदार धैर्यशील माने हे लढत देणार हे उघड आहे. त्यांच्या बरोबरीनेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे, कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचे पुत्र रणवीरसिंग गायकवाड अशी मात्तबर नावे पुढे आली आहेत. विशेष म्हणजे हे सर्वजण माजी खासदारांचे नातू असल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला नातवांचा आखाडा असे स्वरूप आले आहे.
हातकणंगले मतदारसंघामध्ये निवडणूक हालचाली गतिमान झाल्या आहेत. गेल्यावेळी शिवसेनेकडून निवडून आलेले आणि सध्या शिंदे गटाचे असलेले धैर्यशील माने यांनी दुसऱ्यांदा निवडून येण्याची तयारी केली आहे. त्यांच्या विरोधात गेल्या वेळचे उमेदवार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तयारी चालवली आहे.
हेही वाचा – मध्य प्रदेशात काँग्रेसला १३० जागा मिळतील!
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शेट्टी यांनी २२ दिवसांची ५०० किलोमीटरची पदयात्रा सुरू करून मत पेरणीला चालवली आहे. तुलनेने,अद्याप धैर्यशील माने यांनी थेट प्रचार चालवलेला नाही. विद्यमान खासदार असल्याने आपणच उमेदवार असणार याचा आत्मविश्वास असल्याने ते निश्चिंत असावेत. तथापि भाजपने हा मतदारसंघ हा पक्षाला मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. यातून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. भाजपच्या अंतर्गत गोटात पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार बदलण्याची कुजबुज आहे. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार, खासदारांच्या विषयी प्रतिमा डागाळली असल्याचे सांगितले जाते. याचा फटका बसू नये याची दक्षता भाजपचे शीर्षस्थ नेते घेत आहेत. उमेदवार बदलायची वेळ आलीच तर सज्जता असावी अशी भाजपची रणनीती दिसते.
जिल्हा परिषद ते खासदार
इचलकरंजीचे अपक्ष आणि भाजपला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांनी आपण लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक असल्याचे घोषित केले आहे. माजी खासदार, माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू असलेले राहुल यांचे सहकार क्षेत्रातही काम आहे. विशेष म्हणजे या हातकणंगले मतदारसंघ आणि जिल्हा परिषद सदस्य याचा निकटचा संबंध राहिला आहे. दिवंगत खासदार बाळासाहेब माने, त्यांचे नातू धैर्यशील माने, राजू शेट्टी यांचा राजकीय प्रवास जिल्हा परिषदेतून सुरू झाला आहे. हे समीकरण लक्षात घेता मार्ग सुकर होऊ शकतो अशी मांडणी राहुल आवाडे यांच्याकडून केली जात आहे.
हेही वाचा – साताऱ्यात अजित पवार गट लोकसभा व विधानसभेच्या जागांवर ठाम
सांगलीतून हाक
हातकणंगले तालुक्यामध्ये या घडामोडी सुरू असताना अन्य तालुक्यांमधूनही या मतदारसंघात राजकारणात नातू पर्व पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संस्थापक शरद पवार यांनी घेतली तेव्हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी हातकणंगलेतील कार्यकर्त्यांनी केली. सांगली जिल्ह्यातील राजारामबापू साखर समूहाचे दिवंगत नेते राजारामबापू पाटील यांचा राजकीय वारसा प्रतीक पाटील यांना लाभला आहे. त्यांनी गेल्या वर्षी दिवाळीमध्ये अंदाज घेतला होता. आता पुन्हा संपर्कात राहण्याच्या हालचाली त्यांनी चालवलेल्या आहे. प्रतीक पाटील सारखे मोठे नाव आखाड्यात आले तर निवडणुकीला चांगलाच रंग भरणार आहे.
काँग्रेसची चाचपणी
शाहूवाडी तालुक्यातून काँग्रेसचे दिवंगत खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांचेही नाव काँग्रेसच्या बैठकीमध्ये सुचवण्यात आले होते. त्यांचा संपर्क सीमित असल्याने सध्या या नावाची फारशी चर्चा होताना दिसत नाही. पण ऐनवेळी हे नाव काँग्रेसकडून पुढे आणले जाण्याची शक्यता आहे. एकंदरीत या हालचाली पाहता हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणात नातवांची दाटी होताना दिसत असून प्रत्यक्षात नेमके आखाड्यात कोण उतरणार याचीही उत्सुकता आहे.