प्रबोध देशपांडे
अकोला : सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात प्रवेश घेण्याऱ्यांची रीघ लागली. पक्षांचा संघटनात्मक विस्तार करण्याच्या दृष्टीने त्यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. अकोला जिल्ह्यातील दोन नेत्यांनी भाजपचा, तर एकाने शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला. अतिशय साध्या पद्धतीने हे नेते सत्ताधारी पक्षांमध्ये दाखल झाले. अनेकवेळा मोठे नेते पक्षात आल्यावर तात्काळ त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात येते. अगोदरच गर्दी असलेल्या सत्ताधारी पक्षांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेले जबाबदारीच्या प्रतिक्षेत आहेत. पक्षांतर केले तरी मात्र त्या नेत्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
सत्ताधारी पक्षांसोबत राहण्याकडे नेत्यांचा कल असतो. सत्तापरिवर्तन होताच पक्षांतराचे वारे वाहू लागतात. हिवाळी अधिवेशनादरम्यान अकोला जिल्ह्यातील माजी जिल्हाप्रमुख व एसटी सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत हातात कमळ घेतले. पक्षांतर्गत मतभेदातून त्यांनी सेना सोडल्याचे बोलले जाते. विजय मालोकार यांना तत्कालील बोरगाव मंजू व आताच्या अकोला पूर्व मतदारसंघातून सेनेने उमेदवारी दिली होती. दोन वेळा त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष निवडणूक लढली. या निवडणुकांमध्ये त्यांनी दखलपात्र मते घेऊन लक्ष वेधून घेतले.
हेही वाचा >>> शिंदे-कवाडे युतीचा राजकीय लाभ कोणाला?
पक्षांतर करण्यासाठी मालोकार यांची पहिली पसंती शिंदे गट होता. नाट्यमय घडामोडी व काही नेत्यांकडून प्रवेशाला विरोध झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याला पसंती दिली. अतिशय साध्या पद्धतीने त्यांचा प्रवेश सोहळा झाला. मालोकारांवर अद्याप भाजपने कुठलेही दायित्व सोपवलेले नाही. विजय मालोकार यांनी निवडणूक लढवलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व नऊ वर्षांपासून आ. रणधीर सावरकर करतात. जिल्हा भाजपमध्ये त्यांचे एकहाती वर्चस्व आहे. मालोकारांच्या प्रवेशामुळे अकोला पूर्वमध्ये पक्ष संघटन वाढीला मदत होणार आहे. आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाजपमध्ये प्रवेश घेतला. ऐन उमेदीच्या काळात भारिप-बमसंमध्ये असतांना त्यांना जि.प.अध्यक्ष, तत्कालीन बोरगाव मंजू मतदारसंघातून आमदारकी व कॅबिनेट मंत्रिपद देखील मिळाले. मात्र, त्यांनी बंडखोरी करून भारिप-बमसंला सोडचिठ्ठी दिली.
हेही वाचा >>> शिंदे गटाला सोबतीला निळा झेंडा मिळाला
दरम्यानच्या काळात त्यांनी विविध प्रयोग केले. त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी साधरणत: सात वर्षांपूर्वी भारिपमध्ये घरवापसी केली. मात्र, पक्षात त्यांचे मन रमले नाही. गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर व कुठल्याही पक्षात कार्यरत नव्हते. कोळी समाजाच्या प्रश्नांवर लढा देतांना त्यांनी भाजपवर कौतुक वर्षाव करतांना पक्षप्रवेशाचे संकेत दिले. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांनी साध्या पद्धतीने भाजपची वाट निवडली. जिल्हा भाजपमध्ये त्याची साधी दखलही घेतली नाही. राष्ट्रवादीचे व शरद पवारांचे निकटवर्तीय रामेश्वर पवळ यांनी पक्षाचे घड्याळ सोडून शिंदे गटात दाखल झाले आहेत. शिंदे गटाकडून त्यांनाही अद्याप कुठली जबाबदारी दिली नाही. भाजपमध्ये अगोदरच नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी आहे. त्यातच महत्त्वाकांक्षा ठेऊन नेत्यांचे ‘इनकमिंग’ सुरूच आहे. पक्षात नव्याने आलेल्यांची नेमकी भूमिका काय? त्यांना पक्षात जबाबदारी मिळणार का? की ते पक्षात अडगळीत पडून राहतील? आदी अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.
समविचारी पक्ष असल्याने भाजपमध्ये प्रवेश घेतला. आ.रणधीर सावरकर यांच्या कार्यप्रणालीला अधिक प्रभावित झालो. पक्ष प्रवेशात कुठलीही महत्त्वाकांक्षा नाही. पक्ष जी जबाबदारी देईल, ती निस्वार्थीपणे पार पाडू.
– विजय मालोकार, भाजप, अकोला.