इस्रायली चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या चित्रपटाबाबत काश्मीर खोऱ्यातील राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “देशातील चित्रपटसृष्टी, भारताची प्रतिमा आणि काश्मिरी पंडितांसाठी ‘काश्मीर फाइल्स’च्या निमित्ताने उफाळून आलेला वाद चांगला नाही”, असं पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते नईम अख्तर यांनी म्हटले आहे.
“काश्मिरी पंडितांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या छावण्या आता रिकाम्या आहेत “, अशी माहिती अख्तर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली आहे. यावर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अनेक भाजपाशासित राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आले होते. हा चित्रपट १९९० च्या दशकात खोऱ्यातील काश्मिरी पंडितांचं पलायन आणि हत्यांवर आधारित आहे.
“प्रत्यक्षात काश्मिरी पंडित समाजाची अवस्था अत्यंत बिकट आहे. पण याचा वापर चित्रपटात प्रपोगंडा राबवण्यासाठी करण्यात आला. काश्मिरी पंडितांच्या वेदनेची जाण प्रत्येक काश्मिरी नागरिकाला आहे. हा मुद्दा चित्रपटात नव्हता”, असा आरोप या पीडीपी नेत्यानं केला आहे. काही कलाकार पडद्यावर आणि पडद्यामागे द्वेषाचा प्रचार करत आहेत, असाही आरोप अख्तर यांनी केला आहे. “या चित्रपटाने काश्मिरींसाठी किंवा काश्मिरी पंडितांसाठी काही चांगले केले आहे की नाही”, असा सवाल ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे प्रवक्ते तनवीर सादिक यांनी केला आहे.
The Kashmir Files Controversy: “नदाव लॅपिड म्हणजे इस्त्रायलमधले जितेंद्र आव्हाड”
“ज्या पद्धतीने भारत सरकार ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा आक्रमकपणे प्रचार करत आहे. त्यातून सरकारचा वाईट हेतू स्पष्ट होतो. हे सरकार काश्मिरी पंडितांच्या वेदनेचा शस्त्र म्हणून वापर करत आहे”, असा हल्लाबोल पीडीपीच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून काश्मीर खोऱ्यात चार काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली आहे.