छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा विश्वास डळमळेल तेव्हा आपण ‘मित्र-पक्षा’चे ऐकू, असे सांगून माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी यांनी शेरोशायरीतून पक्षांतर्गत विरोधकांना इशारे दिले. “कुछ देर खामोशी है, फिर कानों मे शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ वक्त है, हमारा दौर आयेगा, अशी सूचक विधाने करून बुधवारी येथे अभीष्टचिंतन सोहळ्याच्या आडून शक्तिप्रदर्शन केले. सर्व पक्षातील मित्रांनी हा सत्कार आयोजित केल्याचे भासवले गेले असले तरी या सोहळ्याकडे महायुतीतील एकही नेता फिरकला नाही. उलटपक्षी काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे, ठाकरे गटाचे वैजापूरचे नेते डॉ. दिनेश परदेशी, राजू राठोड, कृष्णा पाटील डोणगावकर, किरण पाटील डोणगावकर, बाळासाहेब संचेती, अभिजित देशमुख आदी नेते आवर्जून उपस्थित होते.
येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सत्काराप्रसंगी बोलताना सत्तार यांनी अडीच वर्षांनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलादरम्यान आपण पुन्हा मंत्रिपदी येऊ, असा विश्वास व्यक्त केला. तूर्त तरी आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे सांगून या संदर्भातील वावड्यांवर पडदा टाकला.
हे ही वाचा… वर्धा : भाजपसाठी ‘ ५ ‘ तारीख महत्वाची; नेते, पदाधिकारी कामाला लागले
सत्तार यांनी, आपण आता सिल्लोडपुरते मर्यादित राहणार नसून, छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊनही सर्वसामान्यांचे कामे करणार असल्याचे सांगून, एक प्रकारे त्यांच्या पक्षातील मंत्री संजय शिरसाठ यांच्या विरोधात दंड थोपटणार असल्याचे सूचक विधान केले. लहान व्यक्तींच मोठे नेतृत्त्व घडवत असतात. काही लोक पक्षाच्या नावाने राजकारण करतात. परंतु आपण राजकारण मित्रांच्या नावाने करत असतो. सिल्लोडमध्ये राजकारण नव्हे तर समाजकारण अधिक मजबूत असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध झाल्याचे सांगून सत्तार यांनी नामोल्लेख टाळून रावसाहेब दानवे यांनाही चिमटा काढला. आपण आजपर्यंत धुळे, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री म्हणून काम केले असून, या तिन्ही जिल्ह्यात शत-प्रतिशत महायुतीला यश मिळाल्याचा दावाही सत्तार यांनी केला. राजकारणात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कधीच होत नसते, याची आपल्याला जाणीव असून, मंत्रिपदासाठी पुढील अडीच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले.