भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या इंडिया आघाडीच्या भवितव्यावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. जागावाटपाच्या मतभेदामुळे अनेक विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या बाहेर पडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु, निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही पश्चिम बंगाल इंडिया आघाडीतील काँग्रेस, डावी आघाडी आणि भारतीय सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) यांच्यातील जागावाटपाचे कोडे सुटलेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवड्यात, सीपीआय(एम), सीपीआय आणि रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी) यांचा समावेश असलेल्या डाव्या आघाडीने आपल्या १६ उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यापैकी १४ चेहरे नवीन आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत, सर्व जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर डाव्या आघाडीतील पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली. सूत्रांनी सांगितले की, अब्बास सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील आयएसएफने सुरुवातीला डाव्या आघाडीच्या युतीचा भाग म्हणून १४ जागांची मागणी केली होती, ही संख्या नंतर आठवर आली.

इंडिया आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटेना

“आम्ही आयएसएफला सहा पेक्षा जास्त जागा देऊ शकत नाही. त्यांनी जादवपूर आणि मुर्शिदाबाद जागेची मागणी केली आहे. परंतु आम्ही ती मागणी पूर्ण करू शकत नाही. कारण- आम्ही आधीच जादवपूरसाठी उमेदवार जाहीर केला आहे आणि मुर्शिदाबादसाठी उमेदवाराचे नाव निश्चित केले आहे,” असे एका सीपीआय(एम) नेत्याने सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला १२ जागा हव्या आहेत. पण डाव्या आघाडीकडून ही संख्या १०वर आणण्याचा प्रयत्न आहे. सूत्रांनी सांगितले की, डाव्या आघाडीने पुरुलिया आणि रायगंज या दोन जागा काँग्रेससाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु काँग्रेसने मुर्शिदाबाद ही जागा सोडावी अशी त्यांची अपेक्षा आहे. “मुर्शिदाबादमधून अल्पसंख्याक समुदायातील सीपीआय(एम) नेत्याला उमेदवारी दिली जाऊ शकते,” असे एका सूत्राने सांगितले. परंतु, काँग्रेसला मुर्शिदाबाद ही जागा सोडायची नाही. कारण- पक्ष पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना इथून उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. तर दुसरीकडे आयएसएफलादेखील मुर्शिदाबाद ही जागा हवी आहे

जानेवारीत तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंडिया आघाडीत जागावाटपाबद्दल चर्चा झाली नाही. सीपीआय (एम) चे राज्य सचिव मोहम्मद सेलीम आणि प्रदेश काँग्रेस कमिटी प्रमुख चौधरी यांच्यातील एका चर्चेनंतर सीपीआय (एम) च्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले होते की, जागावाटप जवळजवळ निश्चित आहे. मात्र, त्यानंतर याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

डाव्या आघाडीला काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा

“काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींना निर्णय घ्यावा लागेल, त्यानंतरच आम्हाला निर्णय घेता येईल. परंतु काही काँग्रेस नेते अजूनही टीएमसीशी चर्चा करत आहेत,” असे मोहम्मद सेलीम यांनी सांगितले. काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने डाव्या आघाडीचे नेते त्यांच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. “टीएमसीने सर्व ४२ जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतरही काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठी संभ्रमात आहेत. आम्ही त्यांची प्रतीक्षा करू शकतो, परंतु फार काळ नाही,” असे सीपीआय(एम) मधील एका नेत्याने सांगितले.

हेही वाचा : तामिळनाडू आणि गुजरातमध्ये एका टप्प्यात निवडणूक होते, मग आमच्याकडे का नाही? तृणमूल नेत्यांचा सवाल

काँग्रेस एक मोठा पक्ष आहे, त्यामुळे जागावाटपाच्या निर्णयाला विलंब होत आहे, असे चौधरी यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले. काँग्रेस नेत्यांनी असेही म्हटले की, डाव्या आघाडीने काही उमेदवार जाहीर केले, याचा अर्थ युती तुटली असा होत नाही. “आम्ही तृणमूल काँग्रेस आणि भाजपाला कोणत्या जागांवर टक्कर देऊ शकतो आणि डाव्या आघाडीची कोणत्या जागांवर पकड आहे, याचे विश्लेषण करत आहोत. आमची केंद्रीय निवडणूक समिती लवकरच नावे निश्चित करेल,” असे चौधरी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Left front parties are tired of waiting for congress in west bengal rac