इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) केरळमधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचा बऱ्याच काळापासून भागीदार आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा हा पक्ष सदस्यसुद्धा आहे. एकीकडे IUML काही दिवसांपासून CPI(M) ला UDF पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असतानाच भाजपा इंडियन युनियन मुस्लिम लीगवर सातत्याने हल्ले करीत आहे. दुसरीकडे IUML चे काँग्रेसबरोबरचे संबंध विविध मुद्द्यांवरून ताणले गेल्याची चर्चा आहे. केरळ इंडियन युनियन मुस्लिम लीगचे अध्यक्ष पनाक्कड सय्यद सादिक अली थांगल यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काँग्रेस आपल्या नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे सांगितले. काँग्रेसशी असलेले त्यांचे संबंध, मुस्लिम गटांपर्यंत सीपीआय(एम) ची पोहोच अन् नुकताच द केरळ स्टोरीवरून निर्माण झालेल्या वादावर त्यांनी मुलाखतीतून भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

CPI(M) ने CAA ला केरळमधील प्रचाराचा मुख्य मुद्दा केला आणि मुस्लिम समुदायाने काँग्रेसच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तुम्ही याकडे कसे पाहता?

केरळ विधानसभेने UDF च्या पाठिंब्याने CAA विरोधात ठराव मंजूर केला. खरं तर CAA हा राज्याचा मुद्दा नाही आणि राज्य सरकार त्याविरोधात भूमिका घेऊ शकत नाही. आमची भूमिका सीएएविरोधात संसदेत लढण्याची आहे. हा एकट्या मुस्लिमांवर परिणाम करणारा मुद्दा नाही.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह एलडीएफ नेत्यांनी काँग्रेसचे मौन हे संघ परिवाराला मूक पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसला दोष देणे अयोग्य आहे. जर काँग्रेसची संघ परिवाराला पाठिंबा देणारी मानसिकता असती तर ते त्यांच्या राजवटीत संसदेत CAA किंवा असे कठोर नियम लागू करू शकले असते. भविष्यातही काँग्रेस CAA ला पाठिंबा देणार नाही. सीएए लागू करण्याचे वचन घेतलेल्या सरकारला हटवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचाः काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन; इंडिया आघाडीतील पक्षांच्या जाहीरनाम्यांचे विश्लेषण

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सीएएचा मुद्दाच नाही

राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करणार नसल्याचे वारंवार ठासून सांगितले आहे. आम्ही कोणत्याही पक्षाला त्यांच्या जाहीरनाम्यात सर्वकाही समाविष्ट करण्यास सांगू शकत नाही. सत्तेत येणाऱ्या सरकारचे धोरण महत्त्वाचे असते. इंडिया आघाडीचे भागीदार CAA च्या विरोधात आहेत.

सीपीआय(एम) मुस्लिम समाजाच्या जवळ आहे. त्यांनी IUML समर्थक संघटनांना मान्य असलेले उमेदवार दिलेत.

सत्ताधारी पक्ष म्हणून सीपीआय(एम) कदाचित मुस्लिम (IUML समर्थक) संघटनांसाठी त्यांच्या मर्यादेत राहून अनेक चांगल्या गोष्टी करीत असेल. परंतु IUMLने सर्व मुस्लिम संघटनांशी चांगले संबंध ठेवले आहेत. CPI(M) ने मुस्लिम धर्मगुरू आणि IUML समर्थक संस्थांची मदत केली आहे, तसेच ते त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. IUMLला राजकारणाची चांगली जाण आहे आणि त्यांची भूमिकाही आम्हाला माहीत आहे. आमचे नाते फार जुने आहे.

काँग्रेस कमकुवत आहे आणि भाजपाचा सामना करू शकत नाही, असे सांगून डावे मुस्लिमांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

काँग्रेस ज्या पद्धतीने अल्पसंख्याकांचे संरक्षण करते, त्याप्रमाणे डावे अल्पसंख्याकांचे संरक्षण सुनिश्चित करू शकतात हे आम्हाला मान्य नाही. आम्ही काँग्रेसला कधीही सोडू शकत नाही किंवा नाकारू शकत नाही. आजही देशभरात काँग्रेस हा भाजपाच्या विरोधातील एकमेव पक्ष आहे. भाजपाच्या विरोधात काँग्रेसच आघाडी करू शकते हे सर्वांनाच माहीत आहे.

देशातील अल्पसंख्याकांसाठी ही निवडणूक किती महत्त्वाची?

ही निवडणूक समाजातील सर्व घटकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. सध्याच्या राजवटीने जाती आणि धर्माच्या आधारे लोकांमध्ये तेढ निर्माण केली आहे. मतांसाठी द्वेषाचे राजकारण केले जात आहे. वाजपेयी सरकार आणि सध्याच्या मोदी सरकारमध्ये फरक खूप मोठा आहे. CAA, समान नागरी संहिता आणि तिहेरी तलाकचे मुद्दे मुस्लिम समुदायाला मदत करण्यासाठी नाहीत. भाजपाकडे आणखी काही योजना आहेत.

काँग्रेस केंद्रात पुनरागमन करू शकते आणि आययूएमएलसाठी ते किती महत्त्वाचे?

आययूएमएलसाठी हे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपण धर्मनिरपेक्ष राजकारणाचे अनुसरण करीत आहोत. काँग्रेसला राजकीयदृष्ट्या मजबूत करण्याची आमची भूमिका आहे.

अलीकडेच राहुल गांधींच्या रोड शोमध्ये IUML झेंडे न लावण्याबाबत सांगितले होते.

राहुल गांधींचा वायनाडमधील रोड शोमध्ये काँग्रेससह इतर कोणत्याही पक्षाचे झेंडे नव्हते. खरं तर फॅसिझमचा पराभव करणे हा आमचा उद्देश आहे. त्यात आम्ही काही तडजोडी केल्यात. झेंड्याचा मुद्द्याकडे त्या संदर्भातून पाहिले गेले पाहिजे.

केरला स्टोरी कॅथोलिक चर्चमध्ये दाखवून लव्ह जिहादविरुद्ध तरुणांना सतर्क करण्यात आले, तुम्ही याकडे कसे पाहता?

अल्पसंख्याकांच्या सर्व घटकांनी एकत्र उभे राहून फॅसिझमच्या विरोधात आवाज उठवायला हवा, असे मला वाटते. मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यात समस्या आहेत, परंतु त्या चर्चा आणि संवादाद्वारे सोडवल्या जाऊ शकतात. मागच्या वर्षी मी केरळमध्ये समरसता यात्रेचे नेतृत्व केले आणि समुदायांमधील ही फूट कमी करण्यासाठी सर्व जिल्ह्यातील चर्चच्या नेत्यांशी चर्चा केली. मुस्लिम आणि ख्रिश्चन हे दोन्ही यूडीएफची ताकद आहेत. संघ परिवारातील शक्तींना त्या ऐक्यात फूट निर्माण करायची आहे. मात्र संघ परिवाराच्या अजेंड्याबाबत ख्रिश्चन समाज आता सतर्क झाला आहे.

मुस्लिम समुदायाच्या लोकांना तुम्ही अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला विरोध करू नका असे सांगितले, काही जण रागावले होते.

अशा मुद्द्यांवर आपण सामंजस्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा माझा भाऊ सय्यद मोहम्मदअली शिहाब थांगल (तत्कालीन IUML प्रमुख) यांना तणाव नको होता आणि त्यांनी समुदायाच्या सदस्यांना मंदिरांवर पहारा ठेवण्याची विनंती केली. हिंदू मंदिरावर दगड पडणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती केली. प्रश्न सौहार्दपूर्ण मार्गाने कसे सोडवता येतील हे आपल्याला पुढे जाऊन पाहावे लागेल.