अजित पवार यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणाचे सारे संदर्भ बदलले असताना विधिमंडळातील दोन्ही ‘उप’ पदे वाचविण्यात उभयतांना यश आले आहे. अजित पवार यांच्या बंडाला साथ दिल्यानेच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे पद वाचणार आहे. दुसरीकडे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्याही पदावर आता गंडांतर येणार नाही. परिणामी विधान परिषदेचे उपसभापती आणि विधानसभेचे उपाध्यक्ष दोघांनी आपली पदे सुरक्षित केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभेत भाजप आणि शिंदे गटाचे बहुमत झाल्यावर उपाध्यक्ष झिरवळ यांचे उपाध्यक्षपद वाचते का, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उपाध्यक्ष झिरवळ यांना फारसे महत्त्वच देत नसल्याची राष्ट्रवादीची तक्रार होती. विधानसभेत अध्यक्ष आसनावर नसल्यास उपाध्यक्षांना संधी दिली जाते. नंतर तालिका अध्यक्षांपैकी एकाला कामकाज पाहण्यास सांगितले जाते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकदा असा प्रसंग आला की, पिठासीन अधिकारी म्हणून तालिका सदस्य कामकाज बघत होते. तर उपाध्यक्ष झिरवळ हे सभागृहात विरोधी पक्षनेत्याच्या शेजारील आसनावर बसले होते. वास्तविक असा प्रसंग क्वचितच घडतो. झिर‌वळ यांनी अजित पवार यांच्या बंडाला साथ दिल्याने पुढील काळात त्यांचे उपाध्यक्षपद वाचले आहे.

हेही वाचा – पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर राज्यपालांची तीव्र नाराजी, तणावग्रस्त भागाची घेतली भेट; निवडणूक आयुक्तांना दिला महत्त्वाचा सल्ला!

विधान परिषदेत सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. सभापतीपद गेले वर्षभर रिक्त आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडेच सारी सूत्रे आहेत. विधान परिषदेच्या २१ जागा रिक्त असल्या तरी ५७ सदस्यांमध्येही भाजपकडे बहुमत नव्हते. आता चित्र बदलले आहे. ठाकरे गटाच्या तीन आमदारांनी आतापर्यंत शिंदे गटात प्रवेश केला. परिणामी शिवसेनेचे संख्याबळ ११ वरून घटून आठवर आले. अजित पवार यांच्या बंडामुळे नऊ आमदार असलेल्या राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. तीन ते चार आमदार पवार यांना साथ देण्याची शक्यता आहे. यामुळेच भाजप, शिंदे व पवार गटाचे संख्याबळ ३० होऊ शकते. यातूनच आगामी पावसाळी अधिवेशनात सभापतीपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे गटाचे संख्याबळ घटत असताना राष्ट्रवादीतील बंडामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे पद धोक्यात येऊ शकले असते. पण त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून आपले उपसभापतीपद शाबूत ठेवले आहे. त्यांचा डोळा सभापतीपदावर आहे. सध्या तरी दोन्ही उप पद वाचले आहेत.